पेपर क्राफ्ट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या पेपर क्राफ्ट स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. कला शिक्षक नसताना सर्व विषयांचे अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण या विषयातही विद्यार्थ्यांना गोडी लावायची असते. थोडेसे नियोजन केले तर यात विद्यार्थी रस घेतात म्हणूनच कासारवाडी येथे पेपर क्राफ्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्पर्धांचे अर्धवार्षिक नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांचा तसेच व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन मिळेल अशा स्पर्धांचा विचार करून हे नियोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख म्हणून श्री फुटके तसेच सर्व वर्गांचे वर्गशिक्षक श्री तरुडे, श्री स्वामी, श्री मुंडे तसेच श्रीमती काळे, श्रीमती चट यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे. शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून चि कन्हैया ज्ञानेश्वर गुट्टे तर उपमुख्यमंत्री म्हणून कु राधा अनंत गुट्टे कामकाज पाहत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि कन्हैया ज्ञानेश्वर गुट्टे याने केले. नियमित अभ्यास आणि विविध स्पर्धा व त्यांची आकर्षक प्रमाणपत्रे व बक्षिसे मिळत असल्याबद्दल विद्यार्थी आनंद व्यक्त करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा