गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

तुमचे Whatsapp होईल हॅक! सावधान......




तुमचे Whatsapp होईल हॅक! सावधान अशा प्रकारच्या फाईल ओपन करू नका! 
सध्या व्हाट्सअप वर आपल्याच ओळखीच्या क्रमांकावरून एक फाईल पाठवली जाते आणि आपण ती उत्सुकतेने उघडून पाहतो आणि क्षणात आपल्या whatsapp वरून ताबा दुसऱ्याच कोण्याच्या हाती जातो! आपले सर्व क्रमांक, पर्सनल डेटा त्या व्यक्तीच्या हाती गेल्याने बऱ्याचदा आर्थिक नुकसान होते. समोरच्या व्यक्तीने मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी असे केलेले नसते तर नकळतपणे ती व्यक्ती अशा प्रकारे फसलेली असते आणि त्या मोबाईल मध्ये असणाऱ्या सर्व क्रमांकांना ही फाईल आपोआप पाठवली जाते...  



कशी ओळखावी अशी फाईल?
कोणत्याही व्यक्तीला आपण संवाद न साधता त्याने आपल्याला ऍप्लिकेशन फाईल पाठवली असेल तर ते संशयास्पद असते. याच फाईल मध्ये आपला मोबाईल हॅक करणारी व्हायरस असतात. या फाईलची नवे काहीही शकतात आणि शक्यतो अशी जी आपल्या कामाची असू शकतात. जसे की PM किसान माहिती, लाडकी बहीण योजना, SBI Reward, मोफत डेटा अर्ज या प्रकारच्या फाईल.  



या प्रकारच्या फाईलच्या शेवटी .APK (डॉट एपीके) असते. (चित्र पहा) अशा प्रकारची फाईल ओळखून कधीच Open करण्याची चूक करू नका. 




आपला मोबाईल लहान मुले किंवा किंवा थोड्याच शिक्षित असलेल्या स्त्रियांच्या हाती देत असाल तर त्यांना ही माहिती वाचण्यास सांगा. 
ही पोस्ट आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. 



 

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

हा नवा प्रकार तुम्हाला फसवू शकतो!


 

ऑनलाइन देवाण-घेवाण जितक्या वेगाने वाढत आहे तितक्याच वेगाने आपल्याला फसवणाऱ्या लोकांची संख्या आणि त्याचे वेगवेगळे प्रकार वाढत आहेत. 


नुकताच एक प्रकार जो ऐकण्यात आला तो अचंबित करणारा आहे. या प्रकारामध्ये तुमच्या अकाउंट वर तुम्हाला अनोळखी असणारा एखादा व्यक्ती पैसे टाकतो. थोड्यावेळाने तुम्हाला फोन येतो की चुकून माझ्याकडून तुमच्या अकाउंट वर अमुक रक्कम पडली आहे. माझ्याकडून चुकून त्यातले नंबर वेगळे दाबले गेले आणि ती रक्कम तुम्हाला आली. खूप विनंती दर्शक भाषा आणि  गरजू असल्याचे दाखवत असल्यामुळे तुम्हाला कोणतीही शंका येत नाही. मग सदर व्यक्ती तुम्हाला ही रक्कम ज्या खात्यावरून पाठवलेली आहे त्या खात्यावर न टाकता दुसऱ्याच एखाद्या खात्यावर टाकण्यास सांगते. तुम्हाला अजिबात शंका येत नाही आणि तुम्ही त्या व्यक्तीने सांगितलेल्या खात्यावर तुम्हाला आलेली रक्कम ट्रान्सफर करता आणि झाली गोष्ट विसरून जाता.... 


साधारण आठ दिवसा नंतर बरोबर तेवढीच रक्कम परत एकदा तुमच्या अकाउंट वरून ज्या अकाउंट वरून आली होती त्या अकाउंटला परत जाते .... आपोआप.....  तुम्हाला न कळता.... तुम्ही बँकेत तक्रार करायला गेल्यानंतर तुम्हाला मॅनेजर सांगतात की ज्या अकाउंट वरून तुम्हाला चुकून रक्कम आली होती त्या व्यक्तीने बँकेमध्ये त्याच दिवशी अर्ज करून ही रक्कम परत करण्याची विनंती बँकेला केलेली होती... प्रोसेस मध्ये वेळ गेल्यामुळे ही रक्कम आठ दिवसानंतर त्या व्यक्तीला परत पाठवण्यात आली...  
आता पश्चाताप करण्याची आणि संबंधित व्यक्तीला फोन करून ती रक्कम मला पाठवून द्या असे म्हणण्याची वेळ तुमच्यावर येते आणि त्या व्यक्तीने तुमचा फोन ब्लॉक करून टाकलेला असतो! 



