रविवार, २६ जानेवारी, २०२५

कासारवाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी या निमित्ताने विविध नृत्य सादर केले. प्रभात फेरीमध्ये मुलांनी व मुलींनी सादर केलेल्या लेझीम प्रकाराचेही गावकऱ्यांनी कौतुक केले. 


इयत्ता आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या एलिमेंट्री या चित्रकला परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल सरपंच सौ उर्मिला बंडू भाऊ गुट्टे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 


प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांच्या विजेत्यांनाही यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. 


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका श्रीमती प्रिया काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चंद्रशेखर फुटके, श्री सरोजकुमार तरुडे, श्री राजेश्वर स्वामी, श्रीमती शुभांगी चट, कु पूजा गुट्टे यांनी परिश्रम घेतले.







 



































गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

ऑलम्पियाड स्पर्धेत स्कॉलर केजी स्कूलचे घवघवीत यश


 नॅशनल ओलंपियाड फाउंडेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल ओलंपियाड परीक्षेत यावर्षी प्रथमच सहभागी होत स्कॉलर केजी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयात उत्तीर्ण होऊन तेरा गोल्ड मेडल आणि एक टॉपर मेडल मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. 


स्कॉलर केजी स्कूल परळी वैजनाथच्या प्राचार्या सौ सुजाता चंद्रशेखर फुटके यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, आमच्या शाळेने यावर्षी प्रथमच इंटरनॅशनल ओलंपियाड स्पर्धेत विद्यार्थ्यांना बसवले आणि त्यांची तयारी करून घेतली होती. 
इंग्रजी गणित हिंदी विज्ञान फोनिक्स या विषयात विद्यार्थ्यांनी 13 गोल्ड मेडल्स एक टॉपर मेडल मिळवत एकूण 14 मेडल्स ची प्राप्ती केली आहे. 


सर्वात कौतुकास्पद बाब म्हणजे कु राजलक्ष्मी परमेश्वर गुट्टे हिने विज्ञान विषयात 9 वा इंटरनॅशनल रँक मिळवला आहे! कुमारी राजलक्ष्मी हिने इंग्लिश, हिंदी, गणित फोनिक्स आणि विज्ञान या वेगवेगळ्या विषयांमध्ये ही स्पर्धा दिली आणि उत्तीर्ण झाली. 


कु आराध्या अशोक रोकडे, काव्या अनिल शंकुरवार,  ओवी विजय गायकवाड, पद्माक्ष योगेश व्यवहारे, शिवांश गजानन मालेवार आणि सौम्या जितेंद्र नव्हाडे या विद्यार्थ्यांनीही गणित आणि इंग्रजी विषयांमध्ये ए प्लस प्लस ग्रेड घेऊन सेकंड राउंड साठी सिलेक्ट झाले आहेत.


विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि  शिक्षिकांचे अभिनंदन प्राचार्या सौ सुजाता फुटके व शाळेचे मार्गदर्शक श्री चंद्रशेखर फुटके यांनी केले आहे. 

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेत कासारवाडी शाळेचे यश

 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कला व संचलनालयाच्या वतीने आयोजित एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेत यश मिळवले असून 13 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कला शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षक नसतानाही या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती प्रिया अशोकराव काळे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन तसेच मार्गदर्शन करून यावर्षी प्रथमच एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेसाठी तयारी करून घेतली. 


श्रीमती काळे मॅडम यांच्या प्रयत्नास प्रतिसाद म्हणून विद्यार्थ्यांनीही मेहनत केली आणि या गावातून पहिल्यांदाच अशा प्रकारच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या वर्गाचा एकूण पट १८ विद्यार्थ्यांचा आहे. त्यापैकी तेरा विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले असून तीन विद्यार्थिनी बी ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत. 


उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती प्रिया कळम काळे मॅडम यांचे मुख्याध्यापक श्री राठोड, सरपंच सौ उर्मिला बंडूभाऊ गुट्टे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.