सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

पालकांनो, मला शुभेच्छा नको! तुमचा माझ्यावरचा विश्वास हवा आहे!



विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालकांमध्ये समंजस नातं असणं अत्यंत आवश्यक आहे. पालक आणि शिक्षकांनी एकमेकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक त्या योजना अंमलात आणणे आवश्यक आहे. यासाठीच पालकांनी शिक्षकांचे कार्य लक्षात घेऊन आपल्या मुलांच्या सुयोग्य शैक्षणिक वाढीसाठी हिच व्यक्ती काही करू शकते असा विश्वास ठेवायला हवा आणि शिक्षकांनी हा विश्वास सार्थ ठरवायला हवा. 


शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे नातं थोडसं धूसर आणि अविश्वसनीय होत आहे याची खंत आहे म्हणूनच मनातलं थोडसं या लेखातून व्यक्त होत आहे. सरकारी शाळा आणि मराठी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांच्या कार्याबद्दल सरसकटपणे काही विधाने केली जात आहेत आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये मराठी शाळांबद्दल, सरकारी शाळांबद्दल एक अविश्वास, असंतोष निर्माण होत आहे. 


षडयंत्र वगैरे असे काही मोठे मला कळत नाहीत; पण अगदी प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या शिक्षकांकडेही पालक आता संशयित नजरेने पाहत आहेत. त्यातला आदर लुप्त होत आहे. शिक्षकाच्या प्रत्येक कामाला आता तराजूमध्ये मोजलं जात आहे. घड्याळाकडे न पाहता आपल्या कर्तव्याच्या वेळे व्यतिरिक्त वेळ देणाऱ्या, आपल्या कर्तव्यापलीकडेही काम करणाऱ्या शिक्षकांचाही त्यात काही स्वार्थ आहे का? अशा नजरेने त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. याची खंत अधिक वाटत आहे. 




सगळे शिक्षकच व्यवस्थित काम करत नाहीत हेच आपल्या डोक्यात काही लोक घालण्याचे काम करत असतील तर पालकांनो पुणे जिल्ह्यात नुकतीच 19 वर्ष आदर्श सेवा केलेल्या अरविंद देवकर सरांसारखी आत्महत्या प्रत्येक शिक्षकांनीच करायची का? इतकी पराकोटीची नकारात्मकता कशामुळे पेरली जात आहे? 


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला अनेक घटक कारणीभूत असतात. विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती, त्याची मानसिक अवस्था, शाळेत असणाऱ्या भौतिक सुविधा, शाळेत असणाऱ्या शैक्षणिक सुविधा, शाळेत आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य, पालकांची मानसिकता, पालकांचे घरातील शैक्षणिक वातावरण, पालकांची शैक्षणिक स्थिती, पालक देत असलेला वेळ, विद्यार्थ्यांना मिळत असलेली संगत, विद्यार्थ्यांची स्वतःची कष्ट करण्याची तयारी, प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळी बौद्धिक कुवत, शारीरिक क्षमता.... अशा कितीतरी गोष्टी ह्या प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापनात महत्त्वाच्या असतात.... या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? 


ईश्वर करो की पालकांच्या मनातील हे मळभ दूर होवो, पालकांच्या मनामध्ये असा असंतोष निर्माण करणाऱ्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो आणि पूर्वी इतकेच शिक्षक पालकांचे प्रेमळ नाते तयार होवो, ज्यातून निरागस बालकांचा शैक्षणिक विकास होईल हीच शिक्षक दिनाच्या दिवशी प्रार्थना.



५ टिप्पण्या:

  1. खुप छान सरजी, ... मनातील खंत योग्य शब्दात व्यक्त केली आहे आपण

    उत्तर द्याहटवा
  2. श्रीमान चंद्रशेखर फुटके सरजी तुम्ही जी आपल्या मनातील भावना (खंत) व्यक्त करुन जे काही लिहिले आहे ते सर्वंच सर्वच शिक्षक बांधवांच्या मनातील भावना व्यक्त केली आहे.त्याबद्दल धन्यवाद................................. कारण या आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाकडे हे स्किल नसते.तुमचेमत एकदमच बरोबरच आहे व हे कोणालाही मान्यच करावे लागेल.पुनश्च धन्यवाद धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. होय... सर्व शिक्षक बांधवांच्या याच भावना आहेत म्हणूनच पालकांना नम्र आवाहन केले आहे

      हटवा