"सर, माझी तब्येत बरी नाही आणि मी पप्पासोबत दवाखान्यात जात आहे"
"सर, मी मामाच्या गावी आली आहे"
"सर, मी एकटी तयार आहे आणि बाकीच्या कोणीच नाहीत!"
सगळ्यात कहर म्हणजे हा फोन होता!....
"सर, ज्या वर्गात पाईप आणि कॅन्ड ठेवले होते त्याची चावी हरवली आहे!"
आता हताश होऊन वाळणाऱ्या झाडांची काळजी मनात येवून सरळ आपणच जावून 14 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माझ्या शाळेतील झाडांना पाणी देण्यासाठी मी निघालो. घरी असणारे पाईपचे तुकडे, कनेक्टर, बकेट्या माझ्या फोर व्हिलर मध्ये घेतल्या.
"14 किलोमीटर जावून परत यायचे आहे म्हणजे 28 किलोमीटर पैकी 15 ते 20 किलोमीटर गाडी तुला शिकायला मिळेल...येतेस का?" नुकतेच ड्रायव्हिंग लायसन्स घेतलेल्या कन्येला ही ऑफर आवडली आणि ती सोबत आली.
दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होण्याच्या शेवटच्या दिवशी शाळेतील सगळी कामे व्यवस्थित पूर्ण करायची ठरले होते त्याप्रमाणे सगळे चालू होते. सुट्टीच्या काळामध्ये झाडांना पाणी व्यवस्थित मिळावे म्हणून वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून, त्यांना तारीखनिहाय नियोजन देवून, पाणी कसे द्यावयाचे हे समजून सांगितले होते. एका वर्गात शंभर फुटी रबरी पाईप आणि पाच वॉटर कँड तयार ठेवली होती.
पण हे सगळं फेल गेले होते; म्हणून आपत्कालीन परिस्थितीत सुट्टीत शाळेत आलो होतो!
गावाच्या मैदानाच्या ओट्यावर करमणूक म्हणून काही गावकरी ठाण मांडून गप्पात रममाण झाले होते. दोन - चार तरुण (चेहऱ्यावरून एखाद- दुसरा माझा जुना विद्यार्थी असणारी) मुले हाती मोबाईल घेऊन कुठल्याशा गेम खेळण्यात दंग होती. एकालाही असे वाटले नव्हते की 'शाळा आपली, गाव आपले तर दोन बकेट पाणी देण्यासाठी आपण जावे!' असो... "तुम्ही नाही आलात तर तुमची पगार थोडीच बंद पडणार आहे?!" असे जर उत्तर दिले तर मी निरुत्तर होईल म्हणून कोणास काही न बोलता आपले काम केले. आपणही मनाच्या आनंदासाठी हे करताना कोणाकडून अशी अपेक्षा ठेवणे योग्यही नव्हते!
इयत्ता तिसरीत शिकणारी कु श्वेता धनराज दहिफळे ही एकमेव विद्यार्थीनी पूर्णवेळ सोबत थांबली... तिच्यासह लेकीने मदत केल्याने अर्ध्यातासात मनाजोगते काम झाले होते.
बुधवारी 6 नोव्हेंबर 2024 रोजी कु कोमल कृष्णा गुट्टे, अक्षरा सचिन गुट्टे, पूनम बालासाहेब गुट्टे आणि यशश्री कृष्णा गुट्टे यांनी झाडांना पाणी दिले.