मुलेच चालवतात मुलांचे वाचनालय !! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुलेच चालवतात मुलांचे वाचनालय !! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

हा प्रवास असाच आनंदाचा होवो!


 

हा प्रवास असाच आनंदाचा होवो!

शिक्षक म्हणून नोकरीस लागून बाल गोपाळांच्या सहवासामध्ये किती लवकर 30 वर्षे झाली याचा मला विश्वास वाटत नाही.... असे वाटते की कालपरवाच तर मी शिक्षक म्हणून नोकरीस लागलो आहे! 


पहिल्या दिवशी जो उत्साह विद्यार्थ्यांसमोर जात असताना असायचा तो आजही कायम आहे.....  माझ्या विद्यार्थ्यांना नवे उपक्रम कसे देता येतील, नव्या पद्धतीने त्यांच्याकडून अभ्यास करून कसा घेता येईल, कुठे काही दिसले तर हे माझ्या विद्यार्थ्यांसाठी कशाप्रकारे उपयोगात आणता येईल, कुठे चांगली शाळा-उपक्रमशील शिक्षक दिसले की त्यांच्याकडून मला काय शिकता येईल हे आजही तीस वर्षानंतर मला वाटते... हे असं वाटणं आणि हे असं कायम व्यस्त राहणं यात मला आनंद मिळतो आणि ते माझ्या सेवेच्या शेवटपर्यंत राहो हीच आजच्या दिवशी मी भगवंताकडे प्रार्थना करेल....


शिक्षक सेवेबद्दल कधी कोणी वाईट बोललं की थोडीशी निराशा येते; पण ती फार काळ टिकत नाही. कुठल्यातरी माध्यमातून कुणीतरी अमुक तमुक आमच्यावर तोंडसुख घेतो... पण खरं सांगतो, एकदा मुलं समोर आली की ती नैराश्यता, ते सगळं निगेटिव्ह ऐकलेलं पार विसरून जातो! अगदी पहिल्या दिवशीच्या उत्साहानेच दर दिवशी शिकवतो! आणि हो, जसे निराशाजनक कोणीतरी बोलते तसेच कधी कधी कोणी कोणी हरभऱ्याच्या झाडावरही नेऊन ठेवते! कोणी माझे खूप कौतुक केले त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच माझ्या नेहमीच्या भूमिकेत मी माझे अध्यापन करण्याचा प्रयत्न करत असतो...... भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की हे ही माझ्या सेवेच्या शेवटपर्यंत टिकू दे! 


तीस वर्षांच्या सेवेमध्ये बरेचसे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या उदरनिर्वाहाच्या सेवेत गुंतले असतील आणि अपेक्षा आहे की हे सर्वजण ती सेवा प्रामाणिकपणे करत असतील..... इमानी इतबारे जीवन व्यतीत करत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षकाला अभिमान वाटतच असतो.; परंतु नकळत या कार्यात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील आणि एखादा विद्यार्थी दुखावला गेला असेल तर मी मनःपूर्वक क्षमा मागतो! 


तीस वर्षांच्या या सेवा कालामध्ये अनेक मार्गदर्शक लाभले, ज्या ज्या गावात सेवा दिली त्या गावातील गावकऱ्यांचे सहकार्य लाभले, वेगवेगळ्या शाळांमधील माझ्या सहकारी बांधवांमुळे माझे शाळेतले दिवस अतिशय आनंदाचे गेले, वेगवेगळ्या उपक्रमात त्यांच्यासोबत काम करताना उत्तम अनुभव मिळाले आणि मी समृद्ध होत गेलो..... म्हणून त्या सर्वांचेही मला आभार मानावेसे वाटतात..... Thank You Very Much!  

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

अर्णव बुक्कापाटीलचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे

 

सिंगापूर येथे राहत असलेल्या परळी वैजनाथ तालुक्यातील गाढे पिंपळगावच्या ज्योती थोंटेच्या मुलाने सिंगापूरच्या सर्वोत्कृष्ट शाळेत आपल्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळवला असून 160 विद्यार्थी क्षमता असलेल्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून 3000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती.
परळी वैजनाथ जिल्हा बीड तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थीनी असलेली ज्योती वैजनाथअप्पा थोंटे ही सध्या इंजिनियर म्हणून सिंगापूर येथे सेवेस आहे. तिचा मुलगा अर्णव बुक्कापाटील हा सध्या शालेय शिक्षण घेत आहे. सिंगापूर येथे गणित व विज्ञान विषयांसाठी खास सुप्रसिद्ध असलेल्या NUS High School of Math and Science, Singapore  शाळेत आपला प्रवेश व्हावा हे अर्णवचे स्वप्न होते. त्याने यासाठी खास अभ्यास केला. यासाठी झालेल्या दुसऱ्या राऊंड मध्येच त्याचा प्रवेश निश्चित करण्यात आला. वास्तविक पाहता या शाळेत तिसऱ्या राऊंड मध्ये मुलाखत घेण्यात येऊन मगच प्रवेश निश्चित करण्यात येत असतो. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेण्यासाठी अर्णव जणू सज्ज झाला आहे. आपले मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी लागते याचे आदर्श उदाहरण अर्णवने  मुलांसमोर ठेवले आहे.
आपल्या आवडत्या विषयाची फक्त अभ्यासाला दिलेली पुस्तके वाचून अर्णव थांबत नाही तर त्या संदर्भातील वाचनालयात असणारी पुस्तके वाचन करणे ही त्याची खास आवडीची गोष्ट आहे. त्याची ही सवय अगदी लहान असल्यापासून आहे.
खगोल विषयातील त्याचे ज्ञान अचंबित करणारे आहे. कोरोना काळात PDSE (Platform for Development of Spoken English) या कार्यक्रमात महाराष्ट्रातील मुलांना इंग्रजीतून संवाद करण्यासाठी त्याची मुलाखत घेण्यात आली होती त्यावेळी त्याच्या उत्तरांनी मुले प्रभावित झाली होती. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अर्णव अतिशय अप्रतिम  पद्धतीने देत होता.
अर्णव व त्याच्या आई वडिलांचे कौतुक करताना आम्हाला नक्कीच आनंद होत आहे.


मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

अशी करून द्या कुटुंबातील सदस्यांची इंग्रजीत ओळख Introduction of Family members

 

Helpful sentences for family introduction आपल्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करून देताना उपयुक्त असलेली काही English वाक्ये खाली दिली आहेत. 


At first पहिले वाक्य खालीलपैकी कोणतेही एक घेऊ शकता 
"I would like to introduce you....."
"It's a pleasure to introduce..."
"I would like to introduce..."
"I would like to present..."
"May I introduce..."
"May I present..."
"This is..."


Her/His name ....  तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीचे नाव सांगा  
Her/his name is...
She/he is ....


Age .... तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीचे वय सांगा
Her/his age is ..
She/he is ..... Years old.
She/he is 35.


Profession .... तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीचा व्यवसाय सांगा
She is a home maker.
She/He is farmer/business man/service man/shopkeeper....


Way of work.... तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीची काम करण्याची खुबी/खास पद्धत (चांगले गुण) सांगा
He/She is a hardworking person.
She/he works day and night......


Hobbies/qualities.... तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीच्या स्वभावातील काही गुण/वैशिष्ट्ये तसेच त्यांना असणाऱ्या चांगल्या सवयी, छंद सांगा
She/He is good at ..... 
She/he is a very cooperative person. 
He/she motivates us to do good things. Study more. 


End... परिचयाचा शेवट असा करा... 
I like...
I love.... 


Remember लक्षात ठेवा - बहुतके वेळा यात तुम्ही साध्या वर्तमान काळाचा उपयोग करत असता. 
You are using simple present tense mostly. 
Formula: Subject + verb (s for singular subject) + object


All the best 👍
वरील मुद्द्यांच्या आधारे आपल्या कुटुंबातील सदस्यांची ओळख आपल्या वर्गमित्रांना करून द्या. 

नमुन्यादाखल असलेला व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://youtu.be/r2x5nAqzm3k

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

हा वारसा असाच अखंड सुरु राहू द्या बाळांनो!

अमृता सोमनाथ गुट्टे व तिच्या बहिणी दिवाळी सुट्टीत गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन करताना 


            "शेखर कुठे आहे ताई?" 
            "बसला असेल माडीवर... गोष्टीचे पुस्तक हातात घेऊन... पिंपळगावला आल्यानंतर तो कधी रिकामा बसतो?" 

           गोष्टीचे पुस्तक हाती आल्यानंतर मी त्यात एवढा मग्न व्हायचो की कितीही आवाज कानावर पडले तरी माझे प्रत्युत्तर नसायचे! आजही (कधीकधी) बायको आवाज देते आणि माझे प्रत्युत्तर मिळत नाही पण दुर्दैवाने हाती मोबाईल असतो! 😀 माझी बहीण, भाऊ, चुलते किंवा चुलत्या माझ्याविषयी माझ्या मूळ गावी गाढे पिंपळगावला आल्यानंतर चौकशी करायचे आणि त्याचे उत्तर तसे जवळपास सगळ्यांनाच माहीत असायचे... शांत, निवांत ठिकाणी जाऊन गोष्टीचे पुस्तक वाचण्याचा मला छंद लागलेला. 

               गाढे पिंपळगाव येथील सार्वजनिक वाचनालयातून सकाळी पाच पुस्तके घ्यायची, दिवसभर ती वाचून काढायची... संध्याकाळी वाचनालय परत उघडायचे त्यावेळी ती सकाळची पुस्तके परत करायची आणि नवीन पुस्तके घ्यायची! खरं म्हणजे एकाच व्यक्तीला एवढे पुस्तके देण्याचा त्यावेळी नियम नव्हता परंतु माझी वाचनाची आवड पाहून ग्रंथपाल श्री कावरे मला खुशी खुशीने ते पुस्तके द्यायची... शिक्षक असलेले माझे चुलते श्री महालिंगअप्पा फुटके हे या ग्रंथालयाचे संचालक आहेत, ज्यांनी वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी म्हणून अगदी डालीमध्ये पुस्तके घेऊन घरोघरी वाटप केली होती... 






            

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     आज परत या आठवणी येण्याचे कारण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील माझी विद्यार्थिनी अमृता सोमनाथ गुट्टे हिने दिवाळी सुट्टी लागल्यानंतर पाचच दिवसात २१ पेक्षा अधिक गोष्टीची पुस्तके वाचली आहेत... नोंद केलेल्या कार्डचा फोटो आणि पुस्तकांचा व्हिडिओ तिने मला पाठवला त्यावेळी मला या आठवणी आल्या... गुरूंनी दिलेला वारसा पुढे चालवण्याचा तिचा हा छंद असाच वृद्धिंगत होवो हीच शुभेच्छा... 


                   दिवाळीच्या सुट्टीत मुलांना गोष्टीचे पुस्तक वाचायला असावीत म्हणून इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन किंवा चार पुस्तके शालेय वाचनालयातली देण्यात आलेली आहेत... मोठी मुले नीट सांभाळ करतील आणि त्यांच्या छोट्या बहिण-भावांना देतील, शिवाय अशी ही सूचना देण्यात आलेली आहे की आपल्या स्वतः जवळील पुस्तके संपल्यानंतर मित्रांची पुस्तके आणायची, अदलाबदल करायची आणि पुस्तके वाचण्याची संख्या वाढवायची... वाचलेल्या पुस्तकांची नोंद करण्यासाठीचे कार्डही देण्यात आलेली आहेत... 


           अमृताने सांगितले की स्वतः जवळची पुस्तके संपल्यानंतर गावातल्या सार्वजनिक वाचनातून जाऊन तिने पुस्तके आणली! गोष्टीचे पुस्तक हवे आहे म्हणून कदाचित या सार्वजनिक वाचनालयात पहिल्यांदाच एखाद्या शालेय विद्यार्थ्याचे पाऊल पडले असावे असं मला वाटतं! असंख्य विद्यार्थ्यांची पाऊले अशीच वाचनालयाकडे वळोत आणि वाचनालये गजबजून जावोत हिच दिवाळीनिमित्त शुभकामना!! 💥🌺🌹🌸
google.com, pub-9286887712063098, DIRECT, f08c47fec0942fa0

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

म्हणींचा मजेदार खेळ!


तुम्ही खूप चांगल्या स्वभावाचे आहात आणि संकटात सापडलेल्यांना मदत करायला तुम्ही नेहमी तयार असता. हो ना? तुमच्या या स्वभावामुळेच तुमच्या भोवतालचे जग सुंदर आहे आणि ते नेहमी तसेच राहणार आहे. काही मिनिटांचा वेळ काढा आणि एक छोटेसे काम करा पाहू. 






