बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

हा नवा प्रकार तुम्हाला फसवू शकतो!


 

ऑनलाइन देवाण-घेवाण जितक्या वेगाने वाढत आहे तितक्याच वेगाने आपल्याला फसवणाऱ्या लोकांची संख्या आणि त्याचे वेगवेगळे प्रकार वाढत आहेत. 


नुकताच एक प्रकार जो ऐकण्यात आला तो अचंबित करणारा आहे. या प्रकारामध्ये तुमच्या अकाउंट वर तुम्हाला अनोळखी असणारा एखादा व्यक्ती पैसे टाकतो. थोड्यावेळाने तुम्हाला फोन येतो की चुकून माझ्याकडून तुमच्या अकाउंट वर अमुक रक्कम पडली आहे. माझ्याकडून चुकून त्यातले नंबर वेगळे दाबले गेले आणि ती रक्कम तुम्हाला आली. खूप विनंती दर्शक भाषा आणि  गरजू असल्याचे दाखवत असल्यामुळे तुम्हाला कोणतीही शंका येत नाही. मग सदर व्यक्ती तुम्हाला ही रक्कम ज्या खात्यावरून पाठवलेली आहे त्या खात्यावर न टाकता दुसऱ्याच एखाद्या खात्यावर टाकण्यास सांगते. तुम्हाला अजिबात शंका येत नाही आणि तुम्ही त्या व्यक्तीने सांगितलेल्या खात्यावर तुम्हाला आलेली रक्कम ट्रान्सफर करता आणि झाली गोष्ट विसरून जाता.... 


साधारण आठ दिवसा नंतर बरोबर तेवढीच रक्कम परत एकदा तुमच्या अकाउंट वरून ज्या अकाउंट वरून आली होती त्या अकाउंटला परत जाते .... आपोआप.....  तुम्हाला न कळता.... तुम्ही बँकेत तक्रार करायला गेल्यानंतर तुम्हाला मॅनेजर सांगतात की ज्या अकाउंट वरून तुम्हाला चुकून रक्कम आली होती त्या व्यक्तीने बँकेमध्ये त्याच दिवशी अर्ज करून ही रक्कम परत करण्याची विनंती बँकेला केलेली होती... प्रोसेस मध्ये वेळ गेल्यामुळे ही रक्कम आठ दिवसानंतर त्या व्यक्तीला परत पाठवण्यात आली...  
आता पश्चाताप करण्याची आणि संबंधित व्यक्तीला फोन करून ती रक्कम मला पाठवून द्या असे म्हणण्याची वेळ तुमच्यावर येते आणि त्या व्यक्तीने तुमचा फोन ब्लॉक करून टाकलेला असतो! 



काय करावे अशावेळी? एखाद्याने तुम्हाला काही रक्कम पाठवून देऊन ती चुकून तुमच्या खात्यावर आल्याची सांगितले तर तुम्ही त्या व्यक्तीला तू स्वतःच बँकेत जा आणि माझ्या खात्यावरची रक्कम परत घेण्याची विनंती कर असे सांगावे. फारच ओळखीचा निघाला तर ज्या अकाउंट वरून तुम्हाला रक्कम आली आहे त्याच अकाउंटला ती रक्कम परत करण्याचे सांगावे; परंतु चुकूनही दुसऱ्या अकाउंटला ती रक्कम ट्रान्सफर करू नये... 

सावध रहा : आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना, मित्र-मैत्रिणींना ही पोस्ट शेअर करून सावध करा! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा