बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

हा नवा प्रकार तुम्हाला फसवू शकतो!


 

ऑनलाइन देवाण-घेवाण जितक्या वेगाने वाढत आहे तितक्याच वेगाने आपल्याला फसवणाऱ्या लोकांची संख्या आणि त्याचे वेगवेगळे प्रकार वाढत आहेत. 


नुकताच एक प्रकार जो ऐकण्यात आला तो अचंबित करणारा आहे. या प्रकारामध्ये तुमच्या अकाउंट वर तुम्हाला अनोळखी असणारा एखादा व्यक्ती पैसे टाकतो. थोड्यावेळाने तुम्हाला फोन येतो की चुकून माझ्याकडून तुमच्या अकाउंट वर अमुक रक्कम पडली आहे. माझ्याकडून चुकून त्यातले नंबर वेगळे दाबले गेले आणि ती रक्कम तुम्हाला आली. खूप विनंती दर्शक भाषा आणि  गरजू असल्याचे दाखवत असल्यामुळे तुम्हाला कोणतीही शंका येत नाही. मग सदर व्यक्ती तुम्हाला ही रक्कम ज्या खात्यावरून पाठवलेली आहे त्या खात्यावर न टाकता दुसऱ्याच एखाद्या खात्यावर टाकण्यास सांगते. तुम्हाला अजिबात शंका येत नाही आणि तुम्ही त्या व्यक्तीने सांगितलेल्या खात्यावर तुम्हाला आलेली रक्कम ट्रान्सफर करता आणि झाली गोष्ट विसरून जाता.... 


साधारण आठ दिवसा नंतर बरोबर तेवढीच रक्कम परत एकदा तुमच्या अकाउंट वरून ज्या अकाउंट वरून आली होती त्या अकाउंटला परत जाते .... आपोआप.....  तुम्हाला न कळता.... तुम्ही बँकेत तक्रार करायला गेल्यानंतर तुम्हाला मॅनेजर सांगतात की ज्या अकाउंट वरून तुम्हाला चुकून रक्कम आली होती त्या व्यक्तीने बँकेमध्ये त्याच दिवशी अर्ज करून ही रक्कम परत करण्याची विनंती बँकेला केलेली होती... प्रोसेस मध्ये वेळ गेल्यामुळे ही रक्कम आठ दिवसानंतर त्या व्यक्तीला परत पाठवण्यात आली...  
आता पश्चाताप करण्याची आणि संबंधित व्यक्तीला फोन करून ती रक्कम मला पाठवून द्या असे म्हणण्याची वेळ तुमच्यावर येते आणि त्या व्यक्तीने तुमचा फोन ब्लॉक करून टाकलेला असतो! 



काय करावे अशावेळी? एखाद्याने तुम्हाला काही रक्कम पाठवून देऊन ती चुकून तुमच्या खात्यावर आल्याची सांगितले तर तुम्ही त्या व्यक्तीला तू स्वतःच बँकेत जा आणि माझ्या खात्यावरची रक्कम परत घेण्याची विनंती कर असे सांगावे. फारच ओळखीचा निघाला तर ज्या अकाउंट वरून तुम्हाला रक्कम आली आहे त्याच अकाउंटला ती रक्कम परत करण्याचे सांगावे; परंतु चुकूनही दुसऱ्या अकाउंटला ती रक्कम ट्रान्सफर करू नये... 

सावध रहा : आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना, मित्र-मैत्रिणींना ही पोस्ट शेअर करून सावध करा! 

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

.... आणि आपत्कालीन स्थितीत मी!





 

"सर, माझी तब्येत बरी नाही आणि मी पप्पासोबत दवाखान्यात जात आहे"


"सर, मी मामाच्या गावी आली आहे"


"सर, मी एकटी तयार आहे आणि बाकीच्या कोणीच नाहीत!"


सगळ्यात कहर म्हणजे हा फोन होता!....
"सर, ज्या वर्गात पाईप आणि कॅन्ड ठेवले होते त्याची चावी हरवली आहे!"


आता हताश होऊन वाळणाऱ्या झाडांची काळजी मनात येवून सरळ आपणच जावून 14 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माझ्या शाळेतील झाडांना पाणी देण्यासाठी मी निघालो. घरी असणारे पाईपचे तुकडे, कनेक्टर, बकेट्या माझ्या फोर व्हिलर मध्ये घेतल्या.
 
"14 किलोमीटर जावून परत यायचे आहे म्हणजे 28 किलोमीटर पैकी 15 ते 20 किलोमीटर गाडी तुला शिकायला मिळेल...येतेस का?" नुकतेच ड्रायव्हिंग लायसन्स घेतलेल्या कन्येला ही ऑफर आवडली आणि ती सोबत आली.


दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होण्याच्या शेवटच्या दिवशी शाळेतील सगळी कामे व्यवस्थित पूर्ण करायची ठरले होते त्याप्रमाणे सगळे चालू होते. सुट्टीच्या काळामध्ये झाडांना पाणी व्यवस्थित मिळावे म्हणून वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून, त्यांना तारीखनिहाय नियोजन देवून, पाणी कसे द्यावयाचे हे समजून सांगितले होते. एका वर्गात शंभर फुटी रबरी पाईप आणि पाच वॉटर कँड तयार ठेवली होती. 


पण हे सगळं फेल गेले होते; म्हणून आपत्कालीन परिस्थितीत सुट्टीत शाळेत आलो होतो!

 
गावाच्या मैदानाच्या ओट्यावर करमणूक म्हणून काही गावकरी ठाण मांडून गप्पात रममाण झाले होते. दोन - चार तरुण (चेहऱ्यावरून एखाद- दुसरा माझा जुना विद्यार्थी असणारी) मुले हाती मोबाईल घेऊन कुठल्याशा गेम खेळण्यात दंग होती. एकालाही असे वाटले नव्हते की 'शाळा आपली, गाव आपले तर दोन बकेट पाणी देण्यासाठी आपण जावे!' असो... "तुम्ही नाही आलात तर तुमची पगार थोडीच बंद पडणार आहे?!" असे जर उत्तर दिले तर मी निरुत्तर होईल म्हणून कोणास काही न बोलता आपले काम केले. आपणही मनाच्या आनंदासाठी हे करताना कोणाकडून अशी अपेक्षा ठेवणे योग्यही नव्हते! 

इयत्ता तिसरीत शिकणारी कु श्वेता धनराज दहिफळे ही एकमेव विद्यार्थीनी पूर्णवेळ सोबत थांबली... तिच्यासह लेकीने मदत केल्याने अर्ध्यातासात मनाजोगते काम झाले होते.


बुधवारी 6 नोव्हेंबर 2024 रोजी कु कोमल कृष्णा गुट्टे, अक्षरा सचिन गुट्टे, पूनम बालासाहेब गुट्टे आणि यशश्री कृष्णा गुट्टे यांनी झाडांना पाणी दिले. 

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०२४

.... तर खरंच आपण ग्रेट आहात!


 

"तुझ्या काय बापाच्या घरचं खाऊन ढबरा झालो का मी?"  असे कोणीतरी दुसऱ्याला रागा-रागाने बोलताना पाहिले की पूर्वी वाटायचे याला बोलण्याची पद्धत शिकवावी लागेल, हा चांगल्या वृत्तीचा नाही.... अशी प्रतिमा त्याच्या विषयी माझ्या मनात निर्माण व्हायची; पण हल्ली मात्र (कदाचित स्वतः वर वेळ आली म्हणून असेल की काय) असा व्यक्ती ज्या उद्ववेगाने हे बोलत असतो त्याच्या मनात नेमके काय सुरू असेल, त्याला याच्या वेदना किती जाणवत असतील हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो.... 



कोणाला त्याच्या शरीराच्या आकारावरून किंवा शरीरात निर्माण झालेल्या एखाद्या बदलावरून (डोक्यावरचे केस कमी होणे असेल किंवा चेहऱ्यावरचे वांग असेल किंवा असेच काही सहसा आपल्या हाती नसते) बोलणे आवडते किंवा नाही याचा विचार न करता बऱ्याचदा लोक जणू काही त्याच्या तब्येतीचे स्वतःला देणे-घेणे आहे याच अविर्भावात बोलत सुटतात. 
"ढेरी फार सुटली आहे!" 
"वजन खूपच कमी झाले आहे असं वाटत नाही का तुम्हाला?"
"वाऱ्याने उडायचा विचार आहे का काय?"
"सर्कशीचा तंबू होत आहे तुमचा!" 
किंवा काही वेळा अगदी सौम्य शब्दांमध्येच विचारून तुमच्या जास्त वजनाचा किंवा कमी वजनाचा तुम्हाला जणू काही विचारच नाही या पद्धतीने चौकशी करतात. खरं म्हणजे अशी व्यक्ती त्याबद्दल अगोदरच विचार करत असते आणि त्यावर त्याची अंमलबजावणी ही सुरू असते; पण काही वेळा सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. समोरच्याला हे समजून सांगताना तो मात्र पुरता नाकी नऊ येतो.... 
बरं विचारणारा प्रत्येक वेळी वेगळा असतो पण उत्तर देणारा मात्र हाच असतो! एकच उत्तर दिवसभरात खूप वेळा देऊन कधी कधी त्याच्या संयमाचा तोल सुटू शकतो हे मला हल्ली समजायला लागले आहे... त्यामुळे अगदीच एखाद्या बद्दल तुम्हाला सकारात्मक बोलायचे असेल तर  "वा! तब्येत छान दिसत आहे!" यापलीकडे बोलणे मी टाळत आहे.... 



ज्याची तब्येत जास्त असेल तो स्वतःच्या खाण्यावर नियंत्रण करत असेल, व्यायामाचे वेगवेगळे प्रकार करत असेल आणि आपल्या तब्येतीला सांभाळण्याचा व इतरांना बरे वाटेल असं दिसण्याचा प्रयत्न करत असेल तर अशावेळी त्याचा हा संघर्षाचा काळ असेल आणि परिणाम हवा तसा येत नाही म्हणून तो स्वतःच्या काळजीत असेल याचा विचार न करता खूप जवळची मित्रमंडळी मी वर दिलेली वाक्य बोलत असतील तर तो समजूनही घेत असेल; परंतु जे आप्तस्वकीय कधीतरी भेटतात- मित्रमंडळी ज्यांची खूप कमी वेळा भेट होते यांनीही अशी विचारणा केल्यानंतर त्याच्या मनःस्थितीत फरक पडू शकतो.... वजन जास्त किंवा कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मंडळींनी अशा प्रसंगात खूप संयमाने वागावे लागते आणि आपल्या तब्येतीला सांभाळण्याचा प्रयत्न करत राहणे आवश्यक असते....
अशा प्रसंगी तुम्ही स्वतः अशी व्यक्ती असाल तर तुमच्या मनात काय विचार येतात? फार सहजतेने घेऊन आपण तो विचार तिथेच सोडत असाल तर खरंच आपण ग्रेट आहात!

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४

सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे असे सुंदर बक्षीस!


 

दिवाळीचा आनंद वाढवणारे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे सुंदर बक्षीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विजेत्या विद्यार्थ्यांना मिळाले! 


प्रथम सत्र परीक्षा सुरू होण्यापूर्वीच्या अगोदरच्या आठवड्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली होती. 


शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने प्रत्येक महिन्यात अशी स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक वर्गातून प्रत्येकी तीन बक्षिसे यासाठी दिली जातात. एक सुंदर प्रमाणपत्र आणि सोबत एक छान बक्षीस असे या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस दिले जाते. 


दिवाळी जवळ आलेली लक्षात घेऊन सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना नव्या प्रकारची बंदूक ज्यामध्ये टिकली रोलच्या ऐवजी अगदी खऱ्या बंदुकात असतात त्याप्रमाणे वाजणाऱ्या गोळ्या बसवल्या जातात ती बंदूक बक्षीस म्हणून दिली गेली. पूर्वीच्या टिकली प्रमाणे त्याचा आवाज छोटा असतो मात्र आनंद जास्त मिळतो.

 
विद्यार्थ्यांनी दिवाळीमध्ये वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण करणारे फटाके टाळावेत असाही संदेश यावेळी देण्यात आला. स्कॉलरशिप आणि नवोदय ला बसलेल्या विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक तास आपला वेळ स्पर्धेय परीक्षेच्या तयारीसाठी द्यावा असे सुचवण्यात आले.


सुट्टीच्या काळामध्ये शाळेतील झाडांची काळजी घेणे आणि त्यांना पाणी देणे यासाठी विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. शालेय मंत्रिमंडळ यासाठी विशेष लक्ष देणार आहे. 


शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड डी.बी. यांच्यासह वर्गशिक्षक असणाऱ्या श्रीमती प्रिया काळे, श्रीमती शुभांगी चट, कु पूजा गुट्टे, श्री चंद्रशेखर फुटके, श्री राजेश्वर स्वामी यांनी आपल्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित केले. 




























शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

इयत्ता 6-8 विज्ञान शिक्षकांसाठी NCERT कोर्स


 

हा एक पूर्णपणे ऑनलाइन कोर्स आहे, ज्याचा उद्देश प्रामुख्याने विज्ञान विषयाशी संबंधित इयत्ता 6-8 शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आहे. या कोर्सचा उद्देश शिक्षकांना मदत करणे हा आहे. सेवापूर्व आणि सेवारत शिक्षकांचा विकास होण्यासाठी कोर्समध्ये मल्टीमीडिया आधारित परस्परसंवादी शिक्षण सामग्रीचा समावेश आहे.

UPDATE: The last date for enrollment has been extended till 31st October, 2024 and the course will now commence from 4th November, 2024.


कोर्समध्ये स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी सखोल परंतु लवचिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. विज्ञानाचे अध्यापन-अध्यापन प्रत्येक मॉड्यूल मूलभूत आणि प्रयत्नांपासून सुरू होते
लक्षणीय वैचारिक खोलीपर्यंत शिकणाऱ्याची समज विकसित करणे.


प्रवेश घेताना अगोदर तुम्हाला पेमेंट करावे लागते. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून pdf download करा.


टीप: एनसीईआरटी हा अभ्यासक्रम आवश्यक असलेल्या इतर कोणत्याही अभ्यासक्रमाच्या समतुल्य असल्याचा दावा करत नाही. सेवेत असणारे किंवा 
शिक्षक नियुक्तीसाठी पात्रता असणारे सर्व हा कोर्स करू शकतात. 


अधिक माहितीसाठी PDF डाउनलोड करा. 

औषध मुक्त जीवनाचे मोफत औषध! 💫


 

औषध मुक्त जीवन...💫 
 
 1. लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे औषध आहे.
 
 2. ओम किंवा राम राम जप हे औषध आहे.
 
 3. योग, प्राणायाम आणि व्यायाम हे औषध आहेत.
 
 4. सकाळी आणि संध्याकाळी चालणे हे देखील औषध आहे.
 
 5. उपवास हे सर्व रोगांवर औषध आहे.
 
 6. सूर्यप्रकाश देखील औषध आहे.
 
 7. मडक्याचे पाणी पिणे हे देखील एक औषध आहे.
 
 8. टाळ्या वाजवणे हे देखील औषध आहे.
 
 9. भरपूर चघळणे हे देखील औषध आहे.
 
 10. अन्नाप्रमाणेच पाणी चघळणे आणि पिण्याचे पाणी हे देखील औषध आहे.
 
 11. जेवणानंतर वज्रासनात बसणे हे औषध आहे.
 
 12. आनंदी राहण्याचा निर्णय देखील औषध आहे.
 
 13. कधीकधी मौन देखील औषध असते.
  
 14. हसणे हे औषध आहे.
 
 15. समाधान हे देखील औषध आहे.
 
 16. मनाची आणि शरीराची शांती हे औषध आहे.
 
 17. प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता हे औषध आहे.
 
 18. निस्वार्थी प्रेम आणि भावना देखील औषध आहेत.
 
 19. प्रत्येकाचे भले करणे हे देखील औषध आहे.
 
 20. कोणाचा तरी आशीर्वाद मिळेल असे काहीतरी करणे म्हणजे औषध होय.
 21. सर्वांसोबत एकत्र राहणे हे औषध आहे.
 
 22. कुटुंबासह खाणे आणि समाज करणे हे देखील औषध आहे.
 
 23. तुमचा प्रत्येक सच्चा आणि चांगला मित्र सुद्धा पैशाशिवाय एक संपूर्ण मेडिकल स्टोअर आहे.
 
 24. थंड राहा, व्यस्त रहा, निरोगी राहा आणि आनंदी रहा, हे देखील औषध आहे.
 
 25. प्रत्येक नवीन दिवसाचा पुरेपूर आनंद घेणे हे देखील औषध आहे.
 
 26. आणि शेवटी... हा संदेश एखाद्याला प्रसाद म्हणून पाठवून सत्कर्म केल्याचा आनंद हे देखील एक औषध आहे.
 
निसर्गाची महानता समजून घेणे हे देखील औषध आहे. ही सर्व औषधे अगदी मोफत उपलब्ध आहेत. (संकलीत)


बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

सहकाऱ्यांसोबत तुम्ही एकत्र जेवण करता का?


एका छोट्या गावात असणाऱ्या बँकेत, जेथे फक्त चार जण कार्यरत होते, तिथे अमितची बदली झाली. तो आता तिथे प्रमुख म्हणून काम करणार होता. 
जवळपास वयाच्या थोड्या अंतराचा फरक असणारे ते तिघे, तर एक जण जरा वयस्कर, असे ते चौघे काम करत होते. कामाचे स्वरूप जवळपास सारखेच होते. 
अमितला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता. काय केले म्हणजे सगळ्यांचे काम चांगले होऊन कामाचा आनंद मिळेल आणि आपली ब्रँच नावारूपाला येईल  याचा विचार अमितच्या डोक्यात पिंगा घालत होता. 

सकाळी आल्यानंतर प्रत्येकजण सहकाऱ्यांना हाय -हॅलो करून आपापल्या रूममध्ये येवून कामाला लागत. दुपारचे जेवण तिथेच आपापल्या सोयीनुसार करून पुन्हा आपल्या कामाला लागत. जाताना पुन्हा एकदा बाय बाय.... बस एवढाच काय तो त्यांचा संवाद!

अमितने एके दिवशी अचानक सर्वांना दुपारचे जेवण एकत्र करण्याचा आग्रह केला.... हो - ना करता चौघे एकत्र आले आणि डब्यातील पदार्थ एकमेकांना शेअर करत जेवण सुरू झाले. अमितचा स्वभाव थोडा बोलका.... एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी असे करत करत दररोज वेगळे विषय निघायचे... कधी घरची परिस्थिती, मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्याच्या समस्या, सवयी.... हळू हळू बँकेतील कामकाजाच्या समस्या चर्चेला यायला लागल्या तर सर्वात सिनियर असलेले रघुकाका उपाय सांगू लागले...त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांनाच होऊ लागला.... मोकळ्या वातावरणात होणाऱ्या गप्पांमुळे अनेक फायदे बँकेला होऊ लागले तसेच सर्वांची बाँडींग वाढली अर्थात दुपारच्या वेळेस होणाऱ्या जेवणाला आता सर्वांची पसंती वाढली होती....
 
रघुकाका म्हणाले, "सुट्टी असली की आता घरी जेवण जात नाही" त्यांच्या आग्रहाखातर अर्ध्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा सर्वजण जेवण झाल्यानंतरच घरी जाऊ लागले...

अनेक योजनांना चालना, समस्यावर इतरांचे अनुभव, चांगल्या गोष्टींचे अनुकरण, नव्या गोष्टींवर साधक - बाधक चर्चा.... कधी घरच्या तणावपूर्ण परिस्थितीत संयमाचे धडे.... बऱ्याचदा खळखळून हसणं असे एक ना अनेक सामाजिक, भावनिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक फायदे दुपारचे जेवण एकत्र करण्यामुळे सर्वांना होऊ लागले....

तुमचा काय अनुभव आहे? कमेंट मध्ये लिहून नक्की सांगा.... तुम्ही घेता का सहकाऱ्यांसोबत एकत्र जेवण? काय आहे तुमचा अनुभव? कधी कधी नकारात्मकता असेलही; परंतु निश्चित चांगला मार्ग सापडतो... 


 

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

ग्रंथ दिंडी, पुस्तक प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या भाषणांनी वाचन प्रेरणा दिन साजरा










ग्रंथ दिंडी, पुस्तक प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या भाषणांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन अर्थात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा झाला. 


इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मागच्या आठवड्यापासून भाषणांचा सराव चालू केला होता. आपले आवडते शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी शालेय मंत्रिमंडळाने तयारी केली होती. 
विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या छोटेखानी पालखीमध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम लिखित अग्निपंख या पुस्तकाला मानाचे स्थान देण्यात आले होते. या पालखी समोर लेझीमांचा वाद्यवृंद उत्साहात पुढे निघाला होता. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखारामजी गुट्टे यांनी श्रीफळ वाढवून ग्रंथ दिंडीला सुरुवात करून दिली. 


गावातील महत्त्वाच्या मार्गावरून ग्रंथ दिंडी शाळेत परत आल्यानंतर आकर्षक रांगोळी काढून ठेवण्यात आलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन श्री सखारामजी गुट्टे यांनी केले. नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया यांच्याकडून मागवण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. 


डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमापूजनानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखारामजी गुट्टे यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून मुख्याध्यापक श्री राठोड डीबी यांनी केले.

 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कुमारी पूनम बालासाहेब गुट्टे हिने केले. यावेळी शिक्षकवृंदांसह 32 विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 


ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय मंत्रिमंडळाच्या विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक सर्व श्री चंद्रशेखर फुटके, राजेश्वर स्वामी, श्रीमती प्रिया काळे श्रीमती शुभांगी चट, कु पूजा गुट्टे यांनी परिश्रम घेतले. 


व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 



 

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

कासारवाडी गावाशी उखळी गावाचे सुंदर नाते


 श्री केदारेश्वर विद्या मंदिर उखळी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथील विद्यार्थ्यांनी आज दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी कासारवाडी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे असणाऱ्या बोरणा प्रकल्पास परिसर सहलीच्या निमित्ताने भेट दिली. 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट येथील शाळेच्या प्रांगणात त्या निमित्ताने श्री केदारेश्वर विद्या मंदिर उखळीच्या शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. 


स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमापूजनाने झाली. श्री केदारेश्वर विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री अदूडे सर यांचे स्वागत कासारवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री डी.बी. राठोड यांनी केले. उपस्थित सर्व शिक्षक वृंदांचे स्वागत कासारवाडी येथील शाळेच्या शिक्षकांनी आणि कासारवाडीतील तरुण मंडळींनी केले. 


कासारवाडी गावाची माहिती आपल्या मनोगतातून कुमारी स्वाती नाथराव लव्हारे यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अमृता सोमनाथ गुट्टे आणि कुमारी अंजली रामकिशन शेप यांनी केले. 


स्वागत सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप केदारेश्वर विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री अदुडे सर यांनी केला. कासारवाडी गावाशी असलेले शाळेचे नाते याप्रसंगी त्यांनी विशद करून हे नाते कायम टिकण्याचे आवाहन केले. शाळेचा प्रवासही सांगून त्यांनी परिसर सहलीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. 


केदारेश्वर विद्या मंदिर उखळी बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी बोरणा प्रकल्पास भेट दिली आणि स्नेह भोजन केले. कासारवाडी येथील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी त्यांना जिलेबी हे मिष्ठान्न वाटप केले. 

दुपारच्या सत्रात दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत पर सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. ज्यामध्ये सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम सांगणारे नाटक आणि देशभक्तीपर गीतांचा, नृत्यांचा समावेश होता. उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी कासारवाडी येथील केदारेश्वर विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी गाव भेटीनिमित्त मुख्याध्यापक श्री अदुडे सर व शिक्षकवृंदांना स्मृतीचिन्ह देऊन ही भेट कायमस्वरूपी जतन करून ठेवली. 
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्रसंचालन कुमारी स्वाती लव्हारे आणि कुमारी मुस्कान शेख यांनी केले. 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडीच्या आणि कासारवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके यांनी केले. 


श्री केदारेश्वर विद्या मंदिर उखळीच्या विद्यार्थ्यांची परिसर सहल यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री अदुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख श्री सारडा सर आणि शिक्षक वृंदांनी मेहनत घेतली. 


कासारवाडी येथे असलेले श्री केदारेश्वर विद्या मंदिर उखळीचे आजी आणि माजी विद्यार्थी यांनी आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा सुंदर कार्यक्रम घेतला याबद्दल श्री अदुडे सरांनी त्यांचे आभार मानले




















व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा