बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४
बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४
शालेय मंत्रिमंडळाने दाखवले हम भी कुछ कम नहीं!
2 ऑक्टोबरच्या सुंदर कार्यक्रमाने शालेय मंत्रिमंडळाने दाखवले हम भी कुछ कम नहीं!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी या ठिकाणी वर्ग चौथी ते सातवी या वर्गातील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांनी मिळून तयार झालेल्या शालेय मंत्रिमंडळाने 2 ऑक्टोबर 2024 रोजी महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती अतिशय उत्साहात आणि उत्तम नियोजनाने साजरी केली.
या कार्यक्रमास सुरुवात होण्यापूर्वी स्वच्छता अभियानांतर्गत शाळेचा आणि शाळेबाहेरचा परिसर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून स्वच्छ केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून शाळेचे मुख्याध्यापक श्री डी बी राठोड आणि सर्व शिक्षक यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.
व्यासपीठावर स्थानापन्न असलेले शाळेचे शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके, श्री राजेश्वर स्वामी, शिक्षिका श्रीमती प्रिया काळे, श्रीमती शुभांगी चट आणि कु पूजा गुट्टे यांचे स्वागत शालेय मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांपैकी कु ईश्वरी अर्जुन गुट्टे, कु कोमल कृष्णा गुट्टे, कु श्रुती बालासाहेब दहिफळे, कु चैतन्या सुनील गुट्टे, कु यशश्री तुळशीराम गुट्टे यांनी महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले. सर्वात विशेष म्हणजे इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कु सिद्धी गुट्टे हिने प्रथमच भाषण करण्याचा प्रयत्न केला.
शिक्षकांपैकी श्री राजेश्वर स्वामी, श्री चंद्रशेखर फुटके यांनी मार्गदर्शन केल्यानंतर अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक श्री राठोड यांनी केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, विद्यार्थ्यांची मनोगते, बैठक व्यवस्था यासह इतर सर्वच छोटी कामे विद्यार्थ्यांनी स्वतःहून पूर्ण केली.
कार्यक्रम पत्रिका तयार करण्यापासून ते कार्यक्रमाची संपूर्ण तयारी, नियोजन याबाबत शालेय मंत्रिमंडळाच्या विद्यार्थ्यांनी स्वतः आपापसात चर्चा करून हा कार्यक्रम पूर्णपणे पार पाडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छान छान अशा कविता व शेरशायरीची गुंफण करत शालेय मंत्रिमंडळाच्या उपमुख्यमंत्री कु वैष्णवी विठ्ठल गुट्टे हिने केले.
सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४
कविता शिकताना भेळ केली चट्टा मट्टा
वर्गात भेळ कविता शिकताना इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षिका श्रीमती प्रिया अशोकराव काळे यांनी तयार केलेली भेळ चट्टामट्टा केली!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती प्रिया काळे या नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना नवेनवे प्रयोग करत असतात.
इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकात ११ वी कविता मंदाकिनी गोडसे यांनी लिहिलेली आहे. ही कविता शिकवताना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेळ तयार होताना दाखवून भेळचा आस्वाद घेता यावा म्हणून त्यांनी प्रत्यक्ष वर्गात सर्व साहित्य आणून भेळ तयार केली. भेळ तयार होत असताना विद्यार्थ्यांनी आपली कविता चालीवर म्हणणे चालू ठेवले होते.
वर्गशिक्षिका श्रीमती काळे प्रिया यांच्यासह मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड शाळेतील शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके, श्रीमती शुभांगी चट आणि कुमारी पूजा गुट्टे यांनी आग्रहाने विद्यार्थ्यांना ही भेळ खाऊ घातली. विद्यार्थ्यांनी श्लोक म्हणल्यानंतर या भेळचा आस्वाद घेतला.
रविवार, २२ सप्टेंबर, २०२४
चित्रकला शिक्षक नसतानाही चित्रकला परीक्षेला बसले कासारवाडी शाळेचे विद्यार्थी!
चित्रकला शिक्षक नसतानाही चित्रकला परीक्षेला बसले कासारवाडी शाळेचे विद्यार्थी!
जिल्हा परिषद शाळांना चित्रकला, संगीत या विषयांचे शिक्षक नसतात; परंतु असे असतानाही चित्रकलेच्या इयत्ता आठवी वर्गासाठी असलेल्या एलिमेंट्री परीक्षेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडीचे विद्यार्थी बसले आहेत ते येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती प्रिया अशोकराव काळे यांच्या पुढाकारामुळे! काळे मॅडम यांनी या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विशेष मेहनतीचे पालकांमधून कौतुक होत आहे.
श्रीमती प्रिया अशोकराव काळे यांनी इयत्ता आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे विशेष क्लास घेणे सुरू केले असून लवकरच होणाऱ्या एलिमेंट्री परीक्षेसाठी शाळेतील विद्यार्थी बसलेले आहेत आणि त्याची तयारी करत आहेत. श्रीमती काळे मॅडम त्यासाठी वेगळा वेळ देऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.
परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ विद्यालयात ही परीक्षा होणार असून या परीक्षा विभागाचे प्रमुख श्री चव्हाण सर यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ काढून भेट दिली आणि त्यांना शनिवारी मार्गदर्शन केले. त्यांच्या या विशेष भेटीबद्दल मुख्याध्यापक श्री राठोड सर यांनी आणि श्रीमती प्रिया काळे यांनी त्यांचे स्वागत केले.