जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी या निमित्ताने विविध नृत्य सादर केले. प्रभात फेरीमध्ये मुलांनी व मुलींनी सादर केलेल्या लेझीम प्रकाराचेही गावकऱ्यांनी कौतुक केले.
इयत्ता आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या एलिमेंट्री या चित्रकला परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल सरपंच सौ उर्मिला बंडू भाऊ गुट्टे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांच्या विजेत्यांनाही यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका श्रीमती प्रिया काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चंद्रशेखर फुटके, श्री सरोजकुमार तरुडे, श्री राजेश्वर स्वामी, श्रीमती शुभांगी चट, कु पूजा गुट्टे यांनी परिश्रम घेतले.