शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

श्री नावकेकर सर : या हृदयीचे त्या हृदयी याप्रमाणे मग्न होऊन अध्यापन करणारे प्रेमळ शिक्षक

 

          शाळेमध्ये असताना मुलांमध्ये रममाण होणारे आणि शाळा नसताना निसर्गाच्या सहवासात हरवून जाणारे अशी ज्यांची ओळख सांगता येईल ते श्री नावकेकर संभाजी भाऊराव हे 31 ऑगस्ट रोजी सेवेतून निवृत्त झाले. जिल्हा परिषद शाळांमध्ये सहशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द विद्यार्थीप्रिय, सहकारीप्रिय आणि पालकप्रिय अशी होती. 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे त्यांच्यासोबत 2005 ते 2012 या कालावधीमध्ये सोबत काम करण्याचा आनंद घेता आला. 
शाळेची गुणवत्ता वाढावी, भौतिक, शैक्षणिक विकास व्हावा यासाठी त्यांची नेहमी धडपड असायची. काही कालावधीसाठी प्रभारी मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. 


प्रभारी मुख्याध्यापक असताना शाळेच्या मैदानाचा काही भाग त्यांनी उत्तम दर्जाची हराळी खरेदी करून गार्डन म्हणून विकसित केला होता. शाळेचे हे मागील मैदान प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर अतिशय घाणरेडे झालेले असल्याचे जून मध्ये शाळा सुरु होताच लक्षात यायचे. श्री नावकेकर सर आणि टीमने अक्षरश: नांगर फिरवून हे मैदान बागेसाठी योग्य केले होते.  इथे झाडांना पाणी मिळावे म्हणून गावासाठी बंद असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीतून स्वखर्चाने मोटर टाकून शाळेपर्यंत पाईपलाईनची सुविधाही त्यांनी केली होती. हिरवा गालिचा पसरलेला हा मैदानाचा भाग आणि त्यात पाण्याचे छोटासे कारंजे शाळेचा भाग सुशोभित करत होते. 


मुलांना आनंदाने शिकता यावं यासाठी शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर व्हावा म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न विशेष दखल घेण्याजोगे आहेत. झाडे लावण्यापूर्वी शाळेला साधे कंपाउंड होते म्हणून त्यांनी तारेचे कंपाउंड करून घेतले. गावचे त्याकाळचे उपसरपंच श्री बालाजी प्रभू मुंडे यांना भेटल्यानंतर त्यांनी मजबूत असे कंपाउंडही तयार करून दिले होते. 


कंपाउंडची सुरक्षितता आणि खळाळते पाणी यामुळे शाळेचे मैदान वृक्षांनी नटले होते. लहान मध्यंतरात किंवा मोठ्या मध्यांतरात सरांना वेळ मिळाला की ते फक्त झाडांच्या भोवतीच असायचे.
वर्गातून बाहेर येताना खडूमुळे पांढरे झालेले हात तर वर्गात जाताना झाडांभोवती कुंपण करताना चिखलाने भरलेले हात ते स्वच्छ करताना बहुतेकदा दिसत. 


त्यांनी जेव्हा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यभार हाती घेतला तेव्हा शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. सरांनी विनंती केल्यानंतर बांधकाम विभागाने एक मोठा पाईप क्रेनच्या साह्याने शाळेत दिला  आणि सार्वजनिक बोअरचे पाणी पाईपद्वारे यात सोडण्यात येऊन पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. पिण्याच्या पाण्याची ही सोय करण्यासाठी सरांनी व्यक्तिशः खूप मेहनत घेतली. 


जिथे जून मध्ये शाळा उघडल्यानंतर कुलूप तोडलेले असायचे अथवा कधीकधी वर्गात घाण असलेली दिसून यायची त्याच गावचे ग्रामस्थ आता शाळेशी प्रेमाने जोडले गेले होते आणि त्यात श्री नावकेकर सरांची भूमिका मोलाची होती. नावकेकर सर आणि टीम मेहनत घेत असल्याचे पाहून गावकरीही पुढे आले. मदत मिळत गेली, ऑफिसची फरशी बदलण्यात आली, प्रत्येक वर्गामध्ये फॅन बसवण्यात आले, वर्गांची रंगरंगोटी करण्यात आली. आवश्यक तिथे दुरुस्ती केली गेली. शाळेची लाईट फिटिंग होताना सरांचा रात्रीचाही वेळ शाळेत जात होता. 


विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास होण्यासाठी विविध स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलने, त्याचबरोबर शैक्षणिक सहलींचे आयोजनही नावकेकर सरांच्या काळात करण्यात आले होते. 


विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांची तळमळ ही अतिशय मोलाची होती म्हणूनच विद्यार्थ्यांशी त्यांचे नाते अतिशय चांगल्या प्रकारचे होते. आजही त्यांचे माजी विद्यार्थी अतिशय आदरणीय त्यांच्याशी बोलतात, त्यांची चौकशी करतात. वर्गात असताना जणू या हृदयीचे त्या हृदयी याप्रमाणे मग्न होऊन अध्यापन करणारे श्री नावकेकर सर आज पुन्हा शाळेत दिसणार नसले तरी निसर्ग शाळेत ते तितकेच रममाण होतील यात शंका नाही. 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरूनगर टोकवाडी येथे त्यांचा सेवेचा शेवटचा भाग गेला. या वस्ती शाळेत विद्यार्थी संख्या वाढवण्यापासून ते गुणवत्ता वाढीसाठीचे त्यांचे प्रयत्न असेच अविरत सुरु होते. शाळा छोटी असूनही स्नेह संमेलन, विविध स्पर्धा, आंतर शालेय स्पर्धेत भाग घेतला जायचा. 


त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे व निरोगी जावो अशी मनःपूर्वक शुभेच्छा त्यांच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या व सहकाऱ्यांच्या वतीने देतो. 
- चंद्रशेखर फुटके, परळी 

















शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

चिमुकले हात सुंदर आकारांना सुबकतेने साकारत होते...

 छोटे, चिमुकले हात आज फोटो फ्रेम, पेन स्टॅण्ड, झुंबर,  पर्स पासून ते सजावटीच्या सुंदर आकारांना सुबकतेने साकारत होते...

वह्या, पेन, पुस्तकांऐवजी आज विद्यार्थ्यांच्या हाती कात्री, रंगीत कागद आणि विविध साहित्य दिसत होते.....
शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने दर पंधरा दिवसाला होणाऱ्या स्पर्धेत आज पेपर क्राफ्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.
 
कला शिक्षक हे पदच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नसते. येथील नियमित शिक्षकच क्रीडा शिक्षक, कला शिक्षक, संगीत शिक्षक आणि सर्व विषयांचे अध्यापन करत शालेय पोषण आहारापासून ते कारकूनसह शाळेतल्या सर्व जबाबदाऱ्यांचे काम करत असतात; पण कारणे न सांगता विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी विविध उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेत घेतले जातात. 

विद्यार्थ्यांच्या मदतीने हे उपक्रम होत असल्याने त्यातला उत्साह कायम आहे. पेपर क्राफ्टच्या आजच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी निसर्गातील अनेक सुंदर प्रसंग, त्याचबरोबर नित्य उपयोगी वस्तू कागदाच्या मदतीने सुंदररीतीने तयार केल्या. विद्यार्थ्यांची कल्पक बुद्धी या निमित्ताने दिसून आली. 

दर पंधरा दिवसाला होणाऱ्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्गातून तीन बक्षीस दिले जातात; परंतु आजच्या स्पर्धेमध्ये बक्षिसे देताना परीक्षक शिक्षकांनाही अधिक संख्येमध्ये बक्षीस हे द्यावी लागली हेच या स्पर्धेचे वैशिष्टय म्हणावे लागेल. 
शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री चि कन्हैया गुट्टे, उपमुख्यमंत्री कु राधा गुट्टे यासह कलामंत्री कु समृद्धी गुट्टे यांनी मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री दत्ताराव मुंडे, सरोजकुमार तरुडे, राजेश्वर स्वामी, चंद्रशेखर फुटके, श्रीमती प्रिया काळे, श्रीमती शुभांगी चट यांनी परिश्रम घेतले. 



बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली असून शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण वर्गशिक्षकांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.  


विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून दुसऱ्या व चौथ्या शनिवारी शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्पर्धांचे अर्धवार्षिक नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांचा तसेच व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन मिळेल अशा स्पर्धांचा विचार करून हे नियोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख म्हणून श्री फुटके तसेच सर्व वर्गांचे वर्गशिक्षक श्री तरुडे, श्री स्वामी, श्री मुंडे तसेच श्रीमती काळे, श्रीमती चट यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे. 
शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून चि कन्हैया ज्ञानेश्वर गुट्टे तर उपमुख्यमंत्री म्हणून कु राधा अनंत गुट्टे कामकाज पाहत आहेत. 









 

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

कासारवाडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा












*विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कासारवाडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

ग्रामपंचायत कासारवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय कासारवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी या ठिकाणी सरपंच सौ उर्मिला बंडू गुट्टे तसेच उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा सर्व गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी घेतली. बालविवाहास कोणीही प्रोत्साहन देणार नाही अथवा मदत करणार नाही असे गावकऱ्यांनी आश्वासन दिले. 

त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये विविध महात्म्यांची तसेच स्वातंत्र्यासाठी मेहनत घेणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची भूमिका घेणारे विद्यार्थी शोभून दिसत होते. ढोल, ताशा, हलगी यांच्या गजरामध्ये विद्यार्थी बालविवाहाच्या आणि भारत मातेच्या घोषणा देत होते. प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांसह गावातील ग्रामस्थांचाही मोठा सहभाग होता. विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थ असणे हे फारच कमी गावात असते कासारवाडीत मात्र देशभक्ती जणू प्रत्येक ग्रामस्थाच्या रक्तातच आहे. ध्वजारोहणास आणि प्रभात फेरी त्यामुळेच मोठी शोभा येते. 

प्रभात फेरी शाळेच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाचा सन्मान तसेच पोलीस खात्यात सेवा करणाऱ्या पोलिसांचा सन्मान करण्यात आला. ग्रामसेवक श्री नागरगोजे यांनी मेरी माटी मेरी देश या कार्यक्रमाची माहिती देऊन प्रत्येक गावातून कलशाद्वारे राजधानी दिल्ली येथे माती दिली जाणार असल्याचे सांगितले व गावकऱ्यांनी प्रेमभावे कलशात माती भरण्याचे आवाहन केले त्यानुसार ग्रामस्थांनी कलशात माती भरली व राष्ट्रभावना व्यक्त केली. 

अंगणवाडी ते इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये वक्तृत्व करून गावकऱ्यांची मने जिंकली. राष्ट्रभक्तीपर गीतांचे गायन तसेच राष्ट्रभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य केले. 

या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनेक शेरोशायरींची उत्कृष्टपणे गुंफण करत बहारदारपणे श्रीमती प्रिया काळे यांनी केले. संचलनाबद्दल त्यांचा तसेच नवीन शिक्षक श्री स्वामी व श्री मुंडे यांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

ग्रामपंचायत कासारवाडीच्या वतीने विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना खाऊ वाटप करण्यात आला. 

गावचे सरपंच श्री बंडू गुट्टे यांच्यासह शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे, उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष श्री हनुमान देवकते, ग्रामसेवक श्री नागरगोजे, पोलीस पाटील श्री बाबुराव गुट्टे यांच्यासह शिक्षण प्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री राठोड यांच्यासह शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. 


सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

हा प्रवास असाच आनंदाचा होवो!


 

हा प्रवास असाच आनंदाचा होवो!

शिक्षक म्हणून नोकरीस लागून बाल गोपाळांच्या सहवासामध्ये किती लवकर 30 वर्षे झाली याचा मला विश्वास वाटत नाही.... असे वाटते की कालपरवाच तर मी शिक्षक म्हणून नोकरीस लागलो आहे! 


पहिल्या दिवशी जो उत्साह विद्यार्थ्यांसमोर जात असताना असायचा तो आजही कायम आहे.....  माझ्या विद्यार्थ्यांना नवे उपक्रम कसे देता येतील, नव्या पद्धतीने त्यांच्याकडून अभ्यास करून कसा घेता येईल, कुठे काही दिसले तर हे माझ्या विद्यार्थ्यांसाठी कशाप्रकारे उपयोगात आणता येईल, कुठे चांगली शाळा-उपक्रमशील शिक्षक दिसले की त्यांच्याकडून मला काय शिकता येईल हे आजही तीस वर्षानंतर मला वाटते... हे असं वाटणं आणि हे असं कायम व्यस्त राहणं यात मला आनंद मिळतो आणि ते माझ्या सेवेच्या शेवटपर्यंत राहो हीच आजच्या दिवशी मी भगवंताकडे प्रार्थना करेल....


शिक्षक सेवेबद्दल कधी कोणी वाईट बोललं की थोडीशी निराशा येते; पण ती फार काळ टिकत नाही. कुठल्यातरी माध्यमातून कुणीतरी अमुक तमुक आमच्यावर तोंडसुख घेतो... पण खरं सांगतो, एकदा मुलं समोर आली की ती नैराश्यता, ते सगळं निगेटिव्ह ऐकलेलं पार विसरून जातो! अगदी पहिल्या दिवशीच्या उत्साहानेच दर दिवशी शिकवतो! आणि हो, जसे निराशाजनक कोणीतरी बोलते तसेच कधी कधी कोणी कोणी हरभऱ्याच्या झाडावरही नेऊन ठेवते! कोणी माझे खूप कौतुक केले त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच माझ्या नेहमीच्या भूमिकेत मी माझे अध्यापन करण्याचा प्रयत्न करत असतो...... भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की हे ही माझ्या सेवेच्या शेवटपर्यंत टिकू दे! 


तीस वर्षांच्या सेवेमध्ये बरेचसे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या उदरनिर्वाहाच्या सेवेत गुंतले असतील आणि अपेक्षा आहे की हे सर्वजण ती सेवा प्रामाणिकपणे करत असतील..... इमानी इतबारे जीवन व्यतीत करत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षकाला अभिमान वाटतच असतो.; परंतु नकळत या कार्यात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील आणि एखादा विद्यार्थी दुखावला गेला असेल तर मी मनःपूर्वक क्षमा मागतो! 


तीस वर्षांच्या या सेवा कालामध्ये अनेक मार्गदर्शक लाभले, ज्या ज्या गावात सेवा दिली त्या गावातील गावकऱ्यांचे सहकार्य लाभले, वेगवेगळ्या शाळांमधील माझ्या सहकारी बांधवांमुळे माझे शाळेतले दिवस अतिशय आनंदाचे गेले, वेगवेगळ्या उपक्रमात त्यांच्यासोबत काम करताना उत्तम अनुभव मिळाले आणि मी समृद्ध होत गेलो..... म्हणून त्या सर्वांचेही मला आभार मानावेसे वाटतात..... Thank You Very Much!  

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

अर्णव बुक्कापाटीलचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे

 

सिंगापूर येथे राहत असलेल्या परळी वैजनाथ तालुक्यातील गाढे पिंपळगावच्या ज्योती थोंटेच्या मुलाने सिंगापूरच्या सर्वोत्कृष्ट शाळेत आपल्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळवला असून 160 विद्यार्थी क्षमता असलेल्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून 3000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती.
परळी वैजनाथ जिल्हा बीड तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थीनी असलेली ज्योती वैजनाथअप्पा थोंटे ही सध्या इंजिनियर म्हणून सिंगापूर येथे सेवेस आहे. तिचा मुलगा अर्णव बुक्कापाटील हा सध्या शालेय शिक्षण घेत आहे. सिंगापूर येथे गणित व विज्ञान विषयांसाठी खास सुप्रसिद्ध असलेल्या NUS High School of Math and Science, Singapore  शाळेत आपला प्रवेश व्हावा हे अर्णवचे स्वप्न होते. त्याने यासाठी खास अभ्यास केला. यासाठी झालेल्या दुसऱ्या राऊंड मध्येच त्याचा प्रवेश निश्चित करण्यात आला. वास्तविक पाहता या शाळेत तिसऱ्या राऊंड मध्ये मुलाखत घेण्यात येऊन मगच प्रवेश निश्चित करण्यात येत असतो. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेण्यासाठी अर्णव जणू सज्ज झाला आहे. आपले मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी लागते याचे आदर्श उदाहरण अर्णवने  मुलांसमोर ठेवले आहे.
आपल्या आवडत्या विषयाची फक्त अभ्यासाला दिलेली पुस्तके वाचून अर्णव थांबत नाही तर त्या संदर्भातील वाचनालयात असणारी पुस्तके वाचन करणे ही त्याची खास आवडीची गोष्ट आहे. त्याची ही सवय अगदी लहान असल्यापासून आहे.
खगोल विषयातील त्याचे ज्ञान अचंबित करणारे आहे. कोरोना काळात PDSE (Platform for Development of Spoken English) या कार्यक्रमात महाराष्ट्रातील मुलांना इंग्रजीतून संवाद करण्यासाठी त्याची मुलाखत घेण्यात आली होती त्यावेळी त्याच्या उत्तरांनी मुले प्रभावित झाली होती. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अर्णव अतिशय अप्रतिम  पद्धतीने देत होता.
अर्णव व त्याच्या आई वडिलांचे कौतुक करताना आम्हाला नक्कीच आनंद होत आहे.