काय काय शिकले मुले? पेपर क्राफ्ट: किल्ला बनवणे स्पर्धा
इतिहासातील संकल्पना स्पष्टरित्या समजण्यासाठी, किल्ल्याची संरचना कळण्यासाठी आणि बुद्धी व हातांची सुंदरता प्रत्यक्षात साकारण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी या ठिकाणी पेपर क्राफ्ट अंतर्गत किल्ले बनवण्याची स्पर्धा संपन्न झाली होती; त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले.
इयत्ता पहिली ते आठवी या वर्गातील कोणतेही पाच विद्यार्थी गटामध्ये या स्पर्धेत सहभागी होऊ शकत होते. समविचारी मित्र-मैत्रिणी एकत्र आले आणि सुंदर किल्ल्यांची निर्मिती झाली होती.
हे किल्ले बनवल्यानंतर शिक्षकांसमोर त्याचे सादरीकरण करावयाचे होते. हे असेच का बनवले? हे अमुकरीत्या बनवण्याचा उद्देश काय? शत्रू आले तर सैनिक कुठून येणार? हे नेमके कशाचे तयार केलेस? अशा प्रश्नांची छान उत्तरे गटामधून मिळत होती आणि मुले किल्ल्यांचे महत्त्वही समजून घेत होती. इतिहास शिकवण्याचा हा सुंदर मार्ग नव्हे का?
"माझ्या जवळचा काळा रंग संपला तेव्हा मी कोळसा कुटून तो रंग तयार केला; आणि जेव्हा पांढरा रंग संपला तेव्हा घरात असलेल्या चुन्याचा वापर केला" जेव्हा पाचवी मधील पूनम हे सांगत होती तेव्हा लक्षात आले की मुलांना जेव्हा आयुष्यात अडचणी येतील तेव्हा नक्कीच त्यावर मार्ग शोधण्याचे संस्कार अशा छोट्या स्पर्धा मधून होतात.
सध्या हे छोटे कप सुद्धा त्यांना आनंद देत आहेत भविष्यात त्यांना वेगवेगळ्या स्पर्धेत यश मिळो आणि कितीतरी सुंदर कप मिळत राहोत अशा शुभेच्छा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा