1996 चा काळ म्हणजे वर्तमानपत्रे समाजात अधिक वाचली जाणारा काळ. आजही त्यांचे वेगळे महत्व आहेच पण ईलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्ही यांनी दैनिकांच्या वाचक वर्गात मोठी घट केली आहे.
मी तीन वर्षा पुर्वी डी.एड शिक्षक झालो होतो पण वर्तमानपत्र आणि पुस्तके यातील लेखक, कवी यांच्या विषयी वाचनामुळे खूप मोठेपणा-वलय वाटत होते. आपण त्यांच्यासारखे व्हावे असे वाटायचे, खूप लोकांनी आपल्याला ओळखावे असे नेहमी वाटायचे.
बालपणापासून मला वाचनाची खूप आवड. हाती पडेल ते पुस्तक वाचत गेलो. मराठीतील कथा कविता खूप आवडायच्या.
पिंपळगाव गाढे हे माझे मूळ गाव. उन्हाळी सुटट्यात दरवर्षी तेथे जायचो. माझे चुलते शिक्षक आणि गावातील सार्वजनिक वाचनालयाचे संचालक श्री महालिंगअप्पा फुटके यांच्यामुळे वाचनालयातील पुस्तके वाचायला मिळायची. सकाळी वाचनालय़ उघडले की 5 पुस्तके घेऊन जायचो, गच्चीवर-पायर्यावर बसून पुस्तकांच्या दुनियेत हरवून जायचो. जेवण करण्यासाठी, कामासाठी मारलेल्या हाका मला कधीच कळत नव्हत्या.
संध्याकाळी पुन्हा वाचनालयात हजर ! सकाळी घेतलेली पुस्तके वापस करून नवी 5 पुस्तके घ्यायचो! (जास्त देत नव्हते म्हणून) रात्री पुन्हा त्याच पुस्तकांच्या दुनियेत!
हनुमानाच्या शेपटीला धरून रावणाची भव्य लंका पाहिली, शूर सिन्दबादच्या जहाजात बसून अनेक देश फिरलो, इसापच्या दुनियेत, पंचतंत्रात प्राण्यांकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकल्या, राजा भोज सोबत सिंहासनाची एकेक पायरी चढत नव्या नव्या कथा शिकलो, विक्रमादित्य आणि वेताळ कहाणी भीत भीत वाचायचो पण झोपेत दचकून कधी उठायचो नाही (आजकाल टीव्ही वर मालिका पाहून मुले उठतात तशी! त्याचे कारण पुढे सांगतो) अलिफ लैला, अकबर बिरबल,जातक कथा, तेनली राम यातील पात्रे म्हणजे माझ्या आयुष्यातील हीरो आहेत. कॉमिक्स मध्ये नव्याने फॅटम आणि नवी पात्रे आली होती- या गोष्टी सुद्धा खूप खूप आवडीने वाचायचो. मुलांसाठी असणारी चांदोबा, चंपक, सोवियत रशिया येथून येणारे हिंदीतील मासिक या सर्वांचा माझ्यावर छान परिणाम होत होता...त्या काळी असणारे सर्व दैनिके आणि मासिके माझे मामा श्री उदगिरकर बंधू यांच्याकडे वाचायला मिळायचे.
गोष्टीच्या पुस्तकांनी माझे जीवन समृद्ध केले आहे असे मला वाटते. सगळ्या चांगल्या सवयी- कोणाशी कसे, काय बोलावे- मित्राशी कसे वागावे- काय खावे असे सारे सारे मला पुस्तकांनी दिले. कधी एकटा पडू दिले नाही, खूप वेळा तर मी मनाशी संवाद करायचे- हवेत बोटे फिरवून काही चित्रे काढायचो- अक्षरे गिरवायचो ( एक दोनदा तर यासाठी मार पण खाल्ला घरच्यांकडून!)
झाडाखाली शेतात एकटा बसायला घाबरत नव्हतो-घरी रात्री एकटा झोपायला घाबरत नव्हतो, त्याचे कारण पुस्तके ! वाचायची किंवा वाचलेली असतील तर त्यांच्या विचारात कल्पनेत छान झोप लागायची.
मला वाटते पुस्तके आपल्या कल्पना शक्तीमध्ये खूप मोठी वाढ करतात, आपल्या आयुष्यातील रितेपणा दूर करतात...ज्याचे बालपण अश्या कल्पनाशक्तीने भरलेले नसेल त्याचे आयुष्य रिते, कोरडे आणि रूक्ष जाऊ शकते! आपल्या जीवनातील अनेक समस्या कल्पनाशक्तीने दूर होऊ शकतात, कामात नावीन्य येते...माणूस प्रत्येक काम आनंदाने, उच्च ध्येयाने प्रेरित होऊन करू शकतो....नीतीमत्ता, माणुसकी, आपुलकी हे सगळे त्याला पुस्तकाने बहाल केलेले असते....सारासार विचार, आत्मशक्ति हे गुण त्याला मिळालेले असतात...म्हणूनच विक्रम वेताळ ची कहाणी वाचून सुद्धा तो घाबरत नाही कारण पुस्तकाने खरा देव आणि भूत कोणते हे ही त्याला सांगितलेले असते!
पुस्तके आणि रेडिओ कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी जेवढी मदत करतात तेवढी टीव्ही हानिकारक असते. टीव्हीत जो राजा दाखवलेला असेल तोच तुम्हाला दिसेल, जे राक्षस दाखवलेले असेल तेच तुमचे डोळे पाहतील....पण पुस्तक वाचत असताना तुम्ही राजा कसा असेल त्याची कल्पना करत असाल कदाचित एकच गोष्ट वाचणारा प्रत्येक मुलगा त्याच्या राजाचे वर्णन वेगळे करेल....हीच गोष्ट रेडिओ साठी पण जुळते...आम्ही रेडिओ खूप ऐकला....श्रवण चांगले केले...पुस्तकांनी आणि रेडिओ यांनी माझी एकाग्र शक्ति पण वाढवली...आज व्याख्यान ऐकत असताना, ट्रेनिंग मध्ये अनेक तास बसून मला एकाग्र बसून ऐकता येते...ही पुस्तकांची देण!
मुलांसाठी आपण काहीतरी लिहिले पाहिजे या प्रबळ इच्छेमुळे दैनिक वैद्यनाथ टाइम्सला श्री संजय खाकरे यांच्या सोबत 1995 मध्ये काम सुरू केले आणि येथेच प्रथम 'शेखर अंकल' चा जन्म झाला. मुलांना वडीलांपेक्षा काका जास्त आवडतात आणि ते त्याचा लाड पण करतात हे लक्षात घेऊन "शेखर अंकल" हे नाव मी स्वत: साठी घेतले.
दैनिक वैद्यनाथ टाइम्स आणि दैनिक मराठवाडा साठी हे त्या काळी परळीतील आपापसात स्पर्धा करणारे वर्तमानपत्रे! साथीने आपले रूपडे काळानुसार लवकर बदलले म्हणून ते पुढे आले आणि कालांतराने दैनिक वैद्यनाथ टाइम्स बंद झाले. साथीमध्ये आपल्याला चित्रासह गोष्टी देता येतील आणि अनेक चांगले उपक्रम राबवता येतील हे समजल्यानंतर श्री लक्ष्मण वाकडे यांच्या मदतीने संपादक श्री सतीश बियाणी यांना बोललो आणि 1996 पासून दैनिक मराठवाडा साथीचा 'अंकल' परळीसाठी कार्यरत झाला.
दिवंगत मुख्य संपादक श्री मोहनलाल जी बियाणी( काकाजी) यांच्याकडून नेहमी गप्पा मारता मारता अनेक अनुभव घेता आले. ( पुढे चालून रविवारचे सदर प्रसिद्ध झाले आणि मला काकाजी नेहमी 'अंकल' म्हणू लागले- एकदा तर काकाजींच्या वयाचे काही व्यक्ती त्यांना गप्पा मारत बसले होते, मी येताना दिसलो आणि काकाजी म्हणाले, या अंकल..मला पाठमोरे असलेले ते पाहुणे काकाजीचे कोणते अंकल आले म्हणून कुतूहुलाने पाहु लागले तर जेमतेम 22 वर्ष वयाचा मी!)
रविवारचे सदर सुरू झाले ते दैनिकाच्या एका कोपर्यात मात्र पुढे ते पानभर पसरले आणि तसेच आमचे चिमुकले वाचक सुद्धा मराठवाडा भर पसरले !
शाळा शाळा मधून मुले चित्र पाठवू लागली, गोष्टी लिहु लागली, कथा वाचू लागली, कोडे सोडवून पुस्तकरूपी बक्षीस मिळवू लागली....रविवारचा अंक लवकर संपू लागला तर कधी कधी दुपारी परत छपाई करण्याची गरज पडली...! दर सोमवारी साथी कार्यालयात मुलांच्या हस्तलिखितांचा पाऊस पडत होता...पोस्टमन 400-500 पत्रांचा गठ्ठा बांधून कार्यालयात घेऊन यायचा! आज स्वप्नवत ( माझ्यासाठी तरी) वाटत असलेले ते दिवस खरोखर मंथरलेले होते....अनेक वेळा माझी शाळा करून परळी येथील शाळा प्रार्थनेच्या वेळी गाठायचो आणि मुलांना भाग घेण्यासाठी आवाहन करायचो...सर्व शाळेत गेलो पण "शेखर अंकल" कोण आहेत हे कधी सांगितले नाही, माझा फोटो सुद्धा कधी छापला नाही...मलाच पत्रे देऊन मुले म्हणायची - हे शेखर अंकलला द्याल ना? मनात हसायचो आणि ठरवायचो असेच गुप्त राहू!
