शुक्रवार, ५ जुलै, २०२४

अबब! एक लाख किलोमीटर सायकल चालवली! असे असावे निश्र्चयी!

 

एक लाख किलोमीटर सायकल चालवण्याचा विक्रम!


स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, आरोग्य चांगले राहण्यासाठी सायकल चालवणे आवश्यक आहे हे सर्वच जण जाणतात; परंतु हा संकल्प सातत्यपूर्वक चालू ठेवणे प्रत्येकाला शक्य होत नाही. परभणी येथील रहिवाशी श्री शंकर नागनाथ फुटके यांनी दररोज सायकल चालवण्याचा ठरवत आणि ते नित्यनियमाने पूर्ण करत एक लाख किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे. परभणीत कृषी विद्यापीठ कुलगुरू तसेच विविध मान्यवरांनी त्यांचा सन्मान करून कौतुक केले आहे. 


श्री शंकर फुटके यांच्यासह परभणी येथील त्यांचे मित्र दरवर्षी पंढरपूर वारी सायकलवर स्वार होऊन करत असतात. यावर्षीही पंढरपूरला सायकलवर जात असताना शुक्रवारी ते परळी वैजनाथ येथे आले असता एक लाख किलोमीटर अंतर पार केल्याबद्दल त्यांचा सन्मान परळी येथील मित्रमंडळी, नातेवाईक यांनी केला. त्यांच्या सोबत असलेल्या सर्व सायकल स्वारांचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला. 


सायकल चालवण्याचा वैयक्तिक फायदा आहेच; शिवाय सायकल चालवण्याचा प्रचार व प्रसार केला की अनेक लोक तुमचे मित्र बनतात हा सामाजिक फायदा आणि सायकल चालवण्यासाठी पेट्रोल लागत नाही म्हणजे राष्ट्रहित; तसेच धूर नाही म्हणून पर्यावरणपूरक वाहन! म्हणून सर्वांनी सायकल चालवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन याप्रसंगी श्री शंकर फुटके यांनी केले. 


या वारीतील प्रत्येक सायकलस्वार एक संदेश देत असून तशा आशयाचा फलक त्यांनी आपल्या सायकलवरही लावलेला आहे. समाजाचं प्रबोधनही या निमित्ताने ते करत आहेत. व्यसनापासून दूर राहणे, पर्यावरणाची काळजी घेणे, वाहतुकीचे नियम पालन करणे अशा संदेशांचा यात समावेश आहे. 


यावेळी जिजामाता यंगर्स ग्रुपचे ऍड रमेश साखरे, अजित गौरशेटे, रमेश चव्हाण, श्री शनैश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शिव जठार, श्री शिवहर उदगीरकर, श्री शांतलिंग फुटके, प्रा प्रवीण फुटके, चंद्रशेखर फुटके, सौ सुजाता फुटके, सौ प्राची फुटके यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.


 या सायकल वारीमध्ये प्रभावती रायडर्सचे अध्यक्ष माणिक गरुड, उपाध्यक्ष दिपक तळेकर, सचिव श्रीनिवास संगेवार, कोषाध्यक्ष राजेश्वर वासलवार, सहसचिव शंकर फुटके, सल्लागार सदस्य नीरज पारख, कल्याण देशमुख, गिरीश जोशी, संदिप पवार, प्रकाश बुजुर्गे, बालाजी तावरे,नितीन शेवलकर,ओमकार भेडसुरकर, सिद्धांत ओझा, महादेव मांडगे, दिनेश शर्मा आदी सायकलीश्ट सहभागी झाले आहेत. 

















शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

असा घेतला आनंद विद्यार्थ्यांनी शाळा पूर्वतयारी मेळाव्यात!

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील शाळेत इयत्ता पहिली वर्गासाठी प्रवेश पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचा पहिला शाळा पूर्वतयारी मेळावा आज संपन्न झाला. 


प्रवेश पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दोन दिवस अगोदरच अंगणवाडीताईंच्या मदतीने निरोप देण्यात आलेला होता. 
सकाळी 9 ते 12 या वेळेत वेगवेगळ्या सात टेबलवर विद्यार्थ्यांना घेऊन पालकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घ्यावयाच्या तयारीची माहिती घेतली. 
नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भाषा विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, गणन पूर्व विकास व समुपदेशन या अंतर्गत विद्यार्थ्यांचे वेगवेगळे खेळ घेऊन त्यांच्या क्षमता तपासण्यात आल्या.


या प्रत्येक टेबलची रचना आकर्षक करण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासण्यासाठी खेळही मुलांना आवडतील अशा पद्धतीने घेण्यात आले. 
सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला होता. आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कागदी टोपी घालून आणि फुगे देऊन स्वागत करण्यात आले. 


या मेळाव्याची तयारी शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री चंद्रशेखर फुटके,  सरोजकुमार तरुडे,  राजेश्वर स्वामी, दत्तात्रय मुंडे, श्रीमती प्रिया काळे, श्रीमती शुभांगी चट यांनी केली होती. अंगणवाडीताई राही मॅडम आणि कविता मॅडम यांचे मोठे सहकार्य लाभले.


उपस्थित पालकांनी या मेळाव्यातील उपक्रमाचे कौतुक केले.



































गुरुवार, २८ मार्च, २०२४

त्याच्या ज्ञानाचा होतोय सुंदर उपयोग!