काय करावे अशावेळी? एखाद्याने तुम्हाला काही रक्कम पाठवून देऊन ती चुकून तुमच्या खात्यावर आल्याची सांगितले तर तुम्ही त्या व्यक्तीला तू स्वतःच बँकेत जा आणि माझ्या खात्यावरची रक्कम परत घेण्याची विनंती कर असे सांगावे. फारच ओळखीचा निघाला तर ज्या अकाउंट वरून तुम्हाला रक्कम आली आहे त्याच अकाउंटला ती रक्कम परत करण्याचे सांगावे; परंतु चुकूनही दुसऱ्या अकाउंटला ती रक्कम ट्रान्सफर करू नये... 

सावध रहा : आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना, मित्र-मैत्रिणींना ही पोस्ट शेअर करून सावध करा! 

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

.... आणि आपत्कालीन स्थितीत मी!





 

"सर, माझी तब्येत बरी नाही आणि मी पप्पासोबत दवाखान्यात जात आहे"


"सर, मी मामाच्या गावी आली आहे"


"सर, मी एकटी तयार आहे आणि बाकीच्या कोणीच नाहीत!"


सगळ्यात कहर म्हणजे हा फोन होता!....
"सर, ज्या वर्गात पाईप आणि कॅन्ड ठेवले होते त्याची चावी हरवली आहे!"


आता हताश होऊन वाळणाऱ्या झाडांची काळजी मनात येवून सरळ आपणच जावून 14 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माझ्या शाळेतील झाडांना पाणी देण्यासाठी मी निघालो. घरी असणारे पाईपचे तुकडे, कनेक्टर, बकेट्या माझ्या फोर व्हिलर मध्ये घेतल्या.
 
"14 किलोमीटर जावून परत यायचे आहे म्हणजे 28 किलोमीटर पैकी 15 ते 20 किलोमीटर गाडी तुला शिकायला मिळेल...येतेस का?" नुकतेच ड्रायव्हिंग लायसन्स घेतलेल्या कन्येला ही ऑफर आवडली आणि ती सोबत आली.


दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होण्याच्या शेवटच्या दिवशी शाळेतील सगळी कामे व्यवस्थित पूर्ण करायची ठरले होते त्याप्रमाणे सगळे चालू होते. सुट्टीच्या काळामध्ये झाडांना पाणी व्यवस्थित मिळावे म्हणून वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून, त्यांना तारीखनिहाय नियोजन देवून, पाणी कसे द्यावयाचे हे समजून सांगितले होते. एका वर्गात शंभर फुटी रबरी पाईप आणि पाच वॉटर कँड तयार ठेवली होती. 


पण हे सगळं फेल गेले होते; म्हणून आपत्कालीन परिस्थितीत सुट्टीत शाळेत आलो होतो!

 
गावाच्या मैदानाच्या ओट्यावर करमणूक म्हणून काही गावकरी ठाण मांडून गप्पात रममाण झाले होते. दोन - चार तरुण (चेहऱ्यावरून एखाद- दुसरा माझा जुना विद्यार्थी असणारी) मुले हाती मोबाईल घेऊन कुठल्याशा गेम खेळण्यात दंग होती. एकालाही असे वाटले नव्हते की 'शाळा आपली, गाव आपले तर दोन बकेट पाणी देण्यासाठी आपण जावे!' असो... "तुम्ही नाही आलात तर तुमची पगार थोडीच बंद पडणार आहे?!" असे जर उत्तर दिले तर मी निरुत्तर होईल म्हणून कोणास काही न बोलता आपले काम केले. आपणही मनाच्या आनंदासाठी हे करताना कोणाकडून अशी अपेक्षा ठेवणे योग्यही नव्हते! 

इयत्ता तिसरीत शिकणारी कु श्वेता धनराज दहिफळे ही एकमेव विद्यार्थीनी पूर्णवेळ सोबत थांबली... तिच्यासह लेकीने मदत केल्याने अर्ध्यातासात मनाजोगते काम झाले होते.


बुधवारी 6 नोव्हेंबर 2024 रोजी कु कोमल कृष्णा गुट्टे, अक्षरा सचिन गुट्टे, पूनम बालासाहेब गुट्टे आणि यशश्री कृष्णा गुट्टे यांनी झाडांना पाणी दिले.