सोमवार, २६ जुलै, २०२१

अशी आहे 'शेखर अंकल' च्या जन्माची कहाणी !


1996 चा काळ म्हणजे वर्तमानपत्रे समाजात अधिक वाचली जाणारा काळ. आजही त्यांचे वेगळे महत्व आहेच पण ईलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्ही यांनी दैनिकांच्या वाचक वर्गात मोठी घट केली आहे.
मी तीन वर्षा पुर्वी डी.एड शिक्षक झालो होतो पण वर्तमानपत्र आणि पुस्तके यातील लेखक, कवी यांच्या विषयी वाचनामुळे खूप मोठेपणा-वलय वाटत होते. आपण त्यांच्यासारखे व्हावे असे वाटायचे, खूप लोकांनी आपल्याला ओळखावे असे नेहमी वाटायचे.
बालपणापासून मला वाचनाची खूप आवड. हाती पडेल ते पुस्तक वाचत गेलो. मराठीतील कथा कविता खूप आवडायच्या.
पिंपळगाव गाढे हे माझे मूळ गाव. उन्हाळी सुटट्यात दरवर्षी तेथे जायचो. माझे चुलते शिक्षक आणि गावातील सार्वजनिक वाचनालयाचे संचालक श्री महालिंगअप्पा फुटके यांच्यामुळे वाचनालयातील पुस्तके वाचायला मिळायची. सकाळी वाचनालय़ उघडले की 5 पुस्तके घेऊन जायचो, गच्चीवर-पायर्यावर बसून पुस्तकांच्या दुनियेत हरवून जायचो. जेवण करण्यासाठी, कामासाठी मारलेल्या हाका मला कधीच कळत नव्हत्या.
संध्याकाळी पुन्हा वाचनालयात हजर ! सकाळी घेतलेली पुस्तके वापस करून नवी 5 पुस्तके घ्यायचो! (जास्त देत नव्हते म्हणून) रात्री पुन्हा त्याच पुस्तकांच्या दुनियेत!
हनुमानाच्या शेपटीला धरून रावणाची भव्य लंका पाहिली, शूर सिन्दबादच्या जहाजात बसून अनेक देश फिरलो, इसापच्या दुनियेत, पंचतंत्रात प्राण्यांकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकल्या, राजा भोज सोबत सिंहासनाची एकेक पायरी चढत नव्या नव्या कथा शिकलो, विक्रमादित्य आणि वेताळ कहाणी भीत भीत वाचायचो पण झोपेत दचकून कधी उठायचो नाही (आजकाल टीव्ही वर मालिका पाहून मुले उठतात तशी! त्याचे कारण पुढे सांगतो) अलिफ लैला, अकबर बिरबल,जातक कथा, तेनली राम यातील पात्रे म्हणजे माझ्या आयुष्यातील हीरो आहेत. कॉमिक्स मध्ये नव्याने फॅटम आणि नवी पात्रे आली होती- या गोष्टी सुद्धा खूप खूप आवडीने वाचायचो. मुलांसाठी असणारी चांदोबा, चंपक, सोवियत रशिया येथून येणारे हिंदीतील मासिक या सर्वांचा माझ्यावर छान परिणाम होत होता...त्या काळी असणारे सर्व दैनिके आणि मासिके माझे मामा श्री उदगिरकर बंधू यांच्याकडे वाचायला मिळायचे.
गोष्टीच्या पुस्तकांनी माझे जीवन समृद्ध केले आहे असे मला वाटते. सगळ्या चांगल्या सवयी- कोणाशी कसे, काय बोलावे- मित्राशी कसे वागावे- काय खावे असे सारे सारे मला पुस्तकांनी दिले. कधी एकटा पडू दिले नाही, खूप वेळा तर मी मनाशी संवाद करायचे- हवेत बोटे फिरवून काही चित्रे काढायचो- अक्षरे गिरवायचो ( एक दोनदा तर यासाठी मार पण खाल्ला घरच्यांकडून!)
झाडाखाली शेतात एकटा बसायला घाबरत नव्हतो-घरी रात्री एकटा झोपायला घाबरत नव्हतो, त्याचे कारण पुस्तके ! वाचायची किंवा वाचलेली असतील तर त्यांच्या विचारात कल्पनेत छान झोप लागायची.
मला वाटते पुस्तके आपल्या कल्पना शक्तीमध्ये खूप मोठी वाढ करतात, आपल्या आयुष्यातील रितेपणा दूर करतात...ज्याचे बालपण अश्या कल्पनाशक्तीने भरलेले नसेल त्याचे आयुष्य रिते, कोरडे आणि रूक्ष जाऊ शकते! आपल्या जीवनातील अनेक समस्या कल्पनाशक्तीने दूर होऊ शकतात, कामात नावीन्य येते...माणूस प्रत्येक काम आनंदाने, उच्च ध्येयाने प्रेरित होऊन करू शकतो....नीतीमत्ता, माणुसकी, आपुलकी हे सगळे त्याला पुस्तकाने बहाल केलेले असते....सारासार विचार, आत्मशक्ति हे गुण त्याला मिळालेले असतात...म्हणूनच विक्रम वेताळ ची कहाणी वाचून सुद्धा तो घाबरत नाही कारण पुस्तकाने खरा देव आणि भूत कोणते हे ही त्याला सांगितलेले असते!
पुस्तके आणि रेडिओ कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी जेवढी मदत करतात तेवढी टीव्ही हानिकारक असते. टीव्हीत जो राजा दाखवलेला असेल तोच तुम्हाला दिसेल, जे राक्षस दाखवलेले असेल तेच तुमचे डोळे पाहतील....पण पुस्तक वाचत असताना तुम्ही राजा कसा असेल त्याची कल्पना करत असाल कदाचित एकच गोष्ट वाचणारा प्रत्येक मुलगा त्याच्या राजाचे वर्णन वेगळे करेल....हीच गोष्ट रेडिओ साठी पण जुळते...आम्ही रेडिओ खूप ऐकला....श्रवण चांगले केले...पुस्तकांनी आणि रेडिओ यांनी माझी एकाग्र शक्ति पण वाढवली...आज व्याख्यान ऐकत असताना, ट्रेनिंग मध्ये अनेक तास बसून मला एकाग्र बसून ऐकता येते...ही पुस्तकांची देण!
मुलांसाठी आपण काहीतरी लिहिले पाहिजे या प्रबळ इच्छेमुळे दैनिक वैद्यनाथ टाइम्सला श्री संजय खाकरे यांच्या सोबत 1995 मध्ये काम सुरू केले आणि येथेच प्रथम 'शेखर अंकल' चा जन्म झाला. मुलांना वडीलांपेक्षा काका जास्त आवडतात आणि ते त्याचा लाड पण करतात हे लक्षात घेऊन "शेखर अंकल" हे नाव मी स्वत: साठी घेतले.
दैनिक वैद्यनाथ टाइम्स आणि दैनिक मराठवाडा साठी हे त्या काळी परळीतील आपापसात स्पर्धा करणारे वर्तमानपत्रे! साथीने आपले रूपडे काळानुसार लवकर बदलले म्हणून ते पुढे आले आणि कालांतराने दैनिक वैद्यनाथ टाइम्स बंद झाले. साथीमध्ये आपल्याला चित्रासह गोष्टी देता येतील आणि अनेक चांगले उपक्रम राबवता येतील हे समजल्यानंतर श्री लक्ष्मण वाकडे यांच्या मदतीने संपादक श्री सतीश बियाणी यांना बोललो आणि 1996 पासून दैनिक मराठवाडा साथीचा 'अंकल' परळीसाठी कार्यरत झाला.
दिवंगत मुख्य संपादक श्री मोहनलाल जी बियाणी( काकाजी) यांच्याकडून नेहमी गप्पा मारता मारता अनेक अनुभव घेता आले. ( पुढे चालून रविवारचे सदर प्रसिद्ध झाले आणि मला काकाजी नेहमी 'अंकल' म्हणू लागले- एकदा तर काकाजींच्या वयाचे काही व्यक्ती त्यांना गप्पा मारत बसले होते, मी येताना दिसलो आणि काकाजी म्हणाले, या अंकल..मला पाठमोरे असलेले ते पाहुणे काकाजीचे कोणते अंकल आले म्हणून कुतूहुलाने पाहु लागले तर जेमतेम 22 वर्ष वयाचा मी!)
रविवारचे सदर सुरू झाले ते दैनिकाच्या एका कोपर्यात मात्र पुढे ते पानभर पसरले आणि तसेच आमचे चिमुकले वाचक सुद्धा मराठवाडा भर पसरले !
शाळा शाळा मधून मुले चित्र पाठवू लागली, गोष्टी लिहु लागली, कथा वाचू लागली, कोडे सोडवून पुस्तकरूपी बक्षीस मिळवू लागली....रविवारचा अंक लवकर संपू लागला तर कधी कधी दुपारी परत छपाई करण्याची गरज पडली...! दर सोमवारी साथी कार्यालयात मुलांच्या हस्तलिखितांचा पाऊस पडत होता...पोस्टमन 400-500 पत्रांचा गठ्ठा बांधून कार्यालयात घेऊन यायचा! आज स्वप्नवत ( माझ्यासाठी तरी) वाटत असलेले ते दिवस खरोखर मंथरलेले होते....अनेक वेळा माझी शाळा करून परळी येथील शाळा प्रार्थनेच्या वेळी गाठायचो आणि मुलांना भाग घेण्यासाठी आवाहन करायचो...सर्व शाळेत गेलो पण "शेखर अंकल" कोण आहेत हे कधी सांगितले नाही, माझा फोटो सुद्धा कधी छापला नाही...मलाच पत्रे देऊन मुले म्हणायची - हे शेखर अंकलला द्याल ना? मनात हसायचो आणि ठरवायचो असेच गुप्त राहू!
साथी दैनिकाच्या या अंकलने पुढची अनेक वर्षे सतत मुलांसाठी काम केले... विवाहाच्या आधी कुटूंबियांनी तर नंतर पत्नी सुजाताने मोठी मदत केली ......बर्याचदा रविवारी हे सदर नसले की मुले नाराज होत...मला त्यासाठी खूप वेळ द्यावा लागत होता...काम वाढत होते...पत्रे वाचणे, उत्तरे देणे, बक्षिसे देणे...कार्यक्रम आयोजित करणे...शाळा भेटी...पण हे सर्व आनंदाने करत होतो....
परळीतील सर्व मुलांना सोपे जावे म्हणून त्यांची उत्तरे, कथा, कविता स्विकारण्याची ठिकाणे वाढवली- शिवशक्ति मेडिकल गणेशपार, मुंदडा स्टेशनर्स मोंढा ....त्यांचे खूप सहकार्य लाभले....
“मुलांना लिहिते केले पाहिजे अंकल”....मला सतत मार्गदर्शन करणारे आबासाहेब वाघमारे सर मला म्हणाले, “ त्यासाठी त्यांची कार्यशाळा घे!” ठरले आणि पहिली बाल-लेखक कार्यशाळा मराठवाडा साथी कार्यालयात झाली...निवडक लिहिते विद्यार्थी यासाठी निमंत्रित केले गेले( हो, त्यांच्या नावचे पत्र शाळेला गेले- किती अभिमानाने ही मुले कार्यशाळेला आली आणि खूप काही शिकून गेली) दुसरी कार्यशाळा बाबा रामदेव मंदिरात झाली...
साथी दैनिकाने अंकलला आयुष्यात काही कमी पडू दिले नाही....अंकलने जे जे सांगितले ते ते केले, दिले....म्हणून ‘अंकल’ कायमचा साथी चा झाला...
पुढे पुढे मुलांनी खूप पुस्तके वाचावीत म्हणून प्रत्येक शाळेत साथी ने संदेश यात्रा काढली-वाचाल तर वाचाल! भरपूर प्रतिसाद मिळाला...प्रत्येक शाळेत नवा वक्ता मुलांना मार्गदर्शन करत होता...तालुक्यातील 50 पेक्षा जास्त शाळेत ही यात्रा पोंहचली...गोष्टीची पुस्तके मुले मागू लागली...
"कारगिल प्रबोधन यात्रा" हा सुद्धा साथी परिवाराने आयोजित केलेला कार्यक्रम सर्वांना आवडला...साथी कार्यालयात त्या काळी ज्ञानोबा सुरवसे, प्रदीप कुलकर्णी, प्रशांत जोशी (दोन्ही), सुधीर गोस्वामी, बालासाहेब कडबाने हे माझे सहकारी होते...डिटिपी ऑपरेटर म्हणून राम मुळाटे, मधुकर कुकर, संतोष जुजगर यांची पेज जुळवणी मुलांना आवडायची....
साथी दैनिकाने आजतागायत श्री चंदूलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी छान छान कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि करत आहेत...दिवाळी अनुपम भेट स्पर्धा असतील...बाल धमाल असेल...मुलांना लिहिते करणे-त्यांच्या क्रियाशिलतेला वाव देणे आणि पर्यायी त्यांच्या निरागस आनंदात सहभागी होणे, त्या आनंदाचे कारण बनणे हे सोडलेले नाही.... कालच्या परळी भूषण कार्यक्रमात माझ्याच साथी परिवाराने मला " विशेष गौरव" म्हणून सन्मान दिला म्हणून हा काळ भरभर नजरेसमोरून गेला.. .. आजपर्यंत हजारो मुलांनी साथी च्या कार्यक्रमांचा, दैनिकातून लिहिते होण्याचा लाभ घेतला आहे...आज ज्या मुलांनी बाल धमाल च्या स्पर्धा मध्ये भाग घेतला असेल त्यांच्या आई पप्पांनी सुद्धा लहानपणी ‘अंकल’ च्या सदरात भाग घेतलेला आहे...हे कार्य असेच पिढ्यांपिढ्या सुरू राहावे ही शुभेच्छा , त्यासाठी पूजा बियाणी, राजू बियाणी हे बियाणी परिवाराचे सदस्य आणि राकेश जाधव, दत्ता काळे हे नव्या पिढीतील पत्रकार तयार व्हावेत..







