मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

स्वातंत्र्यदिनाची पूर्व तयारी





मुले मनातून कामाला लागली म्हणजे शाळेचे आंगण रमनीय होते...

श्रमाची भाषा कळावी
कळावे श्रमाचे मोल
घामातच जग जगते
हा संदेश अनमोल

छान वाटते की नाही ?

मंगळवार, ३१ जुलै, २०१२

पाढ़े पाठातर स्पर्धा झाली.. श्री काळे सर संयोजक होते ...उलटे पाढ़े.(हो चक्क उलटे..).सरल पाढ़े..पढ़यवारील गणिते...मज्जा आली...बैठक रचना आणि सरेच मजेदार होते...दर १५ दिवसानी असच नवनावीन होनार आहे



पाढ़े पाठातर स्पर्धा झाली..


श्री बालासाहेब  काळे सर संयोजक होते ...उलटे पाढ़े....(हो चक्क उलटे..)... सरळ पाढ़े.. पाढ्यावरील गणिते...मज्जा आली...बैठक रचना आणि सारेच मजेदार होते...दर १५ दिवसानी असच नवनवीन होत होते.

गुरुवार, १ सप्टेंबर, २०११

दैनिक लोकसत्ता चतुरंग मध्ये माझ्या शालेची माहिती 2010


चकाचक शाळा’ उपक्रम - टोकवाडीची आदर्श शाळा!
ज्ञानोबा सुरवसे , शनिवार, ३० जानेवारी २०१०
स्वच्छ, सुंदर, चकचकीत परिसर. हिरवीगार झाडी. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे. गालिच्यासारखी हराळी. आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह! असे चित्र ग्रामीण भागातील- तेही जिल्हा परिषद शाळेतले आहे, असे जर कोणी सांगितले तर तुमचा सहजासहजी विश्वास बसणार नाही. पण हे अविश्वसनीय परिवर्तन घडवले आहे परळी वैजनाथ तालुक्यातील टोकवाडी येथील शाळेने! ही किमया साधलीय- उत्साही शिक्षक, कल्पक दूरदृष्टी असलेल्या शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. राजाराम मुंडे यांच्या कृतिशील प्रयत्नांमुळे!
सर्वागाने शाळा सुधारणे हे एक दिव्य असते. त्यासाठी प्रयत्नांत सातत्य आणि जिद्द असावी लागते. शाळेशी संबंधित प्रत्येकाने आपल्या कौशल्याचे परिपूर्ण योगदान दिले तर हे परिवर्तन शक्य आहे, हे टोकवाडीच्या जिल्हा परिषद शाळेने दाखवून दिले आहे. या शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक एस. बी. नावकेकर, सध्याचे मुख्याध्यापक एच. एस. गिते यांच्या काम करण्याच्या इच्छेला शालेय समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजाराम मुंडे, उपसरपंच बालाजी मुंडे यांनी याकामी संपूर्ण सहकार्य दिले आहे.
शाळा सुधारण्याच्या या कामात ग्रामस्थांनीही सक्रिय सहकार्य दिले आहे. शाळेत पाण्याची सोय करण्यासाठी शाळा सुधार फंड उभारण्यात आला. यासाठी अनेक दाते पुढे आले आणि त्यातून शाळेत ८००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभी राहिली. या टाकीत जवळच्या सार्वजनिक बोअरद्वारे पाणी घेण्यात आले. शाळेच्या परिसरात मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने भकास, उदास शाळेचा परिसर हिरवा, रमणीय झाला. विद्यार्थी व शिक्षकांनी झाडे आणली, लावली आणि ती वाढवली. खिचडी खाल्ल्यानंतर, दुपारच्या जेवणानंतर मुलांना पाणी पिण्यासाठी घरी जाण्याची गरज उरली नाही. या वेळात मुले झाडांना पाणी देताना, श्रमदान करताना दिसू लागली. यातून शाळेच्या परिसरात सुंदर टुमदार बाग आकाराला आली. उन्हाळ्यात सार्वजनिक बोअरचे पाणी कमी होताच गावच्या पाटलांनी आपल्या बोअरवेलमधून शाळेला पाणी दिले.
