![]() |
अमृता सोमनाथ गुट्टे व तिच्या बहिणी दिवाळी सुट्टीत गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन करताना |
"शेखर कुठे आहे ताई?"
"बसला असेल माडीवर... गोष्टीचे पुस्तक हातात घेऊन... पिंपळगावला आल्यानंतर तो कधी रिकामा बसतो?"
गोष्टीचे पुस्तक हाती आल्यानंतर मी त्यात एवढा मग्न व्हायचो की कितीही आवाज कानावर पडले तरी माझे प्रत्युत्तर नसायचे! आजही (कधीकधी) बायको आवाज देते आणि माझे प्रत्युत्तर मिळत नाही पण दुर्दैवाने हाती मोबाईल असतो! 😀
माझी बहीण, भाऊ, चुलते किंवा चुलत्या माझ्याविषयी माझ्या मूळ गावी गाढे पिंपळगावला आल्यानंतर चौकशी करायचे आणि त्याचे उत्तर तसे जवळपास सगळ्यांनाच माहीत असायचे... शांत, निवांत ठिकाणी जाऊन गोष्टीचे पुस्तक वाचण्याचा मला छंद लागलेला.
गाढे पिंपळगाव येथील सार्वजनिक वाचनालयातून सकाळी पाच पुस्तके घ्यायची, दिवसभर ती वाचून काढायची... संध्याकाळी वाचनालय परत उघडायचे त्यावेळी ती सकाळची पुस्तके परत करायची आणि नवीन पुस्तके घ्यायची! खरं म्हणजे एकाच व्यक्तीला एवढे पुस्तके देण्याचा त्यावेळी नियम नव्हता परंतु माझी वाचनाची आवड पाहून ग्रंथपाल श्री कावरे मला खुशी खुशीने ते पुस्तके द्यायची... शिक्षक असलेले माझे चुलते श्री महालिंगअप्पा फुटके हे या ग्रंथालयाचे संचालक आहेत, ज्यांनी वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी म्हणून अगदी डालीमध्ये पुस्तके घेऊन घरोघरी वाटप केली होती...
आज परत या आठवणी येण्याचे कारण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील माझी विद्यार्थिनी अमृता सोमनाथ गुट्टे हिने दिवाळी सुट्टी लागल्यानंतर पाचच दिवसात २१ पेक्षा अधिक गोष्टीची पुस्तके वाचली आहेत... नोंद केलेल्या कार्डचा फोटो आणि पुस्तकांचा व्हिडिओ तिने मला पाठवला त्यावेळी मला या आठवणी आल्या... गुरूंनी दिलेला वारसा पुढे चालवण्याचा तिचा हा छंद असाच वृद्धिंगत होवो हीच शुभेच्छा...
दिवाळीच्या सुट्टीत मुलांना गोष्टीचे पुस्तक वाचायला असावीत म्हणून इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन किंवा चार पुस्तके शालेय वाचनालयातली देण्यात आलेली आहेत... मोठी मुले नीट सांभाळ करतील आणि त्यांच्या छोट्या बहिण-भावांना देतील, शिवाय अशी ही सूचना देण्यात आलेली आहे की आपल्या स्वतः जवळील पुस्तके संपल्यानंतर मित्रांची पुस्तके आणायची, अदलाबदल करायची आणि पुस्तके वाचण्याची संख्या वाढवायची... वाचलेल्या पुस्तकांची नोंद करण्यासाठीचे कार्डही देण्यात आलेली आहेत...
अमृताने सांगितले की स्वतः जवळची पुस्तके संपल्यानंतर गावातल्या सार्वजनिक वाचनातून जाऊन तिने पुस्तके आणली! गोष्टीचे पुस्तक हवे आहे म्हणून कदाचित या सार्वजनिक वाचनालयात पहिल्यांदाच एखाद्या शालेय विद्यार्थ्याचे पाऊल पडले असावे असं मला वाटतं! असंख्य विद्यार्थ्यांची पाऊले अशीच वाचनालयाकडे वळोत आणि वाचनालये गजबजून जावोत हिच दिवाळीनिमित्त शुभकामना!! 💥🌺🌹🌸
google.com, pub-9286887712063098, DIRECT, f08c47fec0942fa0
A beautiful habit👌👍😇
उत्तर द्याहटवावाह दादा वाह! तुमच्या बालपणीच्या अनुभवाची जोड आणि वर्तमानकाळातील दृश्य छान सांगड घातलात.
उत्तर द्याहटवाGreat!💐💐
माझा सुद्धा पुस्तके वाचण्याचा छंद मला तुमच्या कडूनच मिळाला पप्पा !!
उत्तर द्याहटवाMay legacy continue through !!
All the best to your students.
Happy diwali!!