म्हणींचा आणखी अभ्यास करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेली सोपी परीक्षा द्या. उत्तरे चूक की बरोबर हे पण लगेच कळेल तुम्हाला! google.com, pub-9286887712063098, DIRECT, f08c47fec0942fa0

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

इंग्रजी आणि मराठीतून शिका काळाचे प्रकार! पक्के लक्षात ठेवण्यासाठी काही आयडिया !

 

श्री चंद्रशेखर शिवलिंगअप्पा फुटके यांची मायक्रोसॉफ्ट इंनोवेटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट म्हणून निवड
विद्यार्थी असताना मुलांना सतावणारा व्याकरणाचा प्रकार म्हणजे विविध काळ! एकदा मन लावून समजून घेतले आणि विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा एकदा नजर टाकली (Revision) केले की हा भाग पक्का होत असतो... दिवाळी सुट्टीनिमित्त एकदा यावर नजर टाकून घ्या! सुट्टीच्या काळात दिवसभरात एक / दोन तास अभ्यासाला द्यायला काय हरकत आहे विद्यार्थी मित्रांनो? google.com, pub-9286887712063098, DIRECT, f08c47fec0942fa0

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

Similes काय असतात बरे? समजून घ्या आणि प्रश्नही सोडवा


Similes काय असतात बरे? समजून घ्या आणि प्रश्नही सोडवा 

a word or phrase that compares something to something else, using the words ‘like’ or ‘as’, for example ‘face like a mask’ or ‘as white as snow’; the use of such words and phrases.
एखाद्या गोष्टीची दुसऱ्या गोष्टीशी ‘like’ किंवा ‘as’ यांसारखे शब्द वापरून तुलना करणारा शब्द किंवा पदबंध, उदाहरणार्थ ‘face like a mask’ किंवा ‘as white as snow’ अशा शब्दांचा किंवा पदबंधांचा वापर; उपमा.

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

विज्ञान सेंटरला दिलेली भेट विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंददायी ठरली!

विज्ञान हे प्रयोगातून अधिक स्पष्ट समजून घेता येते परंतु प्राथमिक शाळांमध्ये (विशेषतः जिल्हा परिषदांच्या) स्वतंत्र प्रयोग शाळा उभी करणे थोडी कठीण गोष्ट असते... बहुतेकदा अशा शाळांमध्ये जितके शक्य होईल तितकं आमच्या बंधू भगिनी प्रयत्न करत असतात विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग-प्रात्यक्षिक करून दाखवण्याचा पण काहीवेळा त्यावर आर्थिक मर्यादा येत असतात... जवळपास एखादे विज्ञान सेंटर असेल तर त्यास भेट देणे हा त्यातील एक सोपा मार्ग आहे असे मला वाटते ... मराठवाड्यातील १ ले असे विज्ञान सेंटर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड जवळ केरवाडी येथे उभारण्यात आले आहे या याठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचे ठरवले आणि अतिशय प्रभावी पद्धतीने मुलांनी याचा आनंद घेतला.   

                स्वतः करून पाहता येतील- हाताळता येतील असे मोठे प्रयोग, आकर्षक वाटतील असे त्यांना देण्यात आलेली रूपे, संकल्पना सहज स्पष्ट होतील अशा पद्धतीने त्यांची करण्यात आली रचना, निवेदकाची मुलांना खिळवून ठेवण्याची पद्धत यामुळे परभणी जिल्ह्यातील पालम/गंगाखेड जवळील केरवाडी येथील डिस्कवरी सायन्स सेंटरला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांनी दिलेली भेट विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंददायी ठरली! 

          जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट, तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग अधिक सहजपणे, सोप्या पद्धतीने समजावेत, त्यातील संकल्पना, सिद्धांत लक्षात यावेत यासाठी डिस्कवरी सायन्स सेंटरला भेट दिली. इयत्ता पाचवी ते आठवीच्या 45 विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत विविध असे 100 च्या जवळपास प्रयोग करून पाहिले. 

       प्रत्येक घटनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न कसा करावा आणि आपल्या अवतीभवती असणाऱ्या, घडणाऱ्या प्रत्येक घटनेला आपल्या अनुकूल कसे करून घ्यावे किंवा आपण स्वतः त्याच्याशी कसे जुळवून घ्यावे, विज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात किती आणि कसा उपयोग करावा याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना केंद्राचे समन्वयक श्री विरभद्र देशमुख यांनी आपल्या खास शैलीतून प्रत्येक प्रयोग समजावून सांगताना करून दिले. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून व आपल्या खास शैलीतून सतत हसत खेळत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न विद्यार्थ्यांना खूप आवडला. 

          शाळेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड आणि शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. 

https://youtu.be/U6LPyFIUKig











  



























गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

मुलेच चालवतात मुलांचे वाचनालय !!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे ग्रंथपाल म्हणून काम करणारे विद्यार्थी चि अक्षय दिनकर सांगळे आणि चि बबन रोडे 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती सरिता महाजन यांचे वडील श्री ज्ञानचंद महाजन यांनी वाचनालयाची माहिती ऐकून ३ हजार रुपयांची पुस्तके शाळेस भेट दिली. या पुस्तकांचे प्रदर्शन त्यांच्याच हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री ह सि गित्ते, सहशिक्षक श्री चप्पे व सहकारी शिक्षिका भगिनी 
  

गोष्टींची पुस्तके मुलांची कल्पनाशक्ती वाढवतात, त्यांची एकाग्रता वाढवतात, अभ्यासातील गोडी वाढवतात.. अशा अवांतर गोष्टींच्या पुस्तकांमध्ये विविधता असल्याने मुलांना स्वतःच्या गतीने नुसार, आवडीनुसार पुस्तके घेता येतात आणि ज्ञानाची पातळी वाढवता येते. अभ्यासाचीच पुस्तके नीट वाचत नाहीत तर ही कुठली वाचणार असा जर शिक्षक किंवा पालकांचा समज असेल तर तो नक्कीच दूर होतो... मुलांच्या हाती गोष्टींचे पुस्तक देऊन तर पहा !! 

     हुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोष्टीची पुस्तके 'देण्याघेण्यात खराब होतील' म्हणून दिली जात नाहीत अथवा जी पद्धत या लेखात नमूद केली आहे अशा पद्धतीने खूप कमी शाळांमध्ये विचार केला जातो. विद्यार्थ्यांसाठी असणारा पुस्तकरूपी हा अमूल्य ठेवा काही काळाने वाळवी खातात परंतु विद्यार्थ्यांच्या उपयोगात येत नाही हे दुर्दैव! ग्रंथपाल नसणे आणि शिक्षकांनाही अध्यापनासह इतर अनेक कामे सोपवली जातात, ज्यामुळे गोष्टींची पुस्तके नियमित मुलांना देणे आणि परत घेणे व त्यावर आधारित उपक्रम आयोजित करणे त्यांच्यासाठी अशक्य होऊन जाते. विद्यार्थ्यांच्याच मदतीने वाचनालयाचा उपक्रम सक्रियपणे राबवण्यात आला तर! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे कार्यरत असताना २००८ साली ही गोष्ट सहजच डोक्यात आली आणि सहकारी व मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा केली; पुस्तके हरवण्याच्या भीतीची बाब सोडता सर्वांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमास मूर्त स्वरूप देण्याचे ठरवले आणि जणू या अनोख्या बाल वाचनालयाचा जन्म झाला! 



*यशस्वीपणे सांभाळल्या जबाबदाऱ्या!* 
 १ जानेवारी २००८ रोजी बाल वाचनालय मुलांसाठी मुलांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या आणि शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या सोनाली बलवीर आगळे हिने दररोज या वाचनालयातील पुस्तके दुपारी १.३० ते २ या वेळेत मुलांना देण्यास सुरुवात केली. वर्गवार वेळापत्रक ठरविण्यात आले. विद्यार्थ्यांना सात दिवस पुस्तक वाचता येणार होते. प्रत्येक वर्गात शिक्षकांनी मुलांना वाचनासाठी प्रोत्साहित केले. पहिल्या वर्षांत इयत्ता ३ री ते ७ वीच्या ४२८ मुलांनी पुस्तके वाचली. शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करून त्यातील एका मंत्र्याला वाचनालयाची जबाबदारी देण्याचे ठरवण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षांत नव्या शालेय मंत्रिमंडळातील मंत्री मनीषा महादेव काळे हिने वाचनालयाचा कारभार हाती घेतला होता. पुढे हिच परंपरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहरी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे सुरू राहीली. मागील 14 वर्षापासून ही परंपरा अखंड सुरू आहे. पुस्तके कोणत्या दिवशी- कोणामार्फत- कोणत्या वेळेत वाटप करावीत, त्याची नोंद कशी ठेवावी, देवाणघेवाणीचे वेळापत्रक असे उत्तम नियोजन करण्यात आले. ज्या वर्गाचा परिपाठ असतो त्याच दिवशी त्यांना मोठ्या मध्यंतरीत पुस्तके मिळू लागली. सुरुवातीचे काही दिवस सोबत मी बसायचो, नोंद कशी करावी, नावे कशी लिहावीत, विद्यार्थ्यांना ओळीत उभे करणे, त्यांच्या आवडीनुसार पुस्तके निवडण्याची मुभा देणे या गोष्टी संबंधित ग्रंथपाल विद्यार्थ्यास समजावून सांगितल्या.



  *पुस्तक परिचय उपक्रम*
     मुलांना पुस्तकाच्या वाचनाचा फायदा कळावा म्हणून शाळेत दररोजच्या परिपाठात ‘पुस्तक परिचय’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. सुरुवातीला शिक्षकांनीच पुस्तकांचा परिचय करून दिला. मात्र, नंतर मुलांनी अतिशय चांगल्या, मोजक्या शब्दांत पुस्तकांचा परिचय करून देण्यास सुरुवात केली. मुले पुस्तकांवर चर्चाही करू लागली. वाचलेल्या पुस्तकातील विनोद, गोष्टी, कविता आई-वडील, मित्रांना सांगण्यासाठी शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन दिले. पुस्तके वाचण्याची विद्यार्थ्यांना चांगलीच गोडी लागली. सात दिवस पुस्तक सोबत असल्याने घरातील ज्या सदस्यांना हे पुस्तक वाचण्याची आवड आहे ते ही अशी पुस्तके वाचू लागली. गोष्टी वाचत असताना मुले अभ्यासातील पुस्तकापेक्षा अधिक एकाग्र होतात, त्यांची एकाग्र शक्ती वाढते. समजून घेऊन वाचण्याची वृत्ती वाढल्याने आकलन शक्ती वाढते. याच मुलांची नंतर अभ्यासातील प्रगतीही शिक्षकांना-पालकांना दिसते. स्वतःची मत कसे मांडावे, वाक्यांची सोपी रचना कशी असावी अशा भाषेच्या कौशल्याच्या गोष्टीही मुले गोष्टीच्या पुस्तकातून सहजरीत्या शिकतात.


 
 *शतकवीर वाचक*
     बाल वाचनालय सुरु झाल्यानंतर आठ महिन्यांतच कु सुनीता हनुमंत काळे हिने शंभर पुस्तकांचे वाचन केले होते! तिचा शतकवीर वाचक म्हणून 'श्यामची आई' हे पुस्तक देऊन पुस्तक प्रदर्शनाच्या उदघाटनास आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. मुलांनी गोष्टीच्या पुस्तकांचे वाचन आवडीने करण्यास सुरुवात केली होती आणि वाचलेल्या पुस्तकांची नोंदी आपल्या वहीत ते ठेवत होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहारी आणि त्यानंतरची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथेही विद्यार्थ्यांना स्वतंत्र कार्ड अशा नोंदी करण्यासाठी पुरवण्यात आले आहेत. पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव आणि वाचल्याची तारीख अशा सोप्या नोंदी यावर आहेत. सहजपणे आपण वाचलेल्या पुस्तकाविषयी गप्पा मारल्या तर मुले काही बाबी सांगत असतात. दिवाळी आणि उन्हाळी च्या सुट्ट्यातही मुलांना पुस्तके वाचायला हवी होती, या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी शाळेतील ग्रंथपाल असलेल्या विद्यार्थ्याकडे ही पुस्तके ठेवण्यात येवू लागली आणि सुट्टीच्या काळातही विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचली. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन करताना मराठवाडा साहित्य परिषद शाखा परळीचे सचिव प्रा राजकुमार येल्लावाड, केंद्रप्रमुख प्रतिनिधी श्री दिलीप तलवारे सर, मुख्याध्यापक श्री निलेवाड, सहशिक्षक श्री निकते सर 

