सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

हा प्रवास असाच आनंदाचा होवो!


 

हा प्रवास असाच आनंदाचा होवो!

शिक्षक म्हणून नोकरीस लागून बाल गोपाळांच्या सहवासामध्ये किती लवकर 30 वर्षे झाली याचा मला विश्वास वाटत नाही.... असे वाटते की कालपरवाच तर मी शिक्षक म्हणून नोकरीस लागलो आहे! 


पहिल्या दिवशी जो उत्साह विद्यार्थ्यांसमोर जात असताना असायचा तो आजही कायम आहे.....  माझ्या विद्यार्थ्यांना नवे उपक्रम कसे देता येतील, नव्या पद्धतीने त्यांच्याकडून अभ्यास करून कसा घेता येईल, कुठे काही दिसले तर हे माझ्या विद्यार्थ्यांसाठी कशाप्रकारे उपयोगात आणता येईल, कुठे चांगली शाळा-उपक्रमशील शिक्षक दिसले की त्यांच्याकडून मला काय शिकता येईल हे आजही तीस वर्षानंतर मला वाटते... हे असं वाटणं आणि हे असं कायम व्यस्त राहणं यात मला आनंद मिळतो आणि ते माझ्या सेवेच्या शेवटपर्यंत राहो हीच आजच्या दिवशी मी भगवंताकडे प्रार्थना करेल....


शिक्षक सेवेबद्दल कधी कोणी वाईट बोललं की थोडीशी निराशा येते; पण ती फार काळ टिकत नाही. कुठल्यातरी माध्यमातून कुणीतरी अमुक तमुक आमच्यावर तोंडसुख घेतो... पण खरं सांगतो, एकदा मुलं समोर आली की ती नैराश्यता, ते सगळं निगेटिव्ह ऐकलेलं पार विसरून जातो! अगदी पहिल्या दिवशीच्या उत्साहानेच दर दिवशी शिकवतो! आणि हो, जसे निराशाजनक कोणीतरी बोलते तसेच कधी कधी कोणी कोणी हरभऱ्याच्या झाडावरही नेऊन ठेवते! कोणी माझे खूप कौतुक केले त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच माझ्या नेहमीच्या भूमिकेत मी माझे अध्यापन करण्याचा प्रयत्न करत असतो...... भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की हे ही माझ्या सेवेच्या शेवटपर्यंत टिकू दे! 


तीस वर्षांच्या सेवेमध्ये बरेचसे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या उदरनिर्वाहाच्या सेवेत गुंतले असतील आणि अपेक्षा आहे की हे सर्वजण ती सेवा प्रामाणिकपणे करत असतील..... इमानी इतबारे जीवन व्यतीत करत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षकाला अभिमान वाटतच असतो.; परंतु नकळत या कार्यात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील आणि एखादा विद्यार्थी दुखावला गेला असेल तर मी मनःपूर्वक क्षमा मागतो! 


तीस वर्षांच्या या सेवा कालामध्ये अनेक मार्गदर्शक लाभले, ज्या ज्या गावात सेवा दिली त्या गावातील गावकऱ्यांचे सहकार्य लाभले, वेगवेगळ्या शाळांमधील माझ्या सहकारी बांधवांमुळे माझे शाळेतले दिवस अतिशय आनंदाचे गेले, वेगवेगळ्या उपक्रमात त्यांच्यासोबत काम करताना उत्तम अनुभव मिळाले आणि मी समृद्ध होत गेलो..... म्हणून त्या सर्वांचेही मला आभार मानावेसे वाटतात..... Thank You Very Much!  

३० टिप्पण्या:

  1. आपल्या 30 वर्षांच्या प्रवासाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपल्या एकूण प्रवासाच्या 20 वर्षाचा मी ही साक्षीदार आहे. आपल्या अथक परिश्रमाने विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. आपल्याला मिळालेले पुरस्कार याची साक्ष तर आहेतच परंतु आपले YouTube chanel, blogspot म्हणजे 'याची देही...याची डोळा'

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खूप छान. पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

      हटवा
    2. खूप खूप अभिनंदन सर. पुढील आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

      हटवा
  2. शेखर आम्हाला या तुमच्या 30 वर्षाच्या मुलांना घडवण्याच्या ध्यासाचा हेवा वाटतो, शिक्षकी पेशा तसा फार काही आर्थिक बाजू भक्कम करणारा जरी नसला तरी सामाजिक, मौलिक आणि सर्व अंगानी समाजातील मुलांना आणि देशाला योग्य दिशा देतील अश्या पिढ्या घडवून देशाची सेवा घडवाणारा आहे

    तुम्हाला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.

    तुमचा मित्र
    अतुल मधुकरराव कुलकर्णी
    अतुल सरोज भावठाणकर

    उत्तर द्याहटवा
  3. शिवहार उदगीरकर७ ऑगस्ट, २०२३ रोजी ८:२३ PM

    प्रिय मित्र शेखर तुझा आपल्या सेवेशी असलेला उत्साह मी अनुभवलाय...तो असाच अबाधित राहील याची आम्हास खात्री आहे.पुढील सेवेस खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  4. खूप खूप शभेच्छा सरजी

    उत्तर द्याहटवा
  5. सर तुमचे खूप खूप अभिनंदन हेवा वाटावा असे आपले कार्य आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. आपण कधीच विस्मरणात जाणार नाहीत असे जातिवंत हाडाचे शिक्षक आहात.शत शत प्रणाम.
    धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  6. *कौटुंबिक जिव्हाळ्याचे शेखर अंकल...!*

    *आदरणीय सर नमस्कार..!🙏*

    *आपण आपल्या सेवेची ३० वर्ष पूर्ण केली आहेत हे आपल्या वरील शब्द सहवासाने ज्ञात झाले पण ती केवळ ०३ वर्षांसारखी वाटावी इतकी सरल - तरल आणि चटकन निघून गेली.*

    *सर आपण एक उपक्रमशील आणि प्रज्ञेचे शोधार्थी आहात याविषयी माझ्याच काय कोणाच्याही मनात किंतु, परंतु अथवा संभ्रम निर्माण होण्यास तसुभरही जागा नाही. परळी वैजनाथ शहरातील आचार विचार आणि संस्काराने समृद्ध असलेल्या स्वर्गीय राजेश्वररावजी देशमुख गुरुजी, स्वर्गीय चव्हाण गुरुजी, परळी नगरीचे साने गुरुजी अर्थात परमवंदनीय आबासाहेब वाघमारे गुरुजी तसेच परळी शहराला पत्रकारितेचा अनेक वेगवेगळ्या विचारधारेचा सांस्कृतिक विचार - वारसा देणारे आणि जतन करणारे स्वर्गीय मोहनलालजी बियाणी (काकाजी) या सर्वांच्या छत्रछायेसह आपण आपल्या संस्कारित परिवाराच्या जडणघडणीत स्वतःला विद्यार्थ्यांच्या प्रती समर्पित भावाने अर्पित केलेले आहे.*

    *परळी वैजनाथ शहरातील दैनिक मराठवाडा साथी, सुरुवातीच्या काळातील दैनिक सोमेश्वर एक्सप्रेस या वर्तमानपत्रासह आपण दैनिक मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक, दिवंगत प्रशांतजी जोशी, दैनिक झुंजार नेता चे परळी तालुका प्रतिनिधी दिवंगत सुगंधजी गुट्टे, शिक्षण मार्गाचे संपादक राणबाजी गायकवाड, परळी शहरातील सुप्रसिद्ध साहित्यिक दिवंगत चंपालालजी दरगड, सर्जनशील साहित्य रसिक डॉक्टर खान साहेब, प्रदीप जी कुलकर्णी, संजयजी ठाकरे या सर्व शब्द स्नेही परिवारात आपल्या लेखन परंपरेस समर्थ व धिरोदत्तपणे विकसित करत गेलात, परळी शहरातील साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःची एक स्वतंत्र आगळीवेगळी ओळख आपण आपल्या निवेदनशैलीने निर्माण करू शकलात याचाही आनंद शब्दात व्यक्त करता येणे शक्य नाही.*