 

आपल्या ज्ञानाचा उपयोग आपले दैनंदिन जीवन सुखकर, सुलभ करण्यासाठी केला तर ते ज्ञान अधिक फलदायी ठरेल.... आपल्या, कुटुंबातील सदस्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण मिळवलेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी उपयोग करायलाच हवा, आपल्या कुटुंबातील सर्वांचाच फायदा आपल्या ज्ञानामुळे होत असेल तर त्या ज्ञानाला आणि विद्यार्थ्यांना अधिक किंमत मिळेल...


परळी पासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धर्मापुरी रोडवर, मिरवट पाटीवर असणाऱ्या श्री केदारेश्वर रसवंती गृहात मी दररोज ऊसाचा रस घेत असतो. येथील ऊस अगदीच स्वच्छ दिसतो; तो स्वच्छ करण्याची मेहनत किती करत असतील याचा विचार मी करायचो.


आज थोडे अजब दृश्य डोळ्यासमोर दिसले. एका लोखंडी पाईपाच्या आतून या ऊसाला मागेपुढे केले जात होते आणि तो ऊस अगदी स्वच्छ होत होता! कुतूहल म्हणून मी जवळ जाऊन पाहिले. हे यंत्र काही कुठल्या कंपनीत तयार झालेले दिसत नव्हते, वीस पंचवीसच्या जवळपास वय असणाऱ्या त्या तरुणाला मग मी काही प्रश्न केले. त्याने आयटीआयचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. ऊस स्वच्छ करण्यासाठी करावी लागण्याची मेहनत सोपी करण्यासाठी त्याने लोखंडी पाईपाचा उपयोग करून व्हिडिओ मध्ये दाखवलेले हे साधे यंत्र स्वतः तयार केले आहे. 

धनंजय त्रिंबक भदाडे असे या कल्पक बुद्धीमत्ता असणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
कमी मेहनतीत अगदी स्वच्छ असा ऊस रसासाठी तयार होतो. त्याच्याशी पाच मिनिट गप्पा करून मी त्याचे कौतुक केले. तुझ्या शिक्षणाचा उपयोग तुझ्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांसाठी महत्वाचा ठरत आहे, हे खूप छान आहे, असे दोन कौतुकाचे शब्द मी त्याच्याशी बोलले.
कुटुंबातली पुरुष मंडळी या रसवंतीत मेहनत घेताना दिसतात. 


आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मेहनतीची काळजी घेणे म्हणजे एक प्रकारे कुटुंबावरची माया, प्रेम दाखवणे असाही त्याचा अर्थ होतो. त्याने केलेले काम छोटे आहे पण कुटुंबाशी त्याची नाते अधिक महत्त्वाचे आहे.

*चंद्रशेखर फुटके, परळी वैजनाथ जिल्हा बीड*
93250 63512

बुधवार, २७ मार्च, २०२४

Make Questions! प्रश्न बनवा!

 

मॅडम किंवा सरांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन कंटाळा आला? मग तुम्ही बनवा प्रश्न! सोपे आहे का? प्रश्नच नाही!


शिक्षक तुम्हाला नेहमी प्रश्न विचारतात आणि तुम्ही उत्तरे देता; आज मी तुम्हाला उत्तर देणार आहे आणि तुम्ही अधोरेखित भाग उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे. आहे ना मजेशीर? चला तर शिकू या नवे काही! 


Every time teacher asks you question and you give answer. This time I am giving you answers, and you have to make the question! Isn't it interesting? Let's start! Underlined part should come as answer to your question.   

'Wh' words are -What, where, who, which, how, how many, how much. 


रविवार, २४ मार्च, २०२४

MTS परीक्षेत जिप शाळा कासारवाडी विद्यार्थ्यांचे यश


महाराष्ट्र टॅलेंट सर्च अर्थात MTS परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थ्यांचे यश

स्कॉलरशिप परीक्षेची तयारी म्हणून घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील इयत्ता सातवीच्या सहा विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे.
नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये इयत्ता सातवी वर्गात शिकत असलेल्या सहा विद्यार्थिनींनी आपली नाव नोंदणी केली होती. वर्षभरात या विद्यार्थिनींनी केलेल्या मेहनतीमुळे सर्वच्या सर्व मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. 

शनिवारी शाळेच्या वतीने या विद्यार्थिनींना आकर्षक प्रमाणपत्र, मेडल आणि भेटवस्तू देऊन शाळेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. 
"तुम्ही केलेल्या मेहनतीचे निश्चितच कौतुक आहे आणि इतर सर्व वर्गातल्या विद्यार्थिनींसाठी तुम्ही मार्ग दाखवला आहे", असे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांनी त्यांना सन्मानित करताना म्हटले.
 
मार्गदर्शिका श्रीमती प्रिया काळे मॅडम यांनीही विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. कुमारी वैष्णवी विठ्ठल गुट्टे, कोमल कृष्णा गुट्टे, चैतन्या सुनील गुट्टे, यशश्री तुळशीराम गुट्टे, अक्षरा संदीप गुट्टे आणि अक्षरा सचिन गुट्टे या विद्यार्थिनींचा यात समावेश आहे.



शाळेतील शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके, श्री सरोजकुमार तरुडे, श्री राजेश्वर स्वामी, श्री दत्तात्रय मुंडे, श्रीमती शुभांगी चट तसेच गावचे सरपंच श्री बंडू गुट्टे, शालेय समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे यांच्यासह सर्व पदाधिकारी तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, मिरवट केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती मिश्रा मॅडम, केंद्रीय मुख्याध्यापक श्री घुगे साहेब, परळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री कनाके साहेब यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.