  
*पुस्तकांची संख्या वाढू लागली* 

        आठ दिवस पुस्तक विद्यार्थ्यांच्या घरी राहत असल्याने त्याच्या घरचेही पुस्तके वाचू लागले. निबंध लिहायला, किस्से सांगायला आणि ज्ञानाची शान मारायला पुस्तक वाचनाचा फायदा मुलांना होऊ लागला. काही विद्यार्थी पुस्तक लवकर वाचून पुन्हा मागू लागली; मग ज्यांना एक-दोन दिवसाआड पुस्तक हवे असेल त्याला रुपया, दोन रुपये महिना फी आकारली होती आणि जमलेल्या निधीतून नवी पुस्तके खरेदी केली गेली. मात्र, आठ दिवसांनी पुस्तक घेणाऱ्यांना कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. या शुल्कातून वाचनालयातील पुस्तकांत अधिक भर पडली. स्वतःच्या वाढदिवसाला शाळेत इतर काही देण्यापेक्षा गोष्टीचे पुस्तके द्यावीत असे सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला एक तरी पुस्तक द्यायला सुरुवात केली यामुळेही पुस्तकांची संख्या वाढली. बाल वाचनालय संदर्भातली संकल्पना गावातील प्रतिष्ठित शिक्षण प्रेमी नागरिकांना सांगितल्यानंतर त्यांच्यापैकी अनेकांनी पाचशे रुपये, हजार रुपये याप्रमाणे या वाचनालयास सप्रेम भेट दिले त्यातूनही पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेतील शिक्षिका श्रीमती सरिता महाजन यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक श्री ज्ञानचंद महाजन यांनी तीन हजार रुपयांची पुस्तके या उपक्रमाबद्दल माहिती ऐकून शाळेस सप्रेम भेट दिली. अशा पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले व विद्यार्थ्यांना नव्या पुस्तकांची वाचन गोडी लावण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहरी येथील विद्यार्थिनीच्या समूहाने एका सामूहिक नृत्यांमध्ये अडीच हजार रुपयांचे बक्षीस मिळवले, ही रक्कम त्यांनी शालेय बाल वाचनालयास सुपूर्द करून नवी पुस्तके खरेदी केली. मुंबई येथील नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्याकडून ही पुस्तके मागवण्यात आली होती. शाळेच्या बालवाचनालयाची वेगळी बातमी ज्या शिक्षण प्रेमी नागरिकांच्या कानावर पडत होती, ते शाळेला काही ना काही मदत करत होते. एक-दोन पालकांनी त्यांच्याकडे असणारी अनेक जुनी परंतु उपयुक्त पुस्तके शाळेला सप्रेम भेट दिली. यातूनही पुस्तकांची संख्या वाढली. 



 *सहस्त्र पुस्तक वाचन समारंभ आणि पुस्तक प्रदर्शन* 
      शाळेतील पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदीचा आकडा आता एक हजाराच्या जवळ आलेला होता, ग्रंथपाल असणाऱ्या विद्यार्थ्याने सुचवले की सहस्त्रवाचक समारंभ करू या! यानिमित्ताने टोकवाडी गावातील शिक्षण प्रेमी डॉक्टर राजाराम मुंडे यांनी शाळेला एक हजार रुपयाची पुस्तके भेट दिली, त्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि उत्कृष्ट वाचक विद्यार्थ्यांचे सत्कार, त्याचबरोबर मनोगते, अशा रीतीने हा समारंभ पार पडला.



  *पुस्तकांची काळजी आपणच घेऊ!* 

       पुस्तकांच्या देवाण-घेवाणीमध्ये त्यांचे मुखपृष्ठ कधी खराब होते, तर कधी त्यांची बांधणी निसटते, हे होणे अपेक्षितच होते म्हणून वाचनालय बंद करणे हे मात्र योग्य नाही... विद्यार्थ्यांच्याच मदतीने आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची काळजी घेण्यात आली. आवश्यक असणाऱ्या पुस्तकांना कव्हर बसवण्यात आले, पिना मारण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांनी त्यावर पुस्तकांची नावे छान प्रकारे टाकली. आपण ज्या वस्तू वापरत असतो त्यांची काळजी आपणच घ्यायची असते हा संदेशही यातून मुलांना दिला गेला. "हे करील कोण,  ते करील कोण, आपले आपणच, दुसरे कोण?" आपल्या समस्या आपणच सोडवायच्या असतात. ग्रंथपाल नाही, पुस्तके खराब होतील, त्यांची देवाण-घेवाण कोणी करायची? अशा अनेक समस्यांना प्रश्नांना बाल-वाचनालय समर्थपणे चालवून शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर शोधले आहे.

