शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३
श्री नावकेकर सर : या हृदयीचे त्या हृदयी याप्रमाणे मग्न होऊन अध्यापन करणारे प्रेमळ शिक्षक
त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे व निरोगी जावो अशी मनःपूर्वक शुभेच्छा त्यांच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या व सहकाऱ्यांच्या वतीने देतो.
शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३
चिमुकले हात सुंदर आकारांना सुबकतेने साकारत होते...
छोटे, चिमुकले हात आज फोटो फ्रेम, पेन स्टॅण्ड, झुंबर, पर्स पासून ते सजावटीच्या सुंदर आकारांना सुबकतेने साकारत होते...
वह्या, पेन, पुस्तकांऐवजी आज विद्यार्थ्यांच्या हाती कात्री, रंगीत कागद आणि विविध साहित्य दिसत होते.....
शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने दर पंधरा दिवसाला होणाऱ्या स्पर्धेत आज पेपर क्राफ्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.
कला शिक्षक हे पदच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नसते. येथील नियमित शिक्षकच क्रीडा शिक्षक, कला शिक्षक, संगीत शिक्षक आणि सर्व विषयांचे अध्यापन करत शालेय पोषण आहारापासून ते कारकूनसह शाळेतल्या सर्व जबाबदाऱ्यांचे काम करत असतात; पण कारणे न सांगता विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी विविध उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेतले जातात.
विद्यार्थ्यांच्या मदतीने हे उपक्रम होत असल्याने त्यातला उत्साह कायम आहे. पेपर क्राफ्टच्या आजच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी निसर्गातील अनेक सुंदर प्रसंग, त्याचबरोबर नित्य उपयोगी वस्तू कागदाच्या मदतीने सुंदररीतीने तयार केल्या. विद्यार्थ्यांची कल्पक बुद्धी या निमित्ताने दिसून आली.
दर पंधरा दिवसाला होणाऱ्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्गातून तीन बक्षीस दिले जातात; परंतु आजच्या स्पर्धेमध्ये बक्षिसे देताना परीक्षक शिक्षकांनाही अधिक संख्येमध्ये बक्षीस हे द्यावी लागली हेच या स्पर्धेचे वैशिष्टय म्हणावे लागेल.
शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री चि कन्हैया गुट्टे, उपमुख्यमंत्री कु राधा गुट्टे यासह कलामंत्री कु समृद्धी गुट्टे यांनी मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री दत्ताराव मुंडे, सरोजकुमार तरुडे, राजेश्वर स्वामी, चंद्रशेखर फुटके, श्रीमती प्रिया काळे, श्रीमती शुभांगी चट यांनी परिश्रम घेतले.
बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३
वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली असून शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण वर्गशिक्षकांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून दुसऱ्या व चौथ्या शनिवारी शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्पर्धांचे अर्धवार्षिक नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांचा तसेच व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन मिळेल अशा स्पर्धांचा विचार करून हे नियोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख म्हणून श्री फुटके तसेच सर्व वर्गांचे वर्गशिक्षक श्री तरुडे, श्री स्वामी, श्री मुंडे तसेच श्रीमती काळे, श्रीमती चट यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे.
शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून चि कन्हैया ज्ञानेश्वर गुट्टे तर उपमुख्यमंत्री म्हणून कु राधा अनंत गुट्टे कामकाज पाहत आहेत.
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३
सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३
हा प्रवास असाच आनंदाचा होवो!
हा प्रवास असाच आनंदाचा होवो!
शिक्षक म्हणून नोकरीस लागून बाल गोपाळांच्या सहवासामध्ये किती लवकर 30 वर्षे झाली याचा मला विश्वास वाटत नाही.... असे वाटते की कालपरवाच तर मी शिक्षक म्हणून नोकरीस लागलो आहे!
पहिल्या दिवशी जो उत्साह विद्यार्थ्यांसमोर जात असताना असायचा तो आजही कायम आहे..... माझ्या विद्यार्थ्यांना नवे उपक्रम कसे देता येतील, नव्या पद्धतीने त्यांच्याकडून अभ्यास करून कसा घेता येईल, कुठे काही दिसले तर हे माझ्या विद्यार्थ्यांसाठी कशाप्रकारे उपयोगात आणता येईल, कुठे चांगली शाळा-उपक्रमशील शिक्षक दिसले की त्यांच्याकडून मला काय शिकता येईल हे आजही तीस वर्षानंतर मला वाटते... हे असं वाटणं आणि हे असं कायम व्यस्त राहणं यात मला आनंद मिळतो आणि ते माझ्या सेवेच्या शेवटपर्यंत राहो हीच आजच्या दिवशी मी भगवंताकडे प्रार्थना करेल....
