ग्रंथ दिंडी, पुस्तक प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या भाषणांनी वाचन प्रेरणा दिन साजरा
ग्रंथ दिंडी, पुस्तक प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या भाषणांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन अर्थात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा झाला.
इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मागच्या आठवड्यापासून भाषणांचा सराव चालू केला होता. आपले आवडते शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी शालेय मंत्रिमंडळाने तयारी केली होती. विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या छोटेखानी पालखीमध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम लिखित अग्निपंख या पुस्तकाला मानाचे स्थान देण्यात आले होते. या पालखी समोर लेझीमांचा वाद्यवृंद उत्साहात पुढे निघाला होता. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखारामजी गुट्टे यांनी श्रीफळ वाढवून ग्रंथ दिंडीला सुरुवात करून दिली.
गावातील महत्त्वाच्या मार्गावरून ग्रंथ दिंडी शाळेत परत आल्यानंतर आकर्षक रांगोळी काढून ठेवण्यात आलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन श्री सखारामजी गुट्टे यांनी केले. नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया यांच्याकडून मागवण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमापूजनानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखारामजी गुट्टे यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून मुख्याध्यापक श्री राठोड डीबी यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कुमारी पूनम बालासाहेब गुट्टे हिने केले. यावेळी शिक्षकवृंदांसह 32 विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय मंत्रिमंडळाच्या विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक सर्व श्री चंद्रशेखर फुटके, राजेश्वर स्वामी, श्रीमती प्रिया काळे श्रीमती शुभांगी चट, कु पूजा गुट्टे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा