नासा, इस्रो भेटीहून आलेल्या भाविका धनराज फड हिचा कासारवाडीत सत्कार, मुलाखत
नियमित अभ्यासासह विद्यार्थ्यांनी त्यांचे ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी भरपूर मेहनत करणे गरजेचे असल्याचे सांगत कु भाविका फड या विद्यार्थिनीने अमेरिका कशी आहे हे तसेच तिची नासा व इस्रो सहली कशी झाली हे सांगितले.
जिल्हा परिषद बीडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खास निवड परीक्षेमार्फत निवड झालेली कुमारी भाविका धनराज फड इस्त्रो आणि नासाच्या सहलीवरून परतली आहे, तिचे अनुभव विद्यार्थ्यांना ऐकवण्यासाठी आणि तिच्या सर्व प्रवासाबद्दलची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी, केंद्र मिरवट या ठिकाणी तिची प्रकट मुलाखत आणि सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड होते. व्यासपीठावर दौंडवाडी गावचे सरपंच तथा भाविकाचे आजोबा श्री मनोहर फड यांच्यासह भाविकाच्या दौंडवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री गोविंद दहिफळे यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडीच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर तसेच शिक्षक वृंद आणि शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी भाविकाचे स्वागत व सत्कार केला. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी खास तिच्यासाठी स्वतः बनवलेले पुष्पगुच्छ आणून तिचे अभिनंदन केले.
कुमारी भाविकाने मुलांना समजेल व आवडेल अशा भाषेत आपले मनोगत केले. तिचा विमानाचा प्रवास, अमेरिका बद्दलचे मत, यशामागचे रहस्य, या सहलीवरून परतल्यानंतर तिने आपली निश्चित केलेले धेय्य, सहलीतील गमती जमती या गोष्टी सांगितल्या.
तिचे मार्गदर्शक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौंडवाडी चे मुख्याध्यापक श्री दहिफळे यांनीही विद्यार्थ्यांना तुमच्या मेहनतीशिवाय यश मिळणार नसल्याचे सांगून मनातली भीती काढून टाकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कु भाविकाची हसत - खेळत प्रकट मुलाखत श्री चंद्रशेखर फुटके यांनी घेतली. भाविकाची दिनचर्या, तिच्या आवडीनिवडी, तिचा अभ्यास सध्या कसा सुरू आहे, यासह अमेरिकेतील लोक, घरे, अन्न याबाबत मुलांच्या मनात असलेली प्रश्न त्यांनी विचारली. जवळपास २० मिनिटे झालेल्या या मुलाखतीचा कार्यक्रम इयत्ता पहिली पासून आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक ऐकला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सर्वश्री तरुडे, स्वामी, मुंडे, श्रीमती काळे, चट यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक श्री राठोड यांच्या आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा