स्कॉलर केजी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

लेकरांना प्रेम द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना वेळ द्या असे तीन मंत्र स्कॉलर केजी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री सोमनाथ वाळके यांनी पालकांशी हितगुज करताना दिले.
शनिवारी स्कॉलर केजी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आष्टी येथील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री सोमनाथ वाळके सर प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात हा सोहळा संपन्न झाला. बीड येथील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री शशिकांत कुलथे, परळीचे नगरसेवक प्रा. पवन मुंडे, संतोष पोकळे यांचीही यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
सुरुवातीला अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले अतिथींच्या स्वागतानंतर प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता चंद्रशेखर फुटके यांनी केले. आठ वर्षात शाळेने केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. पालकांनी केलेल्या पुरेपूर सहकार्यामुळेच शाळा आता नवीन इमारतीत, पुरेसा मैदानाच्या सुविधेसह तयार असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
श्री सोमनाथ वाळके यांनी शून्य ते पाच वयोगट हा बालकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच भाषिक समृद्धीसाठी कसा महत्त्वपूर्ण आहे हे पालकांना समजावून सांगितले.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री शशिकांत कुलथे यांनी पालकांना व बालकांना आवडेल अशी मजेदार गोष्ट सांगून पालकांनी काळाशी सुसंगत असे अपडेट राहणे कसे महत्त्वाचे आहे हे उदाहरणासह पटवून दिले.
नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांनी प्राचार्या सौ सुजाता व श्री चंद्रशेखर फुटके यांचे कौतुक करून परळी शहरातील शैक्षणिक चळवळीत त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
स्कॉलर केजीचा विद्यार्थी विनायक गणेश स्वामी याने शाळेविषयी मनोगत व्यक्त केल्यानंतर, संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये बक्षीस विजेत्या महिला पालक सौ आशा केंद्रे, सौ शितल शिंदे व सौ भाग्यशाली शिंदे यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दैनिक सकाळने प्रा. पवन मुंडे यांना 'गौरव भूमिपुत्राचा' हा सन्मान दिल्यामुळे शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले श्री सौदागर कांदे यांचाही सन्मान करण्यात आला.
उद्घाटन सत्राचे आभार शाळेचे मार्गदर्शक श्री चंद्रशेखर फुटके यांनी व्यक्त केले, तर उद्घाटन सत्र व संपूर्ण सोहळ्याचे बहारदार असे सूत्रसंचालन श्री महेश जाधव व श्री दीपक गायकवाड यांनी केले.
सुमारे अडीच तासापेक्षा अधिक काळ झालेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनात स्कॉलर केजी स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्री गणेश वंदनेने सुरुवात करून देशभक्तीपर गीते, मराठी व हिंदी चित्रपटातील गीते, त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारी नाटके सादर करून पालकांची व उपस्थितांची मने जिंकून घेतली.
भव्य असा रंगमंच, शेवटपर्यंत बसलेल्या प्रेक्षकांना स्पष्ट दिसावे यासाठी स्क्रीनची व्यवस्था, वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून आकर्षक केलेले सभागृह, वेळेचे काटेकोर नियोजन आणि शाळेविषयी तसेच चालू असलेल्या कार्यक्रमाविषयी छोटे छोटे प्रश्न आणि त्याची उत्तरे देणाऱ्यांना तात्काळ बक्षीस हे या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
स्कॉलर केजी स्कूलच्या छोट्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांचे आई वडील, आजी आजोबा यांनी उपस्थिती दर्शवून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सौ प्रणिता पाठक, सौ वर्षा लाड, सौ जयश्री जोशी, सौ प्रियंका कुलकर्णी, सौ प्रतीक्षा फुटके, सौ संगीता रोकडे यांच्यासह सौ सुनयना गुट्टे, सौ शामबाला पिंपळे यांनी परिश्रम घेतले.
अतिशय सुंदर व नियोजनबद्ध असा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम खूप उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य व नाटके सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सर्व स्टाफ आणि मार्गदर्शक यांचे खूप अभिनंदन.
उत्तर द्याहटवा