साथी दैनिकाच्या या अंकलने पुढची अनेक वर्षे सतत मुलांसाठी काम केले... विवाहाच्या आधी कुटूंबियांनी तर नंतर पत्नी सुजाताने मोठी मदत केली ......बर्याचदा रविवारी हे सदर नसले की मुले नाराज होत...मला त्यासाठी खूप वेळ द्यावा लागत होता...काम वाढत होते...पत्रे वाचणे, उत्तरे देणे, बक्षिसे देणे...कार्यक्रम आयोजित करणे...शाळा भेटी...पण हे सर्व आनंदाने करत होतो....
परळीतील सर्व मुलांना सोपे जावे म्हणून त्यांची उत्तरे, कथा, कविता स्विकारण्याची ठिकाणे वाढवली- शिवशक्ति मेडिकल गणेशपार, मुंदडा स्टेशनर्स मोंढा ....त्यांचे खूप सहकार्य लाभले....
“मुलांना लिहिते केले पाहिजे अंकल”....मला सतत मार्गदर्शन करणारे आबासाहेब वाघमारे सर मला म्हणाले, “ त्यासाठी त्यांची कार्यशाळा घे!” ठरले आणि पहिली बाल-लेखक कार्यशाळा मराठवाडा साथी कार्यालयात झाली...निवडक लिहिते विद्यार्थी यासाठी निमंत्रित केले गेले( हो, त्यांच्या नावचे पत्र शाळेला गेले- किती अभिमानाने ही मुले कार्यशाळेला आली आणि खूप काही शिकून गेली) दुसरी कार्यशाळा बाबा रामदेव मंदिरात झाली...
साथी दैनिकाने अंकलला आयुष्यात काही कमी पडू दिले नाही....अंकलने जे जे सांगितले ते ते केले, दिले....म्हणून ‘अंकल’ कायमचा साथी चा झाला...
पुढे पुढे मुलांनी खूप पुस्तके वाचावीत म्हणून प्रत्येक शाळेत साथी ने संदेश यात्रा काढली-वाचाल तर वाचाल! भरपूर प्रतिसाद मिळाला...प्रत्येक शाळेत नवा वक्ता मुलांना मार्गदर्शन करत होता...तालुक्यातील 50 पेक्षा जास्त शाळेत ही यात्रा पोंहचली...गोष्टीची पुस्तके मुले मागू लागली...
"कारगिल प्रबोधन यात्रा" हा सुद्धा साथी परिवाराने आयोजित केलेला कार्यक्रम सर्वांना आवडला...साथी कार्यालयात त्या काळी ज्ञानोबा सुरवसे, प्रदीप कुलकर्णी, प्रशांत जोशी (दोन्ही), सुधीर गोस्वामी, बालासाहेब कडबाने हे माझे सहकारी होते...डिटिपी ऑपरेटर म्हणून राम मुळाटे, मधुकर कुकर, संतोष जुजगर यांची पेज जुळवणी मुलांना आवडायची....
साथी दैनिकाने आजतागायत श्री चंदूलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी छान छान कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि करत आहेत...दिवाळी अनुपम भेट स्पर्धा असतील...बाल धमाल असेल...मुलांना लिहिते करणे-त्यांच्या क्रियाशिलतेला वाव देणे आणि पर्यायी त्यांच्या निरागस आनंदात सहभागी होणे, त्या आनंदाचे कारण बनणे हे सोडलेले नाही.... कालच्या परळी भूषण कार्यक्रमात माझ्याच साथी परिवाराने मला " विशेष गौरव" म्हणून सन्मान दिला म्हणून हा काळ भरभर नजरेसमोरून गेला.. .. आजपर्यंत हजारो मुलांनी साथी च्या कार्यक्रमांचा, दैनिकातून लिहिते होण्याचा लाभ घेतला आहे...आज ज्या मुलांनी बाल धमाल च्या स्पर्धा मध्ये भाग घेतला असेल त्यांच्या आई पप्पांनी सुद्धा लहानपणी ‘अंकल’ च्या सदरात भाग घेतलेला आहे...हे कार्य असेच पिढ्यांपिढ्या सुरू राहावे ही शुभेच्छा , त्यासाठी पूजा बियाणी, राजू बियाणी हे बियाणी परिवाराचे सदस्य आणि राकेश जाधव, दत्ता काळे हे नव्या पिढीतील पत्रकार तयार व्हावेत..