शिक्षक शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहून डॉ. मुंडे यांनी सढळ हाताने त्यांना मदत केली. त्यांच्यामुळे इतरही हात मदतीसाठी पुढे आले. शाळेची रंगरंगोटी होऊन शाळा चमकू लागली. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना उकाडय़ाचा त्रास कमी होण्यासाठी गावातील नामदेव मुंडे यांनी शाळेला पंखे दिले. दरम्यान एमपीएसपी योजनेंतर्गत शाळेला पाच संगणकही मंजूर झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करीत असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि संख्येतही लक्षणीय वाढ होत गेली.
तत्कालीन मुख्याध्यापक नावकेकर सुट्टीतही शाळेला भेट देऊन लावलेल्या झाडांची काळजी घेत. शाळेत स्वच्छतागृह स्वच्छ व जंतूमुक्त राहण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत. शाळेत विविध उपक्रमही सुरू झाले. परिपाठानंतर प्रबोधन सुरू झाले. त्याचा परिणामही दिसू लागला. अशा एक ना दोन, अनेक गोष्टी घडू लागल्या. शाळेत नवनव्या वस्तू झळकू लागल्या. शाळेतील प्रत्येक वर्ग सुंदर आणि आकर्षक दिसू लागला. शाळेच्या समोरील मैदानात कागदाचा तुकडाही दिसणार नाही अशी स्वच्छता. ऑस्ट्रेलियन हरळीसह छोटीसी हिरवी बाग अन् कर्दळीवरची फुलेही तिथे फुलू लागली.
स्वच्छतेच्या दिशेने टाकलेली पावले आता शैक्षणिक प्रगतीच्या दिशेनेही चालू लागली. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अवांतर अशैक्षणिक कामे भरपूर करावी लागतात. जितके उपक्रम, तितका ताण वाढता. असे असतानाही शाळेत बालवाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाळवीने पुस्तक खाऊन संपविण्यापेक्षा मुलांनी वाचून ती खराब केली तरी पुस्तके आणि आपण धन्य होऊ, या विचाराने शाळेतील शिक्षकांनी बालवाचनालय मुलांसाठी खुले केले. वाचनालय वेळेवर उघडणे, पुस्तके देणे-घेणे, नोंदी करणे, वसुली करणे ही सर्व कामे कोण करणार? पण इच्छा तेथे मार्ग म्हणतात, त्याचा प्रत्यय लगेचच आला. मुलांचे वाचनालय मुलांच्या हाती देऊन शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ते चालवायचे ठरले. मुलांनीही हे काम आनंदाने पत्करले. १ जानेवारी २००८ रोजी वाचनालय मुलांसाठी मुलांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या आणि शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या सोनाली बलवीर आगळे हिने दररोज या वाचनालयातील पुस्तके दुपारी १.३० ते २ या वेळेत मुलांना देण्यास सुरुवात केली. वर्गवार वेळापत्रक ठरविण्यात आले. विद्यार्थ्यांना सात दिवस पुस्तक वाचता येणार होते. प्रत्येक वर्गात शिक्षकांनी मुलांना वाचनासाठी प्रोत्साहित केले. या उपक्रमासही चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षांत इयत्ता ३ री ते ७ वीच्या ४२८ मुलांनी पुस्तके वाचली. नव्या शैक्षणिक वर्षांत नव्या शालेय मंत्रिमंडळातील मंत्री मनीषा महादेव काळे हिने वाचनालयाचा कारभार हाती घेतला.
मुलांना पुस्तकाच्या वाचनाचा फायदा कळावा म्हणून शाळेत दररोजच्या परिपाठात ‘पुस्तक परिचय’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. सुरुवातीला शिक्षकांनीच पुस्तकांचा परिचय करून दिला. मात्र, नंतर मुलांनी अतिशय चांगल्या, मोजक्या शब्दांत पुस्तकांचा परिचय करून देण्यास सुरुवात केली. मुले पुस्तकांवर चर्चाही करू लागली. वाचलेल्या पुस्तकातील विनोद, गोष्टी, कविता आई-वडील, मित्रांना सांगण्यासाठी शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन दिले. पुस्तके वाचण्याची विद्यार्थ्यांना चांगलीच गोडी लागली. आठ महिन्यांत सुनीता हनुमंत काळे हिने शंभर पुस्तकांचे वाचन केले. दरम्यान वाचनालयातील पुस्तके हजाराच्या घरात गेली. आठ दिवस पुस्तक विद्यार्थ्यांच्या घरी राहत असल्याने त्याच्या घरचेही पुस्तके वाचू लागले. निबंध लिहायला, किस्से सांगायला आणि ज्ञानाची शान मारायला पुस्तकवाचनाचा फायदा मुलांना होऊ लागला. ज्यांना एक-दोन दिवसाआड पुस्तक हवे असेल त्याला रुपया, दोन रुपये महिना फी आकारली. मात्र, आठ दिवसांनी पुस्तक घेणाऱ्यांना कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या शुल्कातून वाचनालयातील पुस्तकांत अधिक भर पडली.
मुलांना व्यासपीठावर वावरायचा आत्मविश्वास यावा, त्यांची वक्तृत्वकला वाढावी यासाठीही शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले. परिपाठात थोडेसे बदल करून ‘चालता-बोलता’ हा सामान्यज्ञानावर आधारित कार्यक्रम सुरू करण्यात आला. यात कार्यक्रम सादर करणारा विद्यार्थी पाच प्रश्न विचारतो. तीन प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांस एक रुपयाचे नाणे बक्षीस मिळते. बक्षीस छोटे असले तरी विद्यार्थ्यांची त्यावर उडी पडते. ‘असे का, तसे का?’मध्ये अवतीभवती घडणाऱ्या घटनांची शास्त्रीय कारणे दिली जातात. नखे काढताना रक्त का निघत नाही, केस कापताना इजा का होत नाही, ढेकर का येतो, उचकी का लागते, असे मजेदार प्रश्न यात असतात.
ज्या वर्गाचा परिपाठ सादर होणार असतो, त्या वर्गातील विद्यार्थी शाळेच्या मैदानाची, वर्गाची त्या दिवशी स्वच्छता करतात. गेटजवळ, ऑफिसजवळ आणि आपल्या वर्गासमोर रांगोळी काढतात, गणवेशाचा दिवस असेल तर १०० टक्के मुलं गणवेशात येतात. ज्यांचा परिपाठ- त्यांचा पुस्तकांचा दिवस, त्याच दिवशी संगणक प्रयोगशाळेत जाण्याचा दिवस आणि त्याच दिवशी मुलींना सायकलही शिकायला मिळते. याकरता सुरुवातीला शिक्षकांना थोडी मेहनत घ्यावी लागली. नकारात्मक बातम्या टाळून सकारात्मक बातम्या निवडणे, दिनविशेष देणे, बोधकथा देणे, ‘असे का, तसे का'ची तयारी करून घेणे, ही कामं शिक्षकांनी सुरुवातीला स्वत: केली. मात्र, आता सर्व कामे मुलेच करतात. त्यामुळे मुलांमध्ये सभाधीटपणा वाढला आहे. शाळेत सार्वत्रिक निवडणूक घेऊन शालेय मंत्रिमंडळ निवडले जाते. त्यासाठी अर्ज भरणे, अर्ज मागे घेणे, प्रचार करणे, जाहीरनामा तयार करणे, आदी सोपस्कार केले जातात. ग्रामीण भागातील शाळा असूनही वार्षिक स्नेहसंमेलन घेतले जाते. शाळेत विविध उपक्रम राबविण्यासाठी, त्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी डॉ. राजाराम मुंडे, उपसरपंच बालाजी मुंडे हे नेहमीच सहकार्य करतात. शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत गिते, संभाजी नावकेकर, चंद्रशेखर फुटके, संभाजी चप्पे, कृष्णा मोराळे, महाजन, ज्योत्स्ना स्वामी, कमल वाघमोडे, यमुना गोपनपाळे, कल्पना बडे, वंदना कराड, शिल्पा शिंदे आदींनी आपापले विभाग ठरवून घेतले असून, प्रत्येकजण आपले काम चांगले आणि परिणामकारक व्हावे यासाठी प्रयत्न करताना दिसतो. शाळेच्या बाहेरच्या बाजूला पाच फळे असून, त्यावर सुविचार, तसेच विद्यार्थ्यांच्या कविता प्रदर्शित केल्या जातात. या सगळ्यामुळे टोकवाडीतील ही जिल्हा परिषदेची शाळा तालुक्यातच नव्हे, तर सबंध जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.