बुधवार, १७ जुलै, २०२४
जणू पंढरी नगरी झाली स्कॉलर केजी स्कूल
पालकांनी आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशभूषेमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने नटून शाळेत आणले होते.
शनिवार, १३ जुलै, २०२४
1200 विद्यार्थी असणारी जिल्हा परिषदेची मानवत शहरातील शाळा!
1200 विद्यार्थी आणि 30 शिक्षक संख्या असणारी जिल्हा परिषदेची मानवत शहरातील शाळा!
जिथे जाऊ तिथे आपोआप आकर्षक शाळेकडे मन खेचले जाते; त्यातल्या त्यात जिल्हा परिषदेची असेल तर अधिकच!
लग्न सोहळ्याच्या निमित्ताने मानवत जिल्हा परभणी येथे जाण्याचा योग आला आणि शहराच्या अगदी मध्यभागी असणाऱ्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने मन मोहित केले.
मेहनत करणारे शिक्षक आणि त्यांना तितकाच चांगला सपोर्ट करणारी शालेय शिक्षण समिती तसेच त्या भागातील सुज्ञ राजकारणी मंडळी असली की जो सुंदर परिणाम होतो तो दिसणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत जिल्हा परभणी!
एकीकडे मराठी शाळा आणि त्यातल्या त्यात जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळत नाहीत म्हणून अडचणीत आहेत तिथे "बैठक मर्यादा संपल्यामुळे इयत्ता 1 ली ते 8 वी चे प्रवेश बंद आहेत" अशी सूचना या शाळेला लावावी लागते!
शहरात असूनही भरपूर जागा, नियोजन करून खेळाची व्यवस्था असणारे मैदान, आकर्षक वर्ग रचना, अद्ययावत तंत्रज्ञान असणारे साहित्य, संगणक, सोलार पॅनल असणारी विद्युत पुरवठा, वृक्षांची लागवड आणि काळजी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धा परीक्षांची विशेष तयारी करून घेणारे वर्ग अशी या शाळेची वैशिष्ट्ये आहेत.
शाळा हाफ डे असल्यानंतरही शाळेच्या कार्यालयात पालकांशी संवाद साधत असलेले मुख्याध्यापक श्री बनसोडे सर, सेवानिवृत्त होऊनही शाळेला सद्यस्थितीत आणण्यास मोठा वाटा उचलणारे केंद्रप्रमुख श्री लोहट सर, नवोदय आणि स्पर्धा परीक्षांची विशेष तयारी करून घेणारे सर अशी ज्यांची ओळख आहे आणि शाळा परिसरात 24 तास ज्यांचे मन भिरभिरते असे आदर्श, क्रियाशील शिक्षक श्री नामदेव खिळदकर सर, माझे आत्तेभाऊ असलेले याच शाळेतील आदर्श शिक्षक श्री सोमनाथ मोकरे यांच्याशी शाळेतील उपक्रमाविषयी मनमोकळी चर्चा झाली. हा संवाद जणू 'या हृदयीचे त्या हृदयी' होता. सर्वांनी शाळेच्या प्रांगणात मला पुष्पगुच्छ देऊन माझे स्वागत केले.
शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षक वृंदांचे कौतुक करताना बा. भ. बोरकर यांच्या कवितेची आठवण झाली 'देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुगंधाचे सोहळे' मेहनत घेत असणाऱ्या सर्व हातांचे - डोक्यांचे मनापासून अभिनंदन! तेवढ्याच तळमळीने व तनमनधनाने काम करणारे सर्व शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समिती यांचेही मनःपूर्वक अभिनंदन! तुमची शाळा पाहून खूप आनंद झाला; अभिमान वाटला!
अशा शाळांची गुणवत्ता कायम राहण्यासाठी तिथे असलेल्या स्टाफला त्यांची इच्छा असेल तर सेवानिवृत्त होईपर्यंत तेथेच ठेवले तरच त्या शाळा कायम त्याच स्थितीत राहतील असे माझे वैयक्तिक मत आहे. संबंधित भागातील अधिकाऱ्यांनी आणि सुज्ञ राजकीय नेत्यांनी यासाठी विशेष प्रयत्न करायलाच हवेत.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)