
एका छोट्या गावात असणाऱ्या बँकेत, जेथे फक्त चार जण कार्यरत होते, तिथे अमितची बदली झाली. तो आता तिथे प्रमुख म्हणून काम करणार होता.
जवळपास वयाच्या थोड्या अंतराचा फरक असणारे ते तिघे, तर एक जण जरा वयस्कर, असे ते चौघे काम करत होते. कामाचे स्वरूप जवळपास सारखेच होते.
अमितला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता. काय केले म्हणजे सगळ्यांचे काम चांगले होऊन कामाचा आनंद मिळेल आणि आपली ब्रँच नावारूपाला येईल याचा विचार अमितच्या डोक्यात पिंगा घालत होता.
सकाळी आल्यानंतर प्रत्येकजण सहकाऱ्यांना हाय -हॅलो करून आपापल्या रूममध्ये येवून कामाला लागत. दुपारचे जेवण तिथेच आपापल्या सोयीनुसार करून पुन्हा आपल्या कामाला लागत. जाताना पुन्हा एकदा बाय बाय.... बस एवढाच काय तो त्यांचा संवाद!
अमितने एके दिवशी अचानक सर्वांना दुपारचे जेवण एकत्र करण्याचा आग्रह केला.... हो - ना करता चौघे एकत्र आले आणि डब्यातील पदार्थ एकमेकांना शेअर करत जेवण सुरू झाले. अमितचा स्वभाव थोडा बोलका.... एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी असे करत करत दररोज वेगळे विषय निघायचे... कधी घरची परिस्थिती, मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्याच्या समस्या, सवयी.... हळू हळू बँकेतील कामकाजाच्या समस्या चर्चेला यायला लागल्या तर सर्वात सिनियर असलेले रघुकाका उपाय सांगू लागले...त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांनाच होऊ लागला.... मोकळ्या वातावरणात होणाऱ्या गप्पांमुळे अनेक फायदे बँकेला होऊ लागले तसेच सर्वांची बाँडींग वाढली अर्थात दुपारच्या वेळेस होणाऱ्या जेवणाला आता सर्वांची पसंती वाढली होती....
रघुकाका म्हणाले, "सुट्टी असली की आता घरी जेवण जात नाही" त्यांच्या आग्रहाखातर अर्ध्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा सर्वजण जेवण झाल्यानंतरच घरी जाऊ लागले...
अनेक योजनांना चालना, समस्यावर इतरांचे अनुभव, चांगल्या गोष्टींचे अनुकरण, नव्या गोष्टींवर साधक - बाधक चर्चा.... कधी घरच्या तणावपूर्ण परिस्थितीत संयमाचे धडे.... बऱ्याचदा खळखळून हसणं असे एक ना अनेक सामाजिक, भावनिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक फायदे दुपारचे जेवण एकत्र करण्यामुळे सर्वांना होऊ लागले....
तुमचा काय अनुभव आहे? कमेंट मध्ये लिहून नक्की सांगा.... तुम्ही घेता का सहकाऱ्यांसोबत एकत्र जेवण? काय आहे तुमचा अनुभव? कधी कधी नकारात्मकता असेलही; परंतु निश्चित चांगला मार्ग सापडतो...