रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

वाढदिवसाच्या निमित्ताने बायकोस जाहीर पत्र!


 प्रिय सुजाता,
 तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला हे जाहीर पत्र लिहिण्याची ही माझी दुसरी वेळ आहे.... कदाचित काहींना वाटत असेल की हे पत्र नवऱ्याने बायकोला वाचून दाखवावे तर ते जाहीर कशाला करावे? पण या मागचा उद्देश नवविवाहित मुलींना प्रेरणा मिळावी हा सुद्धा आहे... 


 स्कॉलर केजी स्कूलची प्राचार्या म्हणून जेंव्हा तू तुझ्या शाळेच्या ऑफिसमध्ये आत्मविश्वासाने पालकांशी संवाद साधत असतेस तेंव्हा तुझ्याकडे पाहून अभिमान वाटतो... छोट्या जागेत सुरू झालेली शाळा मागच्या वर्षी नव्या जागेत, पुरेशा सुविधा पुरवत सुरू आहे.... 


 "माझ्या शिक्षणाचा मला फायदा झाला पाहिजे, मी माझ्या स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे" लग्नानंतर हा विचार तू अनेकदा बोलून दाखवलास आणि त्यावर प्रामाणिक प्रयत्न करत स्वतःची शाळा उभी केलीस! लग्नानंतरही आपलं शिक्षण पुढे चालू ठेवून आज तू तुझ्यासह काही कुटुंबांना शाळेच्या माध्यमातून आर्थिक आधार देत आहेस.... 


 शाळेत असणारा स्टाफ म्हणजे जणू तुझ्या मैत्रिणीच! आपल्या सहकाऱ्यांशी कसं वागावं हे तुझ्याकडून शिकण्यासारखं! म्हणूनच तुझ्या शाळेत आलेला स्टाफ  सहसा काही अडचण असल्याशिवाय सोडून जातच नाही! 


 शाळेतली प्रत्येक समस्या अगदी शांतपणे आणि विचारपूर्वक सोडवण्याचा तुझा स्वभाव.... पालकांचे फोन सकाळच्या धामधूमीपासून अगदी कोणत्याही वेळी आले; तरी तितक्याच संयमानं तू त्यांना उत्तरे देतेस... 
 शाळेतल्या सर्व ऍक्टिव्हिटी अगदी निटनेटक्या व्हाव्यात म्हणून तू स्वतःहून भरपूर प्रयत्न करतेस आणि म्हणूनच तुझा स्टाफही तितकीच मेहनत घेतो... 


 प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांकडे तुझे वैयक्तिक लक्ष असते म्हणून पालकांना तू सहजपणे बोलू शकतेस....जवळपास सर्वच विद्यार्थ्यांची नावे तू कशी काय लक्षात ठेवू शकतेस? तुझा विद्यार्थ्यांबद्दलचा हा जिव्हाळा मला नितांत आवडतो... 


 मागच्या काही वर्षात माझ्या तब्येतीकडे तुला जास्त लक्ष द्यावे लागते आहे; पण शाळेमूळे कधीच याकडेही दुर्लक्ष केले नाहीस... 
 माहेरची नाते कायम सांभाळत असताना सासरच्या नात्यांची वीण घट्ट ठेवणारा तुझा स्वभावही मला खूप आवडतो.... 


 आपली रसिका आता चांगल्या पदावर काम करत आपल्या घराला आर्थिक हातभार लावत आहे आणि रोहन तिच्याच पावलावर पाऊल देत उच्च शिक्षण घेत आहे... त्यांचा तुझा संवाद माझ्यापेक्षा अधिक मोकळा आणि मैत्रीचा असतो... त्यांच्या संगोपन आणि संस्काराचे श्रेय कितीतरी पटीने तुझ्याकडेच जाते....


 विचार - मनांनी आपण इतके जवळ आलेलो आहोत की आपल्यातले पती-पत्नीचे नाते आता निखळ मैत्रीचे झालेले आहे.... शाळा सुटल्यानंतर सायंकाळच्या वेळी तू तुझ्या शाळेतले किस्से सांगतेस मी माझ्या शाळेतले किस्से सांगतो... तुझ्यासोबतचा हा वेळ भुर्रकन उडत असतो! संसारातला प्रत्येक निर्णय आपण दोघे मैत्रीच्या नात्यामुळेच विचारांती घेत असतो.... 


 क्रिकेटची एखादी मॅच असेल तेव्हाच तू टीव्ही पाहतेस; एरवी कुठल्याही मालिका पाहण्याचा तुला अजिबात छंद नाही आणि जेव्हा जेव्हा तुला सवड असते तेव्हा घराची स्वच्छता करणे आणि घर नीटनेटके करणे यात तुला खूप आनंद मिळतो. तुझ्याशी गप्पा मारत मदत करता - करता आता हा माझ्याही सवयीचा भाग होत आहे!


 एक आदर्श पत्नी म्हणून मी सदैव तुला पाहिले आहे...
 तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला या पत्ररूपी शुभेच्छा देताना मला अत्यंत आनंद होत आहे... प्रभु वैद्यनाथाच्या आशीर्वादाने तुला उदंड, सुखी, निरोगी, आनंदी आयुष्य लाभो हीच प्रार्थना! 🙏🎂💐🎉

12.08.2024