मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

असे लिहा साहित्यसम्राट अण्णांचे यॊग्य पद्धतीने नाव !

 

साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव अनेक ठिकाणी चुकीचे लिहिलेले दिसते. "अण्णा" हे त्यांना मित्रांनी प्रेमाने दिलेले नाव... त्यांचे खरे नाव तुकाराम. वडिलांचे नाव भाऊराव आणि आडनाव साठे. काही ठिकाणी तुम्ही पाहता की लोक "अण्णाभाऊ साठे" असे लिहितात. असे लिहिणे चुकीचे होईल. 


आपण जर "अण्णा भाऊ साठे" असे वेगवेगळे नाव लिहिले तर पहिले नाव आदरणीय श्री तुकाराम यांचे टोपण नाव, दुसरे त्यांच्या वडिलांचे नाव तर तिसरे आडनाव होईल. म्हणून या तीनही नावांच्या मध्ये अंतर असणे आवश्यक आहे. यापुढे ही काळजी आपण घ्यायला हवी. आदरणीय अण्णांचे पूर्ण नाव श्री तुकाराम भाऊराव साठे (अण्णा भाऊराव साठे) असे लक्षात ठेवायला हवे. 

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

नाते 'अधिक' दृढ करण्याचा 'मास'! अधिकमास!


 

मानवी नाते हे मनाच्या व्यवहारावर अधिक अवलंबून आहेत असे मला वाटते, रक्ताच्या नात्यापासून ते मानलेल्या, जोडलेल्या नात्यांना अधिक चांगल्या पद्धतीने जोडण्यासाठी मन अधिक प्रसन्न असायला हवं. हिंदू संस्कृतीत त्यामुळेच सणावारांची गर्दी आहे. सणांच्या दिवशी मन प्रसन्न ठेवलं पाहिजे, आनंदाने वागलं पाहिजे हे आपले पूर्वज आपल्याला सांगत आलेले आहेत.

'अधिकमास' ज्याला बरेच जण 'धोंड्याचा महिना' असे म्हणतात तो सुद्धा आपल्याला तीन वर्षानंतर एकदा मिळणारा अधिकचा मिळालेला एक सण आहे, म्हणजेच आपण 'अधिकचा आनंद' या दिवसांमध्ये साजरा करायला हवा. या महिन्यात आपण आपल्याशी जोडल्या गेलेल्या नात्यांना अधिक दृढ करायला हवे.
बऱ्याचदा आपल्याशी जोडल्या गेलेल्या नात्यांमध्ये काही कारणामुळे तणाव निर्माण झालेला असतो. हा तणाव तीन वर्षापेक्षा अधिक काळ चालू नये म्हणूनही कदाचित ही संधी आपल्याला देण्यात आलेली असावी 😀 हे नातं पूर्वीप्रमाणेच दृढ व्हावे म्हणून अधिकमासात विशेष प्रयत्न करावेत.

विशेषत: जावई आणि सासू - सासरे, सासरकडील मंडळी या नात्यांमध्ये तणाव अधिक येतात कारण हे नाते अधिक जवळचे असते; पण काहीही झाले तरी यातला तणाव हा तात्पुरताच असावा आणि पुन्हा नव्या सकारात्मक विचाराने हे नातं जोडलं जावं. मनातली जळमटी दूर करण्यासाठी तशा हिंदू संस्कृतीमध्ये अनेक संधी दिल्या गेलेल्या आहेत, त्यातील ही एक संधीच आहे असे समजून आपण आपलं नातं जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आणि जी नाती पूर्वीच अतिशय सकारात्मक रीतीने चालू आहेत त्यांना अधिकच दृढ करण्याचा हा सण आहे असे समजावे.

या मनोगताच्या सुरुवातीला मी असे म्हटले आहे की, मानवी नाते हे मनाच्या व्यवहारावर अधिक अवलंबून आहे, त्याचा अर्थ असाही घ्यायला हरकत नाही की आपल्याला जमेल तेवढे, झेपेल तेवढे खर्च करून हा अधिकमास साजरा करण्याचा प्रयत्न सासरवाडीकडील मंडळींनी करावा तर जावईबापूंनी आपल्या सासऱ्यांची परिस्थिती समजून घेऊन जे दिले आहे ते 'अधिक' चांगले आहे असे समजून हा अधिकमास साजरा करावा! 😀

सर्वांना अधिकमासाच्या खूप अधिक (जास्तीच्या)  हार्दिक शुभेच्छा!!

( वरील फोटो विषयी थोडेसे- आपल्या ४ भायांच्या पाच लेकी यांना जावयांसह आमंत्रित करून अधिकमासात त्यांचा सन्मान करून आमच्या फुटके परिवारासमोर मनाने एकत्र राहण्याचा आदर्श आमच्या चुलती सौ गंगाबाई (लताबाई) महालिंगअप्पा फुटके यांनी घालून दिला आहे. आपल्या पाच लेकी अनुक्रमे सौ सुमन बालाजी बनसोडे (नांदेड), सौ मंदाकिनी मनोहर दळवे (परभणी), सौ संजीवनी नामदेव बरकसे (कळंब), सौ जयश्री युवराज पिंपळे (परळी) व सौ महादेवी राजेंद्र वाघमारे (सोलापूर) यांना एकत्र बोलावून परिवाराचा आनंद सोहळा ताईंच्या इच्छेमुळे घडून आला आणि प्रा प्रवीण महालिंगअप्पा फुटके व श्री गणेश महालिंगअप्पा फुटके यांनी उत्तम व्यवस्था, स्वागत करून जावईबापुंना खुश केले. 

" अशी सासुरवाडी मिळणे हे आमचे भाग्य! " असे भाऊजींचे मनोगत परिवारास सुखावून गेले. आमच्या ५ ही ताईंनी आपल्या गोड स्वभावाने संसार सुखाचा केला आहे आणि त्यास सुस्वभावी भाऊजींची समर्थ साथ सदैव लाभली आहे हेही तितकेच खरे आहे म्हणून " असे जावई लाभणे हे आमच्या परिवाराचे भाग्य!"....असे म्हणावेसे वाटते.) 

मंगळवार, १८ जुलै, २०२३

सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे बक्षीस वितरण



 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली असून शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी सुंदर हस्ताक्षर व इंग्रजी सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे बक्षीस वितरण वर्गशिक्षकांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. 








विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून दुसऱ्या व चौथ्या शनिवारी शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्पर्धांचे अर्धवार्षिक नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांचा तसेच व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन मिळेल अशा स्पर्धांचा विचार करून हे नियोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख म्हणून श्री फुटके तसेच सर्व वर्गांचे वर्गशिक्षक श्री तरुडे, श्री स्वामी, श्री मुंडे तसेच श्रीमती काळे, श्रीमती चट यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे. 

शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून चि कन्हैया ज्ञानेश्वर गुट्टे तर उपमुख्यमंत्री म्हणून कु राधा अनंत गुट्टे कामकाज पाहत आहे.   

शुक्रवार, ५ मे, २०२३

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थिनीचे इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षेत यश

शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने सहा विद्यार्थ्यांना दिला शाळारत्न पुरस्कार

आमचे पुतणे श्री पवन संगमेश्वर फुटके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

सोमवार, १ मे, २०२३

शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने सहा विद्यार्थ्यांना दिला शाळारत्न पुरस्कार

शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने सहा विद्यार्थ्यांना दिला शाळारत्न पुरस्कार

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील उपक्रम










परळी, दि

येथून जवळच असलेल्या मिरवट केंद्रातील कासारवाडी जिल्हा परिषद शाळेत शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने वर्षभरात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. वर्षभरातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. आज महाराष्ट्र दिनी मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते सहा विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

स्कॉलरशिप नवोदय तसेच विशेष अशा अभ्यासक्रमावर आधारित शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने दर पंधरा दिवसाला वेगवेगळ्या स्पर्धांचा आयोजन केले जाते. या स्पर्धा दोन गटांमध्ये घेतल्या जातात. शालेय मंत्रिमंडळाचे स्पर्धा मंत्री या उपक्रमाचे रेकॉर्ड ठेवतात. शालेय मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य या स्पर्धेचे व्यवस्थित आयोजन व नियोजन करतात. वर्षभरातील स्पर्धांच्या आधारे शाळारत्न हा पुरस्कार दिला जातो. 

आज महाराष्ट्र दिनी गावचे सरपंच श्री बंडू गुट्टे,  उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे, ग्रामसेवक श्री नागरगोजे तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे, उपाध्यक्ष श्री हनुमान देवकते, पोलिस पाटील श्री बाबुराव गुट्टे, श्री रामकृष्ण गुट्टे, श्री ज्ञानेश्वर गुट्टे, श्री महादू गुट्टे, श्री जयदीप गुट्टे, श्री अर्जुन दहिफळे, श्री सोपान गुट्टे, श्री अरुण खांडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता सहावी ते आठवी गटातून कु अमृता सोमनाथ गुट्टे, कु अंजली रामकिशन शेप, कु राधा अनंत गुट्टे तसेच तिसरी -चौथी गटातून कु समृद्धी सोमनाथ गुट्टे व कु पूनम बालासाहेब गुट्टे तसेच स्कॉलरशिप मध्ये इयत्ता पाचवीतून पात्र झाल्याबद्दल कु सुजाता धनराज दहिफळे ही शाळा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमा अगोदर शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या गीतावर नृत्य केले. कागदी टोप्या डोक्यावर, हातात रंगीबेरंगी फुगे अशा छान वातावरणात पहिली देणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. 

शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव भाऊराव राठोड यांनी तसेच शिक्षकवृंदानी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

8th Scholarship: English Similes

 

  गुगल फॉर्मच्या मद्तीने होणाऱ्या या प्रकारच्या सराव परीक्षा आमच्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत ज्यातून तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल.
चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून घ्या आणि अभ्यास करून काही दिवसांनी पुन्हा सराव करा.



रविवार, २९ जानेवारी, २०२३

स्कॉलर केजी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

 

लेकरांना प्रेम द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना वेळ द्या असे तीन मंत्र स्कॉलर केजी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री सोमनाथ वाळके यांनी पालकांशी हितगुज करताना दिले. 
शनिवारी स्कॉलर केजी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आष्टी येथील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री सोमनाथ वाळके सर प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात हा सोहळा संपन्न झाला. बीड येथील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री शशिकांत कुलथे, परळीचे नगरसेवक प्रा. पवन मुंडे, संतोष पोकळे यांचीही यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. 
सुरुवातीला अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले अतिथींच्या स्वागतानंतर प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता चंद्रशेखर फुटके यांनी केले. आठ वर्षात शाळेने केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. पालकांनी केलेल्या पुरेपूर सहकार्यामुळेच शाळा आता नवीन इमारतीत, पुरेसा मैदानाच्या सुविधेसह तयार असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. 
श्री सोमनाथ वाळके यांनी शून्य ते पाच वयोगट हा बालकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच भाषिक समृद्धीसाठी कसा महत्त्वपूर्ण आहे हे पालकांना समजावून सांगितले. 
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री शशिकांत कुलथे यांनी पालकांना व बालकांना आवडेल अशी मजेदार गोष्ट सांगून पालकांनी काळाशी सुसंगत असे अपडेट राहणे कसे महत्त्वाचे आहे हे उदाहरणासह पटवून दिले. 
नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांनी प्राचार्या सौ सुजाता व श्री चंद्रशेखर फुटके यांचे कौतुक करून परळी शहरातील शैक्षणिक चळवळीत त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. 
स्कॉलर केजीचा विद्यार्थी विनायक गणेश स्वामी याने शाळेविषयी मनोगत व्यक्त केल्यानंतर, संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये बक्षीस विजेत्या महिला पालक सौ आशा केंद्रे, सौ शितल शिंदे व सौ भाग्यशाली शिंदे यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  
दैनिक सकाळने प्रा. पवन मुंडे यांना 'गौरव भूमिपुत्राचा' हा सन्मान दिल्यामुळे शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले श्री सौदागर कांदे यांचाही सन्मान करण्यात आला. 
उद्घाटन सत्राचे आभार शाळेचे मार्गदर्शक श्री चंद्रशेखर फुटके यांनी व्यक्त केले, तर उद्घाटन सत्र व संपूर्ण सोहळ्याचे बहारदार असे सूत्रसंचालन श्री महेश जाधव व श्री दीपक गायकवाड यांनी केले. 
सुमारे अडीच तासापेक्षा अधिक काळ झालेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनात स्कॉलर केजी स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्री गणेश वंदनेने सुरुवात करून देशभक्तीपर गीते, मराठी व हिंदी चित्रपटातील गीते, त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारी नाटके सादर करून पालकांची व उपस्थितांची मने जिंकून घेतली. 
भव्य असा रंगमंच, शेवटपर्यंत बसलेल्या प्रेक्षकांना स्पष्ट दिसावे यासाठी स्क्रीनची व्यवस्था, वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून आकर्षक केलेले सभागृह, वेळेचे काटेकोर नियोजन आणि शाळेविषयी तसेच चालू असलेल्या कार्यक्रमाविषयी छोटे छोटे प्रश्न आणि त्याची उत्तरे देणाऱ्यांना तात्काळ बक्षीस हे या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. 
स्कॉलर केजी स्कूलच्या छोट्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांचे आई वडील, आजी आजोबा यांनी उपस्थिती दर्शवून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. 
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सौ प्रणिता पाठक, सौ वर्षा लाड, सौ जयश्री जोशी, सौ प्रियंका कुलकर्णी, सौ प्रतीक्षा फुटके, सौ संगीता रोकडे यांच्यासह सौ सुनयना गुट्टे, सौ शामबाला पिंपळे यांनी परिश्रम घेतले.