बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३
ताट सजावट आणि राखी बनवणे या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न!
ताट सजावट आणि राखी बनवणे या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न.
मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाची मराठवाड्यात जय्यत तयारी.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाची मराठवाड्यात जय्यत तयारी. विविध कार्यक्रमांचे आयोजन. १४ ते १७ सप्टेंबर होणार कार्यक्रम.
14 सप्टेंबर रोजी बीड मुख्यालयाच्या ठिकाणी रॅलीचे आयोजन.
14 सप्टेंबर रोजी बीड वगळता सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 7.15 वाजता दोनशे विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन.
विद्यार्थ्यांचा वैयक्तिक व सामूहिक गीत कार्यक्रम.
16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता 75 दीप प्रज्वलित करून मुक्तिसंग्रामातील महात्म्यांच्या प्रतिमांच्या रांगोळी काढण्याचे निर्देश.
17 सप्टेंबर रोजी ध्वजारोहण, प्रभात फेरी, विद्यार्थ्यांचे भाषण.
बीड शिक्षण अधिकारी यांनी काढलेले पत्रक.
पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे बोट ठेवा
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव : विविध उपक्रम, स्पर्धांचे तारीखनिहाय नियोजन असणारे पत्रक
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव : विविध स्पर्धांचे पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे बोट ठेवा
मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३
विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन : बीड जिल्ह्याचे माजी खासदार कॉ गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त
येथे जागर होतो विवेकाचा...!
कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष व झुंजार स्वातंत्र्य सेनानी, बीड जिल्ह्याचे दिवंगत माजी खासदार व महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक मानवतावादाचे पुरस्कर्ते, मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील लढवय्ये स्वातंत्र्य सैनिक, राजकारण हे समाजातील तळागाळातील लोकांच्या आशा आकांक्षांना पूर्णत्वाकडे घेऊन जाणारे एक माध्यम आहे हे तत्व अखेरच्या श्वासापर्यंत जपणारे एक आदर्श राजकारणी आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे यासाठी अख्खं आयुष्य समर्पित करणाऱ्या कॉम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी वैचारिक मंथन घडवून आणण्यासाठी आपण सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
टीप:QR कोडच्या माध्यमातुन देखील ऑनलाईन नोंदणी करू शकता.
येथे बोट ठेवा व स्पर्धेसाठी नोंदणी करा
अधिक माहितीसाठी संपर्क 9421443172 9421479877
आयोजक : आसुबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मांडेखेल ता.परळी जि.बीड
सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३
पालकांनो, मला शुभेच्छा नको! तुमचा माझ्यावरचा विश्वास हवा आहे!
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालकांमध्ये समंजस नातं असणं अत्यंत आवश्यक आहे. पालक आणि शिक्षकांनी एकमेकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक त्या योजना अंमलात आणणे आवश्यक आहे. यासाठीच पालकांनी शिक्षकांचे कार्य लक्षात घेऊन आपल्या मुलांच्या सुयोग्य शैक्षणिक वाढीसाठी हिच व्यक्ती काही करू शकते असा विश्वास ठेवायला हवा आणि शिक्षकांनी हा विश्वास सार्थ ठरवायला हवा.
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे नातं थोडसं धूसर आणि अविश्वसनीय होत आहे याची खंत आहे म्हणूनच मनातलं थोडसं या लेखातून व्यक्त होत आहे. सरकारी शाळा आणि मराठी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांच्या कार्याबद्दल सरसकटपणे काही विधाने केली जात आहेत आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये मराठी शाळांबद्दल, सरकारी शाळांबद्दल एक अविश्वास, असंतोष निर्माण होत आहे.
षडयंत्र वगैरे असे काही मोठे मला कळत नाहीत; पण अगदी प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या शिक्षकांकडेही पालक आता संशयित नजरेने पाहत आहेत. त्यातला आदर लुप्त होत आहे. शिक्षकाच्या प्रत्येक कामाला आता तराजूमध्ये मोजलं जात आहे. घड्याळाकडे न पाहता आपल्या कर्तव्याच्या वेळे व्यतिरिक्त वेळ देणाऱ्या, आपल्या कर्तव्यापलीकडेही काम करणाऱ्या शिक्षकांचाही त्यात काही स्वार्थ आहे का? अशा नजरेने त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. याची खंत अधिक वाटत आहे.
सगळे शिक्षकच व्यवस्थित काम करत नाहीत हेच आपल्या डोक्यात काही लोक घालण्याचे काम करत असतील तर पालकांनो पुणे जिल्ह्यात नुकतीच 19 वर्ष आदर्श सेवा केलेल्या अरविंद देवकर सरांसारखी आत्महत्या प्रत्येक शिक्षकांनीच करायची का? इतकी पराकोटीची नकारात्मकता कशामुळे पेरली जात आहे?