*शाळेच्या बाहेरचे पुस्तकांसाठी उपक्रम*

 १) स्थानिक दैनिक मराठवाडा साथी मध्ये दार रविवारी मुलांसाठी खास पुरवणी संपादक म्हणून काम केले आणि दार रविवारी १९९६ ते २०१५ कालावधीत हजारो मुलांना गोष्टींचे पुस्तके बक्षिस स्वरुपात देण्यात आली. 

२) उन्हाळयाच्या सुट्टीत स्वत:च्या घरी असलेल्या पुस्तकांचा वाचनाचा लाभ परिसरात राहत असलेल्या मुलांना दिला. 

३) नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या पुस्तकांचे (विशेषतः विद्यार्थ्यांसाठी) वतीने परळी वैजनाथ येथे घेण्यात प्रमुख भूमिका घेतली. गट साधन केंद्र परळी वैजनाथ, दि इंडिया सिमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे पुस्तक प्रदर्शन जिल्हा परिषद कन्या माध्यमिक शाळा परळी वैजनाथ येथे ३ दिवसांसाठी भरवण्यात आले होते. परळी शहरातील अनेक शालेय विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पुस्तकप्रेमींनी भेट देऊन पुस्तके खरेदी केली. जवळपास १ लाख रुपयांची पुस्तके विक्री झाल्याने मुंबई येथून संचालक यांचे विशेष कौतुक करणारे पत्रही मला आले होते. 

४) नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या पुस्तकांचे फिरते प्रदर्शन घेऊन आलेल्या गाडीला परळी शहरातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ मिळवून दिला.  

चंद्रशेखर शिवलिंगअप्पा फुटके, 
सहशिक्षक, परळी वैजनाथ 
(9325063512)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थी वाचनालयाची जबाबदारी सांभाळत पुस्तक वाचनाचा आनंद घेत असताना

दिवाळी/उन्हाळी सुट्टीत माझ्या घरी गोष्टीची पुस्तके वाचण्यास येणारी परिसरातील मुले
सामूहिक नृत्य स्पर्धेत मिळालेल्या नगदी बक्षिसाच्या रक्कमेचे शाळेच्या वाचनालयास पुस्तके देऊन मुलींनी पुस्तकांचे महत्व अधोरेखित केले. प्राथमिक शाळा दादाहरी वडगाव येथे पुस्तके स्विकारताना मुख्याध्यापक श्री राजले 
नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या पुस्तकांचे परळीत फिरते प्रदर्शन 
नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या पुस्तकांचे परळीत फिरते प्रदर्शन 



गोष्टीचे पुस्तक वाचल्यानंतर त्याची नोंद ठेवलेल्या व सर्वाधिक पुस्तके वाचल्याचे बक्षीस जिंकलेल्या प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थीनी.. ही पुस्तके त्यांनी दिवाळी सुट्टीत वाचली.



 
 नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या पुस्तकांचे परळीत भरलेले प्रदर्शन. प्रदर्शनाचे उदघाटन करताना नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे परळीतील लेखक, मराठवाड्याचे साने गुरुजी आदरणीय श्री आबासाहेब वाघमारे व दि इंडिया सिमेंट कंपनीचे तसेच नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे पदाधिकारी.  
            
२०१३ साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे भरलेले पुस्तक प्रदर्शन 
२०१३ साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे भरलेले पुस्तक प्रदर्शन 
आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून शाळेला पुस्तके देताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहरी येथील विद्यार्थिनी कुमारी प्राची शिंदे व तिचे आजोबा 
वापरून खराब झालेल्या पुस्तकांची आवरणे नव्याने बसवून त्यावर पुस्तकांची टाकलेली नावे व पुस्तकांना दिले नवे रूप 
वापरून खराब झालेल्या पुस्तकांची आवरणे नव्याने बसवून त्यावर पुस्तकांची टाकलेली नावे व पुस्तकांना दिले नवे रूप 
पुस्तक प्रदर्शनात मांडलेली नवी-जुनी पुस्तके पाहताना विद्यार्थी 
नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या पुस्तकांचे परळीत भरलेले प्रदर्शन