मानवी नाते हे मनाच्या व्यवहारावर अधिक अवलंबून आहेत असे मला वाटते, रक्ताच्या नात्यापासून ते मानलेल्या, जोडलेल्या नात्यांना अधिक चांगल्या पद्धतीने जोडण्यासाठी मन अधिक प्रसन्न असायला हवं. हिंदू संस्कृतीत त्यामुळेच सणावारांची गर्दी आहे. सणांच्या दिवशी मन प्रसन्न ठेवलं पाहिजे, आनंदाने वागलं पाहिजे हे आपले पूर्वज आपल्याला सांगत आलेले आहेत.
'अधिकमास' ज्याला बरेच जण 'धोंड्याचा महिना' असे म्हणतात तो सुद्धा आपल्याला तीन वर्षानंतर एकदा मिळणारा अधिकचा मिळालेला एक सण आहे, म्हणजेच आपण 'अधिकचा आनंद' या दिवसांमध्ये साजरा करायला हवा. या महिन्यात आपण आपल्याशी जोडल्या गेलेल्या नात्यांना अधिक दृढ करायला हवे.बऱ्याचदा आपल्याशी जोडल्या गेलेल्या नात्यांमध्ये काही कारणामुळे तणाव निर्माण झालेला असतो. हा तणाव तीन वर्षापेक्षा अधिक काळ चालू नये म्हणूनही कदाचित ही संधी आपल्याला देण्यात आलेली असावी

विशेषत: जावई आणि सासू - सासरे, सासरकडील मंडळी या नात्यांमध्ये तणाव अधिक येतात कारण हे नाते अधिक जवळचे असते; पण काहीही झाले तरी यातला तणाव हा तात्पुरताच असावा आणि पुन्हा नव्या सकारात्मक विचाराने हे नातं जोडलं जावं. मनातली जळमटी दूर करण्यासाठी तशा हिंदू संस्कृतीमध्ये अनेक संधी दिल्या गेलेल्या आहेत, त्यातील ही एक संधीच आहे असे समजून आपण आपलं नातं जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आणि जी नाती पूर्वीच अतिशय सकारात्मक रीतीने चालू आहेत त्यांना अधिकच दृढ करण्याचा हा सण आहे असे समजावे.
या मनोगताच्या सुरुवातीला मी असे म्हटले आहे की, मानवी नाते हे मनाच्या व्यवहारावर अधिक अवलंबून आहे, त्याचा अर्थ असाही घ्यायला हरकत नाही की आपल्याला जमेल तेवढे, झेपेल तेवढे खर्च करून हा अधिकमास साजरा करण्याचा प्रयत्न सासरवाडीकडील मंडळींनी करावा तर जावईबापूंनी आपल्या सासऱ्यांची परिस्थिती समजून घेऊन जे दिले आहे ते 'अधिक' चांगले आहे असे समजून हा अधिकमास साजरा करावा!

सर्वांना अधिकमासाच्या खूप अधिक (जास्तीच्या) हार्दिक शुभेच्छा!!
( वरील फोटो विषयी थोडेसे- आपल्या ४ भायांच्या पाच लेकी यांना जावयांसह आमंत्रित करून अधिकमासात त्यांचा सन्मान करून आमच्या फुटके परिवारासमोर मनाने एकत्र राहण्याचा आदर्श आमच्या चुलती सौ गंगाबाई (लताबाई) महालिंगअप्पा फुटके यांनी घालून दिला आहे. आपल्या पाच लेकी अनुक्रमे सौ सुमन बालाजी बनसोडे (नांदेड), सौ मंदाकिनी मनोहर दळवे (परभणी), सौ संजीवनी नामदेव बरकसे (कळंब), सौ जयश्री युवराज पिंपळे (परळी) व सौ महादेवी राजेंद्र वाघमारे (सोलापूर) यांना एकत्र बोलावून परिवाराचा आनंद सोहळा ताईंच्या इच्छेमुळे घडून आला आणि प्रा प्रवीण महालिंगअप्पा फुटके व श्री गणेश महालिंगअप्पा फुटके यांनी उत्तम व्यवस्था, स्वागत करून जावईबापुंना खुश केले.
" अशी सासुरवाडी मिळणे हे आमचे भाग्य! " असे भाऊजींचे मनोगत परिवारास सुखावून गेले. आमच्या ५ ही ताईंनी आपल्या गोड स्वभावाने संसार सुखाचा केला आहे आणि त्यास सुस्वभावी भाऊजींची समर्थ साथ सदैव लाभली आहे हेही तितकेच खरे आहे म्हणून " असे जावई लाभणे हे आमच्या परिवाराचे भाग्य!"....असे म्हणावेसे वाटते.)
खुपच छान.....मांडणी 'अधिकच' आवडली
उत्तर द्याहटवाThank you
हटवा