             





            





              








 

              

शनिवार, १७ जुलै, २०२१

इतुके सारे एका चॅनेलने केले!

 इतुके सारे एका चॅनेलने केले !

( शेवट असा आहे.... म्हणून महाराष्ट्रातील जे अनेक शिक्षक YouTube चॅनेल तयार करून या मार्गावर जात आहेत, त्या सर्वांना आपल्या मदतीची गरज आहे. त्यांचे चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडीओ पहा. त्यांचा आदर करा. )

    मी जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थी असे असतात ज्यांचे पालक आर्थिक दुर्बल किंवा मध्यम परिस्थितीत असतात. बहुतके जिल्हा परिषद शाळेत शेत मजूर, वीटभट्टी मजूर, छोटे दुकानदार, खासगी कर्मचारी आणि सामान्य शेतकरी पालक यांची मुले शिकत असतात.
आमच्या बदल्या एका शाळेतून दुसऱ्या शाळेत होतात पण थोड्याशा फरकाने ही परिस्थिती जवळपास सारखीच असते, वर नमूद केलेल्या प्रवर्गातील विद्यार्थी हिच आमची मुले !. या मुलांना शाळेत आणणे, त्यांना शाळेच्या वातावरणात टिकवणे, त्यांना आनंदाने शिकत रहाण्यासाठी फक्त पुस्तकी अध्यापनाशिवाय आणखी काही अधिक प्रयत्नांची आवश्यकता असते.


    जग बदलत आहे; मुलांच्या आनंदाची कारणे दिवसेंदिवस बदलत आहेत. मुलांना शाळेत ठेवण्यासाठी आता फक्त मैदानी खेळ पुरेसे नाहीत. आपल्याला काहीतरी नवीन करावे लागेल, जे काहीतरी त्यांना अधिक मनोरंजक असू शकेल, काहीतरी अधिक प्रभावी!


    मुलांच्या हातात मोबाइल असतात आणि इंटरनेटसह असेल तर हे आश्चर्यकारक डिव्हाइस म्हणजे संपूर्ण जग त्यांच्या हातात आहे असे त्यांना वाटते! हे लक्षात घेऊन आम्ही शालेय अभ्यासाक्रमामध्ये मोबाइलवरील उपलब्ध स्त्रोतांना जोडण्याचा निर्णय घेतला. मुद्दामहून शाळेत येण्यासाठी पालकाकडे वेळ नसायचा कारण त्यांचे काम बुडले तर आर्थिक नुकसान होण्याची भीती असायची, आम्ही शाळेत जे काही करतो ते पालकांपर्यंत सहज पोहोचण्याचे हे एक साधन देखील बनले YouTube ! अभ्यासालापूरक आणि मुलांना आवडेल असे काहीतरी शाळेत सतत सुरु आहे हे पालकांना सहज कळू लागले... यामुळे विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षणाची गुणवत्ता आणि शाळेबद्दलचा त्यांचा आदर वाढला.


    यूट्यूबकडून प्राप्त झालेल्या 1 लाख 50 हजार रुपयांनी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आणि दर्जेदार शिक्षण देण्यास लागणाऱ्या छोट्या खर्चांना भागवण्यास योगदान दिले.
वडगाव दादहारी ता. परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २५० विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी बॅगसह नामांकित कंपनीच्या वह्या, कंपास, चित्रकला वही, कलर बॉक्स, पेन असे जवळपास प्रत्येकी ४०० रुपयांचे शैक्षणिक साहित्य जून 2019 मध्ये देण्यात आले. ज्या पालकांना यासाठी खास आर्थिक तरतूद करावी लागते त्यांना आणि कळत्या मुलांना याचे महत्व कळाल्याने आनंद चेहऱ्यावर दिसत होता!

याशिवाय आणखी काय बरे झाले या पैशाने ?

) वर्गात कविता सादर करण्यासाठी लहान मोबाइल कनेक्ट स्पीकर्स उपलब्ध करुन देण्यात आले. ज्यामुळे वर्गात संगीतमय कविता, पाठ सादर होऊ लागले.

) काही क्रीडा उपकरणे पुरविली गेली ज्यामुळे खेळाच्या मैदानावर मुलांचे खेळ अधिक मनोरंजक बनले.

) या पैशातून आभासी वास्तविकता जग दर्शविणारे एक लहान डिव्हाइस सादर केले गेले.(VR बॉक्स) जगभरातील भौगोलिक महत्त्व असलेली ठिकाणे, जिथे आपण सामान्य कुटुंबातील व्यक्ती कधीही भेट देऊ शकत नाहीत अशी ठिकाणे, शरीरातील आंतरक्रिया जणू आपल्यासमोर घडताहेत अशी आभासी वास्तविकता व्हीआर बॉक्सच्या सहाय्याने त्यांच्या समोर होती. यामुळे मुलांना ते ठिकाणे सविस्तर दिसण्यात आणि महत्त्वपूर्ण तपशील समजण्यास मदत झाली. VR Box त्यांना संबंधित विषयांच्या संकल्पना स्पष्ट करण्यात मदत करतात.

) गूगल अर्थ, सफारी सेंटर, सौर यंत्रणेची व्याप्ती, (Merge Box) विलीनीकरण घनसाठी गॅलेक्टिक एक्सप्लोरर यासारख्या विशिष्ट अॅप्सने त्यांच्या हातात भौगोलिक जग पाहण्यास मदत केली. यातील काही अँप्ससाठी Merge Box तयार करावे लागतात ते या खर्चातून केले.

) या निधीतून दर पंधरवड्याला शालेय मंत्रिमंडळामार्फत छोट्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या यासाठी पेपर तयार करून प्रिंट केला जाऊ लागला. दोन गटात प्रत्येकी ६ विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे दिली जाऊ लागली. बाहेरच्या मैदानावर, पारदर्शक वातावरणात होणाऱ्या या परीक्षेतील मुलांचा प्रतिसाद नोंदवला गेला आणि सर्वाधिक परीक्षेत यश मिळवणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना (दोन्ही गट) " शाळारत्न " पुरस्काराने गौरविण्यात येऊ लागले. वर्षभरातील सर्व खर्च YouTube चॅनल मार्फत केला गेला.

) शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या मुलांना लागणारी पुस्तके, प्रश्नसंच, झेरॉक्स यांचा खर्च यातून केला गेला.

) बोधकथा व पाठ यावर आधारित नाटक स्पर्धा डिसेंबर ते जानेवारी दरम्यान घेऊन विजेत्या वर्गातील सर्व मुलांना बक्षीस दिले जाऊ लागले. दोन गट करून स्पर्धा घेण्यात आल्या. वडगाव व कासारवाडी या दोन्ही शाळेत या स्पर्धा झाल्या.

) भाषा संवर्धन, गणित, विज्ञान, Spoken English Club, शालेय मंत्रिमंडळ अशा वेगवेगळ्या मंडळांची स्थापना करून विविध उपक्रम घेतले जातात आणि त्यासाठी सर्व खर्च (त्यांचे आय कार्ड्स, वेगवेगळ्या उपक्रमाचे साहित्य) केला जातो.


) दैनिक मराठवाडा साठी यांच्या वतीने तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बाल -धमाल स्पर्धेसाठी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक म्हणून अकरा हजार रुपये देण्यात आले.

) ११ हजार रुपयांची छोटी मदत महाराष्ट्र विद्यालय मोहा येथे पाठवली गेली, जेथे शेतमजूरांची मुले शिकतात.

मुलांच्या गरजा लक्षात घेऊन, जिथे प्रशासकीय अडचण येते तिथे हा खर्च केला जाऊ लागला. परिणामी मुलांची उपस्थिती, संख्या आणि गुणवत्ता यांचे प्रमाण वाढले, शाळेत मुले आनंदाने शिकत आहेत... त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद किती अमूल्य असतो नाही का ?

१०) PDSE (Place for Developing Spoken English या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमातून शिकत असलेल्या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी झूम ऍप्लिकेशच्या माध्यमातून ऑनलाईन शिकवणी सुरु आहे. त्यासाठी झूमचे पेड व्हर्जन मी घेतो, हा खर्च YouTube च्या माध्यमातून केला जात आहे. महाराष्ट्रातील १४०० पेक्षा जास्त विदयार्थी यात सहभागी झाले आहेत.

आठवड्यात तीन वेळा आम्हा चार शिक्षकांचा क्लास, एकदा परीक्षा आणि त्याशिवाय Talk With Guest, Gust Lecture, Chat with other country students, Breakout Room Interviews, Group Leaders chat, Parents Initiatives असे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास प्राप्त करून दिला जात आहे.


हे कसे घडले ?
     2004 पासून तंत्रज्ञानाच्या विविध स्त्रोतांचा वापर करण्यास सुरवात केली जेव्हा या अफाट जगाने अध्यापन-अध्ययन शिक्षण प्रक्रिया सुलभ आणि सुखी करण्यास मदत केली. परळी येथील कन्या स्कूल येथे विद्यावाहिनी प्रकल्प प्रयोगशाळा प्रभारी म्हणून काम केले त्यावेळी तिथे 15 संगणकांसह लॅब होती जिथे माझा तंत्रज्ञानाद्वारे प्रवास सुरू झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे 5 संगणकांद्वारे विद्यार्थ्यांना शिकविले यावेळी गुगल सर्च इंजिन द्वारे पाठाला अनुसरून चित्रे, व्हिडीओ यांचा वापर केला. मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट या प्रोग्रामचा अधिक वापर केला. एक्सेल द्वारे परीक्षा रजिस्टर तयार केले ज्यामुळे माझा वेळ वाचला आणि अध्यापनासाठी तो वापरता आला. २०११ मध्ये माझ्या स्वत: च्या यूट्यूब चॅनेलवर शाळेतील काही व्हिडीओ अपलोड केले.

    वडगाव दादाहारी येथे २०१४ मध्ये बदली झाल्यानंतर मी शालेय उपक्रम, कार्यक्रम, नाटक, स्पर्धा घेणे यात वाढ केली आणि हे सर्व मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले. मुले वर्गात आनंदाने शिकत असताना, त्यांच्या विविध कृती चालू असताना, त्यांच्या स्पर्धा चालू असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आल्या, Kinemaster आणि इतर App द्वारे मी हे संपादित केले आणि यूट्यूबवर अपलोड केले. स्वतःला व्हिडिओमध्ये पाहायला कोणाला आवडत नाही ? घरी हे व्हिडीओ पाहून पालकांना आनंद वाटू लागला. आपल्या मित्रांकडे, पाहुण्यांकडे पालक हा व्हिडीओ शेअर करू लागली.

    ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंगचा उपयोग मुलांचे मूल्यांकन करण्यासाठीही प्रकर्षाने केला, उदाहरणार्थ त्यांचे इंग्रजी वाचन! मुले त्यांच्या स्वत: च्या चुका सुधारू लागली. पालक आणि पाहुण्यांकडून होत असलेल्या कौतुकामुळे मुले शाळेत जाण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक उत्सुक होते.
मी राज्यातील, जिल्ह्यातील शिक्षकांना विविध प्रशिक्षणात तंत्रज्ञानाविषयी मदत केली. त्यामुळे त्यांनी माझे व्हिडीओ पाहिले, शेअर केले.
जेव्हा जेव्हा बर्‍याच लोकांच्या संपर्कात येत असे तेव्हा मी युट्यूबचा उल्लेख करत असे. एक व्हिडीओ एक कोटी लोकांनी पाहिला आणि बरेच व्हिडिओ त्याच मार्गावर आहेत.
तंत्रज्ञान वापरताना, मुलांना आनंदाने शिकवताना आपसूक हे कार्य माझ्या हातून होत आहे...पुढे चालूच राहणार आहे.. म्हणून महाराष्ट्रातील जे अनेक शिक्षक YouTube चॅनेल तयार करून या मार्गावर जात आहेत, त्या सर्वांना आपल्या मदतीची गरज आहे. त्यांचे चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडीओ पहा. त्यांचा आदर करा.

चंद्रशेखर शिवलिंगअप्पा फुटके
परळी वैजनाथ जिल्हा बीड
9325063512


काही YouTube लिंक्स


https://youtu.be/JTADGGFJ_0g राजा आणि उंदीर : छोट्यांची धमाल नाटिका

https://youtu.be/P7MgT0y8IOw मोठ्या वर्गाची एक नाटिका

https://youtu.be/Wu0CLPpD2ao एक लाखाचे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम

https://youtu.be/94Meyh8YQqs पहिल्या सात हजाराचा चेक

https://youtu.be/Sea2p0rCz-o एक कोटी लोकांनी पाहिलेली हिच नाटिका

https://youtu.be/x8qddeGowAI वर्गात होणारी ऍक्टिव्हिटी

https://youtu.be/-zYZ0v924hE शालेय मंत्रिमंडळ

https://youtu.be/mrWlrlYuJiw VR Box वापर

https://youtu.be/OMfzOP3Mc5U वर्गातील मजेदार खेळ 

काही क्षणचित्रे 


एक लाखाचे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम June 2019



Knoweldge Bridge या संस्थेने केलेला सन्मान मा भापकर साहेब विभागीय आयुक्त यांच्या हस्ते
 

 
       


शालेय मंत्रिमंडळ व त्यांचे उपक्रम