"तुझ्या काय बापाच्या घरचं खाऊन ढबरा झालो का मी?" असे कोणीतरी दुसऱ्याला रागा-रागाने बोलताना पाहिले की पूर्वी वाटायचे याला बोलण्याची पद्धत शिकवावी लागेल, हा चांगल्या वृत्तीचा नाही.... अशी प्रतिमा त्याच्या विषयी माझ्या मनात निर्माण व्हायची; पण हल्ली मात्र (कदाचित स्वतः वर वेळ आली म्हणून असेल की काय) असा व्यक्ती ज्या उद्ववेगाने हे बोलत असतो त्याच्या मनात नेमके काय सुरू असेल, त्याला याच्या वेदना किती जाणवत असतील हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो....
कोणाला त्याच्या शरीराच्या आकारावरून किंवा शरीरात निर्माण झालेल्या एखाद्या बदलावरून (डोक्यावरचे केस कमी होणे असेल किंवा चेहऱ्यावरचे वांग असेल किंवा असेच काही सहसा आपल्या हाती नसते) बोलणे आवडते किंवा नाही याचा विचार न करता बऱ्याचदा लोक जणू काही त्याच्या तब्येतीचे स्वतःला देणे-घेणे आहे याच अविर्भावात बोलत सुटतात.
"ढेरी फार सुटली आहे!"
"वजन खूपच कमी झाले आहे असं वाटत नाही का तुम्हाला?"
"वाऱ्याने उडायचा विचार आहे का काय?"
"सर्कशीचा तंबू होत आहे तुमचा!"
किंवा काही वेळा अगदी सौम्य शब्दांमध्येच विचारून तुमच्या जास्त वजनाचा किंवा कमी वजनाचा तुम्हाला जणू काही विचारच नाही या पद्धतीने चौकशी करतात. खरं म्हणजे अशी व्यक्ती त्याबद्दल अगोदरच विचार करत असते आणि त्यावर त्याची अंमलबजावणी ही सुरू असते; पण काही वेळा सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. समोरच्याला हे समजून सांगताना तो मात्र पुरता नाकी नऊ येतो....
बरं विचारणारा प्रत्येक वेळी वेगळा असतो पण उत्तर देणारा मात्र हाच असतो! एकच उत्तर दिवसभरात खूप वेळा देऊन कधी कधी त्याच्या संयमाचा तोल सुटू शकतो हे मला हल्ली समजायला लागले आहे... त्यामुळे अगदीच एखाद्या बद्दल तुम्हाला सकारात्मक बोलायचे असेल तर "वा! तब्येत छान दिसत आहे!" यापलीकडे बोलणे मी टाळत आहे....
ज्याची तब्येत जास्त असेल तो स्वतःच्या खाण्यावर नियंत्रण करत असेल, व्यायामाचे वेगवेगळे प्रकार करत असेल आणि आपल्या तब्येतीला सांभाळण्याचा व इतरांना बरे वाटेल असं दिसण्याचा प्रयत्न करत असेल तर अशावेळी त्याचा हा संघर्षाचा काळ असेल आणि परिणाम हवा तसा येत नाही म्हणून तो स्वतःच्या काळजीत असेल याचा विचार न करता खूप जवळची मित्रमंडळी मी वर दिलेली वाक्य बोलत असतील तर तो समजूनही घेत असेल; परंतु जे आप्तस्वकीय कधीतरी भेटतात- मित्रमंडळी ज्यांची खूप कमी वेळा भेट होते यांनीही अशी विचारणा केल्यानंतर त्याच्या मनःस्थितीत फरक पडू शकतो.... वजन जास्त किंवा कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मंडळींनी अशा प्रसंगात खूप संयमाने वागावे लागते आणि आपल्या तब्येतीला सांभाळण्याचा प्रयत्न करत राहणे आवश्यक असते....
अशा प्रसंगी तुम्ही स्वतः अशी व्यक्ती असाल तर तुमच्या मनात काय विचार येतात? फार सहजतेने घेऊन आपण तो विचार तिथेच सोडत असाल तर खरंच आपण ग्रेट आहात!