टीव्हीवर चालणाऱ्या मालिका आणि मोबाईलचा अतिवापर यामूळे संसारामध्ये विसंवाद निर्माण होत आहेत त्यामुळे महिलांनी शक्यतो या वेळेचा सदुपयोग आपल्या कलेला वाव देण्यासाठी, स्वतःला समृद्ध करण्यासाठी - नवे काही शिकण्यात घालवावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट शुभांगी गित्ते यांनी केले.
स्कॉलर केजी स्कूल या ठिकाणी महिला दिनानिमित्त त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की टीव्हीवरील अनेक मालिका आपल्या संस्कृतीला धरून नाहीत. संसार करत असताना किंवा तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सामंजस्याने वागल्यास सर्व काही ठीक होते. कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ देऊ नका, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला पालकांनी आनंदाने हवेत फुगे उडवून कार्यक्रमाची सुरुवात केली. पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाल्यानंतर ॲड शुभांगी गित्ते यांचे स्वागत स्पर्धेच्या परीक्षक सौ शोभा फुटके यांनी केले. शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांनी प्रास्ताविक केले. स्कॉलर केजी स्कूलमध्ये वर्षभर होणाऱ्या उपक्रमांची आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची माहिती देत त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले.
प्रमुख अतिथींच्या सविस्तर मार्गदर्शनानंतर महिला पालकांना आवडणारे खेळ होम मिनिस्टर अंतर्गत घेण्यात आले ज्यात संगीत खुर्ची, स्ट्रॉने डोक्यावर फुल तयार करणे, प्रश्न उत्तर फेरी, कलागुण सादर करणे यांचा समावेश होता. या स्पर्धेत सौ स्वाती जयवंत कौले यांनी प्रथम, सौ अमृता जितेंद्र नव्हाडे यांनी द्वितीय, तर सौ सोनाली गजानन बेंडे यांनी तृतीय पारितोषिक मिळवले.
काव्यवाचन स्पर्धेमध्ये सौ स्नेहा अमोल क्षीरसागर यांनी प्रथम, सौ शुभांगी महेश उदगीरकर यांनी द्वितीय तर सौ ज्ञानेश्वरी बोकन यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेचे परीक्षण सौ शोभा शांतलिंग फुटके व सौ प्राची प्रवीण फुटके यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ वर्षा लाड व सौ प्रणिता पाठक यांनी केले. आपले मनोगत व आभार प्रदर्शन सौ शोभा फुटके यांनी व्यक्त केले. यावेळी काही मजेशीर गेम घेण्यात आल्याने उपस्थित महिलांना आनंद वाटला.
कार्यक्रमास शाळेतील महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वर्षा लाड, सौ प्रणिता पाठक, सौ प्रियंका कुलकर्णी, सौ राजश्री हलकंचे, सौ भाग्यशाली शिंदे, सौ सुनैना गुट्टे यांनी परिश्रम घेतले.