शिक्षक सेवेबद्दल कधी कोणी वाईट बोललं की थोडीशी निराशा येते; पण ती फार काळ टिकत नाही. कुठल्यातरी माध्यमातून कुणीतरी अमुक तमुक आमच्यावर तोंडसुख घेतो... पण खरं सांगतो, एकदा मुलं समोर आली की ती नैराश्यता, ते सगळं निगेटिव्ह ऐकलेलं पार विसरून जातो! अगदी पहिल्या दिवशीच्या उत्साहानेच दर दिवशी शिकवतो! आणि हो, जसे निराशाजनक कोणीतरी बोलते तसेच कधी कधी कोणी कोणी हरभऱ्याच्या झाडावरही नेऊन ठेवते! कोणी माझे खूप कौतुक केले त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच माझ्या नेहमीच्या भूमिकेत मी माझे अध्यापन करण्याचा प्रयत्न करत असतो...... भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की हे ही माझ्या सेवेच्या शेवटपर्यंत टिकू दे!
तीस वर्षांच्या सेवेमध्ये बरेचसे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या उदरनिर्वाहाच्या सेवेत गुंतले असतील आणि अपेक्षा आहे की हे सर्वजण ती सेवा प्रामाणिकपणे करत असतील..... इमानी इतबारे जीवन व्यतीत करत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षकाला अभिमान वाटतच असतो.; परंतु नकळत या कार्यात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील आणि एखादा विद्यार्थी दुखावला गेला असेल तर मी मनःपूर्वक क्षमा मागतो!
तीस वर्षांच्या या सेवा कालामध्ये अनेक मार्गदर्शक लाभले, ज्या ज्या गावात सेवा दिली त्या गावातील गावकऱ्यांचे सहकार्य लाभले, वेगवेगळ्या शाळांमधील माझ्या सहकारी बांधवांमुळे माझे शाळेतले दिवस अतिशय आनंदाचे गेले, वेगवेगळ्या उपक्रमात त्यांच्यासोबत काम करताना उत्तम अनुभव मिळाले आणि मी समृद्ध होत गेलो..... म्हणून त्या सर्वांचेही मला आभार मानावेसे वाटतात..... Thank You Very Much!
गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३
अर्णव बुक्कापाटीलचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे
सिंगापूर येथे राहत असलेल्या परळी वैजनाथ तालुक्यातील गाढे पिंपळगावच्या ज्योती थोंटेच्या मुलाने सिंगापूरच्या सर्वोत्कृष्ट शाळेत आपल्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळवला असून 160 विद्यार्थी क्षमता असलेल्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून 3000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती.परळी वैजनाथ जिल्हा बीड तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थीनी असलेली ज्योती वैजनाथअप्पा थोंटे ही सध्या इंजिनियर म्हणून सिंगापूर येथे सेवेस आहे. तिचा मुलगा अर्णव बुक्कापाटील हा सध्या शालेय शिक्षण घेत आहे. सिंगापूर येथे गणित व विज्ञान विषयांसाठी खास सुप्रसिद्ध असलेल्या NUS High School of Math and Science, Singapore शाळेत आपला प्रवेश व्हावा हे अर्णवचे स्वप्न होते. त्याने यासाठी खास अभ्यास केला. यासाठी झालेल्या दुसऱ्या राऊंड मध्येच त्याचा प्रवेश निश्चित करण्यात आला. वास्तविक पाहता या शाळेत तिसऱ्या राऊंड मध्ये मुलाखत घेण्यात येऊन मगच प्रवेश निश्चित करण्यात येत असतो. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेण्यासाठी अर्णव जणू सज्ज झाला आहे. आपले मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी लागते याचे आदर्श उदाहरण अर्णवने मुलांसमोर ठेवले आहे.
आपल्या आवडत्या विषयाची फक्त अभ्यासाला दिलेली पुस्तके वाचून अर्णव थांबत नाही तर त्या संदर्भातील वाचनालयात असणारी पुस्तके वाचन करणे ही त्याची खास आवडीची गोष्ट आहे. त्याची ही सवय अगदी लहान असल्यापासून आहे. खगोल विषयातील त्याचे ज्ञान अचंबित करणारे आहे. कोरोना काळात PDSE (Platform for Development of Spoken English) या कार्यक्रमात महाराष्ट्रातील मुलांना इंग्रजीतून संवाद करण्यासाठी त्याची मुलाखत घेण्यात आली होती त्यावेळी त्याच्या उत्तरांनी मुले प्रभावित झाली होती. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अर्णव अतिशय अप्रतिम पद्धतीने देत होता. अर्णव व त्याच्या आई वडिलांचे कौतुक करताना आम्हाला नक्कीच आनंद होत आहे.
मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३
असे लिहा साहित्यसम्राट अण्णांचे यॊग्य पद्धतीने नाव !