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला अनेक घटक कारणीभूत असतात. विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती, त्याची मानसिक अवस्था, शाळेत असणाऱ्या भौतिक सुविधा, शाळेत असणाऱ्या शैक्षणिक सुविधा, शाळेत आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य, पालकांची मानसिकता, पालकांचे घरातील शैक्षणिक वातावरण, पालकांची शैक्षणिक स्थिती, पालक देत असलेला वेळ, विद्यार्थ्यांना मिळत असलेली संगत, विद्यार्थ्यांची स्वतःची कष्ट करण्याची तयारी, प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळी बौद्धिक कुवत, शारीरिक क्षमता.... अशा कितीतरी गोष्टी ह्या प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापनात महत्त्वाच्या असतात.... या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?
ईश्वर करो की पालकांच्या मनातील हे मळभ दूर होवो, पालकांच्या मनामध्ये असा असंतोष निर्माण करणाऱ्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो आणि पूर्वी इतकेच शिक्षक पालकांचे प्रेमळ नाते तयार होवो, ज्यातून निरागस बालकांचा शैक्षणिक विकास होईल हीच शिक्षक दिनाच्या दिवशी प्रार्थना.
शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३
श्री नावकेकर सर : या हृदयीचे त्या हृदयी याप्रमाणे मग्न होऊन अध्यापन करणारे प्रेमळ शिक्षक
शाळेमध्ये असताना मुलांमध्ये रममाण होणारे आणि शाळा नसताना निसर्गाच्या सहवासात हरवून जाणारे अशी ज्यांची ओळख सांगता येईल ते श्री नावकेकर संभाजी भाऊराव हे 31 ऑगस्ट रोजी सेवेतून निवृत्त झाले. जिल्हा परिषद शाळांमध्ये सहशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द विद्यार्थीप्रिय, सहकारीप्रिय आणि पालकप्रिय अशी होती.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे त्यांच्यासोबत 2005 ते 2012 या कालावधीमध्ये सोबत काम करण्याचा आनंद घेता आला.
शाळेची गुणवत्ता वाढावी, भौतिक, शैक्षणिक विकास व्हावा यासाठी त्यांची नेहमी धडपड असायची. काही कालावधीसाठी प्रभारी मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले.
प्रभारी मुख्याध्यापक असताना शाळेच्या मैदानाचा काही भाग त्यांनी उत्तम दर्जाची हराळी खरेदी करून गार्डन म्हणून विकसित केला होता. शाळेचे हे मागील मैदान प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर अतिशय घाणरेडे झालेले असल्याचे जून मध्ये शाळा सुरु होताच लक्षात यायचे. श्री नावकेकर सर आणि टीमने अक्षरश: नांगर फिरवून हे मैदान बागेसाठी योग्य केले होते. इथे झाडांना पाणी मिळावे म्हणून गावासाठी बंद असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीतून स्वखर्चाने मोटर टाकून शाळेपर्यंत पाईपलाईनची सुविधाही त्यांनी केली होती. हिरवा गालिचा पसरलेला हा मैदानाचा भाग आणि त्यात पाण्याचे छोटासे कारंजे शाळेचा भाग सुशोभित करत होते.
मुलांना आनंदाने शिकता यावं यासाठी शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर व्हावा म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न विशेष दखल घेण्याजोगे आहेत. झाडे लावण्यापूर्वी शाळेला साधे कंपाउंड होते म्हणून त्यांनी तारेचे कंपाउंड करून घेतले. गावचे त्याकाळचे उपसरपंच श्री बालाजी प्रभू मुंडे यांना भेटल्यानंतर त्यांनी मजबूत असे कंपाउंडही तयार करून दिले होते.
कंपाउंडची सुरक्षितता आणि खळाळते पाणी यामुळे शाळेचे मैदान वृक्षांनी नटले होते. लहान मध्यंतरात किंवा मोठ्या मध्यांतरात सरांना वेळ मिळाला की ते फक्त झाडांच्या भोवतीच असायचे.
वर्गातून बाहेर येताना खडूमुळे पांढरे झालेले हात तर वर्गात जाताना झाडांभोवती कुंपण करताना चिखलाने भरलेले हात ते स्वच्छ करताना बहुतेकदा दिसत.
त्यांनी जेव्हा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यभार हाती घेतला तेव्हा शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. सरांनी विनंती केल्यानंतर बांधकाम विभागाने एक मोठा पाईप क्रेनच्या साह्याने शाळेत दिला आणि सार्वजनिक बोअरचे पाणी पाईपद्वारे यात सोडण्यात येऊन पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. पिण्याच्या पाण्याची ही सोय करण्यासाठी सरांनी व्यक्तिशः खूप मेहनत घेतली.
जिथे जून मध्ये शाळा उघडल्यानंतर कुलूप तोडलेले असायचे अथवा कधीकधी वर्गात घाण असलेली दिसून यायची त्याच गावचे ग्रामस्थ आता शाळेशी प्रेमाने जोडले गेले होते आणि त्यात श्री नावकेकर सरांची भूमिका मोलाची होती. नावकेकर सर आणि टीम मेहनत घेत असल्याचे पाहून गावकरीही पुढे आले. मदत मिळत गेली, ऑफिसची फरशी बदलण्यात आली, प्रत्येक वर्गामध्ये फॅन बसवण्यात आले, वर्गांची रंगरंगोटी करण्यात आली. आवश्यक तिथे दुरुस्ती केली गेली. शाळेची लाईट फिटिंग होताना सरांचा रात्रीचाही वेळ शाळेत जात होता.
विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास होण्यासाठी विविध स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलने, त्याचबरोबर शैक्षणिक सहलींचे आयोजनही नावकेकर सरांच्या काळात करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांची तळमळ ही अतिशय मोलाची होती म्हणूनच विद्यार्थ्यांशी त्यांचे नाते अतिशय चांगल्या प्रकारचे होते. आजही त्यांचे माजी विद्यार्थी अतिशय आदरणीय त्यांच्याशी बोलतात, त्यांची चौकशी करतात. वर्गात असताना जणू या हृदयीचे त्या हृदयी याप्रमाणे मग्न होऊन अध्यापन करणारे श्री नावकेकर सर आज पुन्हा शाळेत दिसणार नसले तरी निसर्ग शाळेत ते तितकेच रममाण होतील यात शंका नाही.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरूनगर टोकवाडी येथे त्यांचा सेवेचा शेवटचा भाग गेला. या वस्ती शाळेत विद्यार्थी संख्या वाढवण्यापासून ते गुणवत्ता वाढीसाठीचे त्यांचे प्रयत्न असेच अविरत सुरु होते. शाळा छोटी असूनही स्नेह संमेलन, विविध स्पर्धा, आंतर शालेय स्पर्धेत भाग घेतला जायचा.
त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे व निरोगी जावो अशी मनःपूर्वक शुभेच्छा त्यांच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या व सहकाऱ्यांच्या वतीने देतो.
- चंद्रशेखर फुटके, परळी
शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३
चिमुकले हात सुंदर आकारांना सुबकतेने साकारत होते...
छोटे, चिमुकले हात आज फोटो फ्रेम, पेन स्टॅण्ड, झुंबर, पर्स पासून ते सजावटीच्या सुंदर आकारांना सुबकतेने साकारत होते...
वह्या, पेन, पुस्तकांऐवजी आज विद्यार्थ्यांच्या हाती कात्री, रंगीत कागद आणि विविध साहित्य दिसत होते.....
शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने दर पंधरा दिवसाला होणाऱ्या स्पर्धेत आज पेपर क्राफ्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.
कला शिक्षक हे पदच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नसते. येथील नियमित शिक्षकच क्रीडा शिक्षक, कला शिक्षक, संगीत शिक्षक आणि सर्व विषयांचे अध्यापन करत शालेय पोषण आहारापासून ते कारकूनसह शाळेतल्या सर्व जबाबदाऱ्यांचे काम करत असतात; पण कारणे न सांगता विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी विविध उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेतले जातात.
विद्यार्थ्यांच्या मदतीने हे उपक्रम होत असल्याने त्यातला उत्साह कायम आहे. पेपर क्राफ्टच्या आजच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी निसर्गातील अनेक सुंदर प्रसंग, त्याचबरोबर नित्य उपयोगी वस्तू कागदाच्या मदतीने सुंदररीतीने तयार केल्या. विद्यार्थ्यांची कल्पक बुद्धी या निमित्ताने दिसून आली.
दर पंधरा दिवसाला होणाऱ्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्गातून तीन बक्षीस दिले जातात; परंतु आजच्या स्पर्धेमध्ये बक्षिसे देताना परीक्षक शिक्षकांनाही अधिक संख्येमध्ये बक्षीस हे द्यावी लागली हेच या स्पर्धेचे वैशिष्टय म्हणावे लागेल.
शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री चि कन्हैया गुट्टे, उपमुख्यमंत्री कु राधा गुट्टे यासह कलामंत्री कु समृद्धी गुट्टे यांनी मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री दत्ताराव मुंडे, सरोजकुमार तरुडे, राजेश्वर स्वामी, चंद्रशेखर फुटके, श्रीमती प्रिया काळे, श्रीमती शुभांगी चट यांनी परिश्रम घेतले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)