    *शिक्षक म्हणजे शिस्त, क्षमा आणि करुणा अशा संकुचित अर्थाने आपण या शब्दात न जगता या पलीकडे जाऊन शिक्षक या शब्दात आपण शील, क्षमताधिष्ठितपणा आणि कर्तव्यनिष्ठा या गोष्टी तहयात जपल्या आहेत. सबंध परळी शहर आणि बीड जिल्हा आपणांस फुटके सर म्हणून ओळखत नाही, शेखर सर म्हणूनही ओळखत नाही आणि चंद्रशेखर सर म्हणून तर अजिबातच नाही या सर्वांच्याहीपेक्षा वेगळी आपली ओळख ही 'शेखर अंकल' ही कौटुंबिक स्वरूपातील आहे. ही ओळख आता केवळ परळी वैजनाथ पंचक्रोशीतच नव्हे तर बीड जिल्ह्याच्या सीमा पादाक्रांत करत अखंड महाराष्ट्रात घोडदळ करत प्रस्थापित व्हावी या सदिच्छासह आपल्या सेवेच्या ३१ व्या वर्षातील पदार्पणास मनःपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो...!🌹🌷💐🪷🌹*

    *आपलाच स्नेहांकित*
    *प्रा. डॉ. दयाराम द. मस्के*
    *लोकप्रशासन विभाग प्रमुख*
    *आदर्श महाविद्यालय, हिंगोली*

    उत्तर द्याहटवा
  7. चंद्रशेखर जी.आपले.अभिनंदन.🎉💐
    तसेच..
    आपल्या कार्यात आपण उधिष्ष्टाप्रत जावोत.
    C.C.R.T. न्यू दिल्ली. च्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा .🌹

    उत्तर द्याहटवा
  8. हार्दिक शुभेच्छा सन्मित्र !
    आपण विद्यार्थ्यांमधे रमल्याचा हा सुंदर परीनाम आहे की महोदय. सृजनशील शिक्षकांना वयाचं ते काय घेणं देणं बरं.एक सेवानिवृत्ती जी शासकीय गोष्ट आहे, ती सोडली तर आपण कायम विद्यार्थीप्रिय शिक्षक असणारंच आहात.
    मनोगत वाचून आनंद वाटला महोदय !

    हार्दिक शुभेच्छा ! 🌹

    उत्तर द्याहटवा
  9. खूप अभिनंदन गुरू जी!😊💐
    भगवंताचे आभार मानले पाहिजेत माझ्यासारख्या तूमच्या सर्व विद्यार्थ्यांनी की तुम्ही ' शिक्षक ' या भूमिकेत आमच्या आयुष्यात आलात.
    जिल्हा परिषदचे आम्ही विद्यार्थी; पण तुम्ही असे शिकवले जसे कोणत्या भल्या मोठ्या आणि आधुनिक शाळेतही शिकवले जात नसेल.
    आज ३० वर्ष ह्या भूमिकेत राहून पूर्ण झाले, कळत-नकळत तुम्ही कित्येक तुमचे प्रतिव्यक्तीमत्त्व बनवले असतील. खरंच तुमच्या सारखे गुरुजी आमच्या शालेय जीवनात भेटले हे आमचे सौभाग्य आहे.
    आपल्या ह्या ३० वर्षांच्या ज्ञान-अर्पण यात्रेत कित्येक विद्यार्थ्यांच्या मनात तुम्ही एक वेगळेच स्थान निर्माण केले असेल, याचे गणित कोणता गणितज्ज्ञ सुद्धा नाही काढू शकणार!!
    खूप काही लिहायचे आहे सर पण ते सूर्याला प्रकाश दाखवल्या सारखेच होईल हे मात्र नक्की!!
    कारण जे तुम्ही शिकवता, जे तुमच्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना तुमच्याबाबत आपुलकीपणा वाटतो ते माझ्या क्षुल्लक शब्दांनी कधीच व्यक्त नाही होऊ शकणार!!
    तुमच्या सर्व विद्यार्थी रुपात असणार्‍या लेकरांना जरी ओळखत नसले तरीही सर,
    मी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हाला या सुवर्ण-दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि परमेश्वकडे ही प्रार्थना करते की ही तुमची ज्ञान-अर्पण यात्रा अशीच अविघ्न सुरू ठेवावी...😇🪷

    उत्तर द्याहटवा