गुरुवार, २५ जुलै, २०२४

युद्ध माझ्या मनाचे! काय असावा निर्णय?


 हे दोन फोटो आहेत इयत्ता आठवीच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थिनींनी मी दिलेल्या विषयावर लिहिलेल्या पत्रांचे. 


यातील पहिल्या पत्राकडे पाहिलं की माझे मन आनंदाने भरून येते; तर दुसरे पत्र पाहून खिन्नता वाटते. 


पहिलं पत्र लिहिणाऱ्या विद्यार्थिनीला शिकवण्याचा अभिमान म्हणून त्याचे श्रेय मी घेऊ की दुसरी विद्यार्थिनी अजून त्या स्तरावर नाही म्हणून त्याचेही उत्तरदायित्व मी घेऊ? की एक शिक्षक म्हणून मी फक्त सुविधा पुरवणारा आहे हे समजून घेऊ आणि 'शिकण्यात मदत करणे' एवढेच काम मी करावे; जो तो आपापल्या गतीने, मतीने शिकत असताना याचे श्रेय घेणे हेच उचित नाही असे माझ्या मनाला सांगावे?


जर मी एकाच वर्गात शिकणाऱ्या सर्वात खालच्या स्तरावरील विद्यार्थ्यांचे उत्तरदायित्व घेत नसेल तर सर्वात वरच्या स्तरावर असणाऱ्या विद्यार्थ्यांचे श्रेय घेण्याचा मला अधिकार आहे का? सद्सदविवेक बुद्धीला धरून नक्कीच नाही! 
मी स्थितप्रज्ञ राहून फक्त माझे काम करीत राहणे हेच योग्य आहे का? ना कुणी अधिक घेतल्याचा आनंद ना कोणाला कमी मिळाल्याचे दुःख! 


विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार मी माझ्या अध्यापनाला अधिक सक्रिय करणे, अधिक विद्यार्थीप्रिय करणे आवश्यक आहे. जो तो आपापल्या गतीनुसार शिकत असताना त्याला त्याच्या गरजेच्या ठिकाणी योग्य साहित्याच्या योग्य भाषेच्या मदतीने शिकण्यात मदत करणे यातच आनंद मानला तर माझे शिक्षक होणे सार्थकी लागेल.... खरं आहे ना? 



तुम्ही पालक किंवा शिक्षक म्हणून काय विचार करता? मला तुमचे विचार ऐकायला आवडतील.... कदाचित मला माझ्यात करावयाच्या बदलांची विचारशृंखला आपल्याकडे मिळू शकेल....